युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी 'मन की बात टॅलेंट हंट सिझन 5' च्या अंतिम फेरीच्या स्पर्धांचे उद्घाटन करून युवक सशक्तीकरणास दिली चालना
राज्यमंत्री खडसे यांनी 'मन की बात' चा युवकांमध्ये राष्ट्राभिमान व कौशल्य विकास घडवण्यातील महत्त्वाचा सहभाग अधोरेखित केला
Posted On:
13 JUL 2025 8:21PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी आज सकाळी तिरुवनंतपुरम येथील मेनामकुलम, कझाक्कूट्टम येथील ज्योथिस सेंट्रल स्कूलमध्ये "मन की बात टॅलेंट हंट सिझन 5" च्या अंतिम फेरीच्या स्पर्धांचे उद्घाटन केले. सशक्त तरुणांचा ‘विकसित भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुलक्षून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.. केरळ मधील ग्लोबल गिव्हर्स फाउंडेशन आणि मेरा युवा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांना ‘मन की बात’ कार्यक्रमातील प्रेरणादायी विचारांमधून शिकण्याचा आणि त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आजच्या उद्घाटनाने विविध कौशल्यांची परीक्षा घेणाऱ्या अनेक स्पर्धांना प्रारंभ झाला. ‘मन की बात टॅलेंट हंट सिझन 5’ चे औपचारिक उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते झाले.
रक्षा खडसे यांनी उद्घाटन भाषणात सांगितले की, “'मन की बात टॅलेंट हंट' हे युवकांसाठी एक प्रभावशाली व्यासपीठ आहे जे त्यांना देशाच्या भावना, सामूहिक आकांक्षांशी जोडले जाण्यास आणि चिंतन व संवाद कौशल्य विकसित करण्यास प्रवृत्त करते. ‘मन की बात’ मधील विचारांशी एकरूप होताना हे युवा केवळ भारताबद्दल शिकत नाहीत, तर ‘विकसित भारत’ ची संकल्पना प्रत्यक्षात आणणारे जबाबदार आणि माहितीपूर्ण नागरिक म्हणूनही घडत आहेत.”
या स्पर्धांमध्ये हायस्कूल, हायर सेकंडरी आणि उच्च शिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात रेडिओ जॉकी (आरजे) स्पर्धा, वादविवाद, रील क्रिएशन, आणि ‘मन की बात’ मधून प्रेरणा घेत तयार केलेले प्रकल्प सादरीकरण यांचा समावेश होता. या बहुआयामी स्वरूपाच्या कार्यक्रमातून युवा मंत्रालयाने युवकांच्या सर्वांगीण विकास, कौशल्य वृद्धी आणि नागरी सहभाग वाढवण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित केले.
'मन की बात' हा आकाशवाणीवर प्रसारित होणारा कार्यक्रम जगातील सर्वाधिक ऐकला जाणारा रेडिओ कार्यक्रम मानला जातो. तसेच भारतीय परंपरा, संस्कृती, इतिहास, स्वातंत्र्यसंग्राम, आणि सकारात्मक नागरी उपक्रम यांवर आधारित हे कार्यक्रम ज्ञानाचा एक अद्वितीय खजिना बनले आहेत. या समृद्ध सामग्रीचा लाभ घेऊन भारताच्या वारशाचा व प्रगतीचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना या स्पर्धेमधून मिळत आहे
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2144435)