लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

भारताची आरोग्यसेवा व्यवस्था ही गुणवत्तापूर्ण, सुलभतेने उपलब्ध असलेली आणि परवडणाऱ्या दरातली सेवा -  लोकसभेचे अध्यक्ष, ओम बिर्ला


भारत औषधनिर्मिती आणि वैद्यकीय संशोधनाचे जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहे  -  लोकसभेचे अध्यक्ष, ओम बिर्ला

लोकसभेचे अध्यक्ष, ओम बिर्ला यांनी इनोव्हेटिव्ह फिजिशियन फोरमच्या 7व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले

Posted On: 05 JUL 2025 4:42PM by PIB Mumbai

 

लोकसभेचे अध्यक्ष, ओम बिर्ला यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे आयोजित इनोव्हेटिव्ह फिजिशियन फोरमच्या  IPF MEDICON 2025 या 7व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. भारताची आरोग्यसेवा व्यवस्था गुणवत्तापूर्ण, सुलभतेने उपलब्ध असलेली आणि परवडणाऱ्या दरातली सेवा असल्याच्या शब्दांत ओम बिर्ला यांनी भारताच्या आरोग्य व्यवस्थेची  प्रशंसा केली आहे. आपल्या संबोधनात त्यांनी देशाने वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणाच्या बाबतीत केलेली महत्वाची प्रगती अधोरेखित केली. भारताने प्रयत्नपूर्वक आरोग्यसेवेची गुणवत्ता वाढवली आहे, आणि त्याचबरोबर आरोग्यविषयक सेवा सुविधा प्रत्येक नागरिकाच्या आवाक्यात असतील याचीही सुनिश्चिती केली असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यसेवा क्षेत्रात राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांमुळे आरोग्य विषयक सेवा सुविधा अधिक समावेशक आणि रुग्ण-केंद्रित झाल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. आरोग्य विषयक सेवा सुविधांचा प्रचार प्रसार, डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान आणि परवडणाऱ्या दरांमधले उपचार अशा सर्वच बाबतीत देशाने केलेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले. यातून आरोग्यसेवांविषयक एक भक्कम आणि न्याय्यपूर्ण परिसंस्था निर्माण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेलाही पाठबळ मिळाले असल्याचे ते म्हणाले.

आजच्या स्थितीत विकसित देशांना देखील आरोग्य क्षेत्राशी संबंधित वाढत असलेल्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे, अशा परिस्थितीत भारतीय डॉक्टर नवोन्मेषाची कास धरत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आपली जागतिक प्रतिष्ठा वाढवत आहेत असे ओम बिर्ला म्हणाले.  वैद्यकीय क्षेत्रातील नवे संशोधन, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाबद्दल व्यापक चर्चा घडवून आणण्याच्या दृष्टीने हा मंच एक महत्त्वाच्या व्यासपीठाची भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले. या चर्चांच्या माध्यमातून उत्तम आरोग्यसेवा व्यवस्थेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या साधनांचा उपयोग  कशा रितीने केला जाऊ शकतो, तसेच औषधोपचाराशी संबंधित विद्यमान आणि भविष्यातील आव्हाने कशी हाताळली जाऊ शकतात अशा महत्वाच्या विषयांवर या व्यासपीठाच्या माध्यमातून व्यापक चर्चा घडून येते असे ते म्हणाले. आज जगभरात भारतीय डॉक्टरांची प्रतिष्ठा आणि गुणवत्तेची दखल घेतली गेली असल्याचेही त्यांनी नमूद केले. मर्यादित संसाधने असतानाही, डॉक्टर, निमवैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या समर्पण, सेवा आणि त्याग भावनेमुळेच भारताला कोविड-19 सारखे जागतिक महामारीचे संकट प्रभावीपणे हाताळता आले, आणि नागरिकांना योग्य उपचार देता आले असे ते म्हणाले. या महामारीच्या काळातली भारताची कामगिरी ही भारताच्या आरोग्यसेवा व्यवस्थेच्या विश्वसनीयतेचे खरे उदाहरण असल्याचे ते म्हणाले.

पुढे त्यांनी नमूद केले की, भारत औषधनिर्माण आणि वैद्यकीय संशोधनासाठीचे केंद्र म्हणून विकसित होत आहे, औषध उत्पादन, लस निर्मिती आणि जैववैद्यकीय संशोधन क्षेत्रातील प्रगतीचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांनी  आनंद व्यक्त केला की, भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भारताचे कुशल वैज्ञानिक, मजबूत संशोधन पायाभूत सुविधा आणि नवोन्मेषावर असलेला भर स्थानिक तसेच जागतिक गरजांसाठी आरोग्यसेवा क्षेत्रात प्रगती घडवत आहेत. संशोधन आणि विकासासाठीच्या उपक्रमांबरोबरच आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य वाढवण्याचे प्रयत्न भारताच्या जागतिक आरोग्याच्या भविष्यातील भूमिकेला बळकटी देत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. तसेच भारत सरकार आरोग्य क्षेत्रात प्रगती करण्याचा गांभीर्याने प्रयत्न करत आहे. आयुष्मान भारतसारख्या उपक्रमांद्वारे संशोधन, नवकल्पना आणि गरजूंसाठी मोफत वैद्यकीय उपचार या सर्व बाबींवर विशेष भर दिला जात आहे.

त्याचबरोबर त्यांनी, वैद्यकीय क्षेत्रातील नवकल्पना आणि संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले आणि ही काळाची गरज आहे असे सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या झपाट्याने प्रगतीचा वापर उदयोन्मुख आरोग्य समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आणि रुग्णसेवा सुधारण्यासाठी करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. शिवाय नवकल्पनांचे संस्कार रुजवणे आणि वैद्यकीय संशोधनात गुंतवणूक करणे तसेच ही नवीन उपचार पद्धती विकसित करण्यासाठी व रोग प्रतिबंधात्मक उपाय वाढवण्यासाठी आणि एकूणच आरोग्य प्रणालीला बळकट करण्यासाठी ही नवीन उपचार पद्धती अत्यावश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोवर संस्थांनी, वैज्ञानिकांनी आणि धोरणकर्त्यांनी एकत्र येऊन जे केवळ भारतासाठीच नव्हे तर जागतिक समुदायासाठीही फायदेशीर ठरेल,असे महत्त्वपूर्ण शोध लावण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले.

परिषदेबद्दल बोलताना बिर्ला यांनी मत व्यक्त केले की, “ही परिषद केवळ एक कार्यक्रम नसून मानवसेवेचे जागतिक व्यासपीठ आहे. संशोधन, नवकल्पना आणि सहकार्याद्वारे आयपीएफ (आंतरराष्ट्रीय औषधनिर्मिती मंच) एक आरोग्यदायी समाज निर्माण करण्यासाठी योगदान देईल,“ असे त्यांनी सांगितले. या चर्चांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साधने, रोबोटिक्स आणि इतर आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान यांचा समावेश असावा आणि मानवी केंद्रित, कार्यक्षम आरोग्यसेवा प्रणाली कशी उभारता येईल यावर भर असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

नेपाळ, श्रीलंका, मलेशिया आणि इंग्लंड येथून आलेले वैद्यकीय प्रतिनिधी देखील या परिषदेत सहभागी झाले होते. तसेच खासदार कमलजीत सेहरावत यांनी सुद्धा यावेळी आपली उपस्थिती लावली.

***

S.Patil/T.Pawar/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2142567)