रसायन आणि खते मंत्रालय
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच रसायन व खत मंत्री जे. पी. नड्डा यांचा सौदी अरेबियाचा दौरा आज संपन्न
वैद्यकीय क्षेत्र, आरोग्य सेवा, औषधनिर्मिती, डिजिटल आरोग्य उपाययोजना आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीत सहकार्य वाढवण्यासाठी द्विपक्षीय बैठका संपन्न
भारतासाठी दीर्घकालीन खत पुरवठ्याबाबत सौदी अरेबियाकडून महत्त्वपूर्ण बांधिलकी प्राप्त
Posted On:
13 JUL 2025 9:07PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि रसायन व खत मंत्री जे. पी. नड्डा यांनी 11 ते 13 जुलै 2025 दरम्यान सौदी अरेबियातील दम्मम व रियाध दौरा केला. या दौर्याचा उद्देश रसायन व खत क्षेत्रात भारत-सौदी अरेबिया यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर केंद्रित होता. त्यांनी खत विभाग आणि परराष्ट्र मंत्रालयातील सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले.

जे. पी. नड्डा यांनी आज रियाध येथे सौदीचे उद्योग व खनिज संपत्ती मंत्री, महामहिम बंदर बिन इब्राहिम अल खोरायफ यांच्यासोबत खत, पेट्रोकेमिकल्स आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील भागीदारी बळकट करण्याच्या यंत्रणांवर चर्चा केली.

या दोन मंत्र्यांच्या उपस्थितीत माधेन आणि भारतीय कंपन्या आयपीआयएल, कृभिको आणि कोल इंडिया लिमिटेड यांच्यात दीर्घकालीन करारांवर स्वाक्षरी झाली. या करारांनुसार 2025-26 पासून पुढील पाच वर्षांसाठी दरवर्षी एकूण 3.1 दशलक्ष मेट्रिक टन डायअमोनियम फॉस्फेट (डीएपी) खतांचा पुरवठा केला जाणार असून, परस्पर संमतीने हा कालावधी आणखी पाच वर्षांनी वाढवता येईल. दोन्ही देशांनी यामध्ये युरिया सारखी महत्त्वाची खते देखील समाविष्ट करून द्विपक्षीय सहकार्याचा विस्तार करण्याच्या बांधिलकीवर भर दिला, जेणेकरून भारताची खत सुरक्षा आणखी मजबूत होईल.

या बैठकीत परस्पर गुंतवणुकीला चालना देण्यासाठी देखील चर्चा झाली, विशेषतः भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना सौदीच्या खत क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी शोधण्यावर भर देण्यात आला. त्याचप्रमाणे, सौदीकडून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीच्या शक्यता देखील तपासण्यात आल्या.

याशिवाय, दोन्ही नेत्यांनी कृषी उत्पादकता व टिकाव वाढवता येईल यासाठी भारताच्या गरजा लक्षात घेऊन खास डिझाइन केलेली व पर्यायी खते विकसित करण्यासाठी संयुक्त संशोधनाच्या संधींवरही विचारमंथन केले.

याशिवाय, या क्षेत्रातील दीर्घकालीन सहकार्याच्या शक्यतांचा अभ्यास करण्यासाठी भारताच्या बाजूने (खत विभागाचे) सचिव यांच्या नेतृत्वाखाली आणि सौदी अरेबियाच्या उद्योग व खनिज संपत्ती मंत्रालयातील खाण व्यवहारांचे उपमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे.
जे. पी. नड्डा यांनी सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री आणि भारत-सौदी अरेबिया धोरणात्मक भागीदारी परिषदेतील अर्थव्यवस्था व गुंतवणूक समितीचे सहअध्यक्ष, हिज रॉयल हायनेस प्रिन्स अब्दुलअझीझ बिन सलमान अल सौद यांच्या सोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांमधील आर्थिक भागीदारी वृद्धिंगत करण्याच्या उपायांवर चर्चा झाली.
जे. पी. नड्डा यांनी आज रियाध येथे सौदी अरेबियाचे आरोग्य उपमंत्री. अब्दुल अझीझ अल-रुमैह यांची देखील भेट घेतली. या बैठकीत वैद्यकीय क्षेत्र, आरोग्य सेवा, औषधनिर्माण, डिजिटल आरोग्य उपाययोजना आणि ज्ञान देवाणघेवाण यामधील सहकार्य वाढविण्याच्या उपायांवर चर्चा झाली. या संदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील सौदी अरेबिया दौऱ्याच्या वेळी स्वाक्षरी करण्यात आलेल्या आरोग्य विषयक द्विपक्षीय सामंजस्य कराराचे महत्त्व दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले.
***
N.Chitale/G.Deoda/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2144437)