युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय राज्य मंत्री रक्षा निखिल खडसे यांच्या नेतृत्वाखाली “एक पेड माँ के नाम 2.0”


माय भारत, राष्ट्रीय सेवा योजना आणि जिल्हा प्रशासनाच्या एकत्रित पुढाकाराने 2000 पेक्षा जास्त झाडांची लागवड, शाश्वततेचा दिला संदेश

Posted On: 05 JUL 2025 5:55PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी “एक पेड माँ के नाम” मोहिमेपासून प्रेरित होऊन, हरितकरण उपक्रमाचा दुसरा टप्पा “एक पेड माँ के नाम 2.0”  जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमाचे नेतृत्व भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या केंद्रीय राज्य मंत्री रक्षा निखिल खडसे यांनी केले.  या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सवकारे यांची तसेच महत्त्वाच्या शासकीय अधिकाऱ्यांची व स्थानिक जनतेची उपस्थिती लाभली.

या वृक्षारोपण अभियानाचे आयोजन युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, जिल्हा प्रशासन जळगाव आणि माय भारत, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या उपक्रमात 2000 पेक्षा अधिक स्थानिक जातीच्या झाडांची लागवड विद्यार्थी व स्वयंसेवकांनी केली. कडू बदाम, चिंच, नीम, आवळा, व शिसम यांसारख्या स्थानिक प्रजातींची लागवड करण्यात आली, जेणेकरून परिसरातील जैवविविधता वाढेल आणि मृदा धूप, भूजलपातळीतील घट, तसेच वनक्षेत्राच्या कमतरतेमुळे वाढत असलेल्या तापमानासारख्या पर्यावरणीय समस्यांना प्रभावीपणे सामोरे जाता येईल.

या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्य मंत्री रक्षा निखिल खडसे यांनी वृक्षारोपणाच्या सांस्कृतिक व पर्यावरणीय महत्त्वावर प्रकाश टाकला. तसेच त्या संत तुकाराम महाराज यांचे शब्द उद्धृत करत म्हणाल्या, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे, सगळे विश्वचि घर” आणि सर्व नागरिकांना आवाहन केले की, “झाडे लावा, झाडे वाचवा! आनंदी जीवनाचा संस्कार करा!”

या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे भुसावळमधील विविध शैक्षणिक संस्थांच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागांचा सक्रीय सहभाग आहे. यात पी.ओ. नाहटा कॉलेज, पी.के. कोठेचा महिला महाविद्यालय, चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय साकेगाव, डी.डी.एन. भोळे कॉलेज, गोदावरी नर्सिंग कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बियानी मिलिटरी स्कूल, आणि राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय यांचा समावेश होता. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे स्थानिक हरित अधोसंरचनेला बळ मिळाले आणि समाजाभिमुख पर्यावरणीय प्रयत्नांना चालना मिळाली.

एक पेड माँ के नाम 2.0” या उपक्रमाचा समारोप शाश्वत जीवनशैली, हवामान बदलावरील कृती आणि सामूहिक पर्यावरणीय जबाबदारी या संकल्पांसह झाला. या माध्यमातून आपल्या मातृभूमीचा आदर करणे, मातृभूमीचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे, हा संदेश पुन्हा अधोरेखित करण्यात आला.

***

S.Patil/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2142568)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil