पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील भारतीय समुदायाला उद्देशून केलेले भाषण

Posted On: 04 JUL 2025 6:43AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान कमला प्रसाद बिस्सेसर जी

मंत्रिमंडळाचे सदस्य,

आज उपस्थित असलेले सर्व मान्यवर,

भारतीय समुदायाचे सदस्य,

बंधू आणि भगिनींनो,

नमस्कार!

सीता राम!

जय श्री राम!

तुमच्या काही लक्षात आले का... हा योगायोग आहे!

आज संध्याकाळी तुम्हा सर्वांसोबत असणे माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. पंतप्रधान कमला जी यांच्या अद्भुत आदरातिथ्याबद्दल आणि दयाळू शब्दांबद्दल मी त्यांचे आभार मानतो

मी काही काळापूर्वीच हमिंग बर्ड्सच्या या सुंदर भूमीत पोहोचलो. आणि, माझा पहिलाच कार्यक्रम येथे असलेल्या भारतीय समुदायाबरोबर आहे. हे अगदी नैसर्गिक वाटते. कारण शेवटी, आपण एकाच कुटुंबाचा भाग आहोत. तुमच्या प्रेमळ स्वागतासाठी आणि आपुलकीसाठी मी तुमचे आभार मानतो.

मित्रांनो,

मला माहित आहे की त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाची कहाणी धैर्याची आहे. तुमच्या पूर्वजांनी ज्या परिस्थितींचा सामना केला त्या कोणत्याही बलवान व्यक्तीला देखील तोडून टाकू शकल्या असत्या. परंतु त्यांनी आशेने संकटांचा सामना केला. त्यांनी चिकाटीने समस्यांना तोंड दिले.

त्यांनी गंगा आणि यमुना मागे सोडल्या पण रामायण आपल्या हृदयात वाहून नेले. त्यांनी त्यांची मातृभूमी सोडली, पण आपला आत्मा कधीच हरवला नाही. ते फक्त स्थलांतरित नव्हते. ते एका कालातीत संस्कृतीचे संदेशवाहक होते. त्यांच्या योगदानामुळेच या देशाला - सांस्कृतिक, आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या फायदा झाला आहे. या सुंदर राष्ट्रावर तुमच्या सर्वांचा काय प्रभाव पडला आहे त्यावर केवळ एक नजर टाका.

कमला प्रसाद-बिस्सेसर जी - या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान. महामहिम क्रिस्टीन कार्ला कंगालू जी - महिला राष्ट्रपती. एका शेतकऱ्याचे पुत्र स्वर्गीय श्री बासदेव पांडे पंतप्रधान आणि एक आदरणीय जागतिक नेते बनले. प्रख्यात गणितज्ञ रुद्रनाथ कॅपिलदेव, संगीत क्षेत्रातील आयकॉन सुंदर पोपो, क्रिकेटपटू डॅरेन गंगा आणि समुद्रात मंदिर उभारणारे श्रद्धावान सेवादास साधू. यशस्वी व्यक्तींची यादी खूप मोठी आहे.

तुम्ही गिरमितीया लोकांची संतती, आता संघर्षाने तुमची व्याख्या केली जात नाही, तर तुम्ही तुमच्या यशाने, तुमच्या सेवेने आणि तुमच्या मूल्यांनी परिभाषित होत आहात. खरे सांगायचे तर, "डबल्स" आणि "दाल पुरी" मध्ये काहीतरी जादू असायला हवी - कारण तुम्ही या महान राष्ट्राच्या यशातही डबलभर घातली आहे!

मित्रांनो,

मी जेव्हा 25 वर्षांपूर्वी येथे आलो होतो तेव्हा आपण सर्वजण ब्रायन लाराच्या कव्हर ड्राइव्ह आणि पुल शॉट्स पाहून भारावून जायचो. आज, सुनील नारायण आणि निकोलस पूरन हे आपल्या तरुणांच्या हृदयात तोच उत्साह निर्माण करतात. तेव्हापासून आणि आतापर्यंत, आपली मैत्री आणखी मजबूत झाली आहे.

बनारस, पटणा, कोलकाता, दिल्ली ही केवळ भारतातील शहरे नाहीत तर ती येथील रस्त्यांची नावे देखील आहेत. नवरात्र, महाशिवरात्री, जन्माष्टमी येथे आनंदाने, श्रद्धेने आणि अभिमानाने साजरी केली जाते. चौताल आणि बैठक गान येथे अजूनही जिवंत आहेत.

माझ्या परिचयातील अनेक चेहऱ्यांवर मी माझ्या स्वागताचा आनंद पाहू शकत आहे. तसेच मला तरुण पिढीच्या तेजस्वी डोळ्यांत कुतूहल दिसते - जाणून घेण्याची आणि एकत्र पुढे जाण्याची उत्सुकता. खरोखर, आपले बंध भूगोलाच्या आणि पिढ्यांच्या पलीकडचे आहेत.

मित्रांनो,

मला माहित आहे की प्रभू श्रीरामांवर तुमची गाढ श्रद्धा आहे.

एक सौ अस्सी साल बीतल हो, मन न भुलल हो, भजन राम के, हर दिल में गूंजल हो।

सांग्रे ग्रांडे आणि डो व्हिलेजमधील रामलीला खरोखरच अनोख्या असल्याचे सांगितले जाते. श्री रामचरित मानस सांगते,

राम धामदा पुरी सुहावनि।

लोक समस्त बिदित अति पावनि।।

याचा अर्थ असा की, प्रभु श्रीरामांची पवित्र नगरी इतकी सुंदर आहे की तिची कीर्ती जगभर पसरलेली आहे. मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी 500 वर्षांनंतर राम लल्लाचे अयोध्येत झालेले पुनरागमन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले असेल.

आम्हाला आठवते की, तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी पवित्र जल आणि शिला पाठवले होत्या. अशाच भक्तीने मी देखील येथे काहीतरी घेऊन आलो आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराची एक प्रतिकृती आणि शरयू नदीचे पाणी इथे आणण्याचा सन्मान मला मिळाला आहे.

जन्मभूमि मम पुरी सुहावनि ।

उत्तर दिसि बह सरजू पावनि ।।

जा मज्जन ते बिनहिं प्रयासा ।

मम समीप नर पावहिं बासा ।।

प्रभु श्रीराम म्हणतात की अयोध्येच्या वैभवाचा उगम पवित्र शरयू नदीतून होता. जो कोणी शरयू नदीच्या पाण्यात स्नान करतो त्याला खुद्द श्रीरामांशी शाश्वत एक रुपया प्राप्त झाले.

शरयू जी आणि पवित्र संगमाचे हे पाणी श्रध्देचे अमृत आहे. ही अशी प्रवाही धारा आहे, जी आपली मुल्ये…..आपले संस्कार यांना कायम जीवंत ठेवते.

तुम्हा सर्वांना माहिती आहे की या वर्षाच्या सुरुवातीला जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक मेळावा, महाकुंभ पार पडला. महाकुंभातील पाणी माझ्यासोबत घेऊन जाण्याचा मान मला मिळाला आहे. मी कमलाजींना विनंती करतो की त्यांनी अयोध्येतील शरयू नदीचे पवित्र पाणी आणि महाकुंभाचे पवित्र जल येथील गंगा धारेत अर्पण करावे. हे पवित्र पाणी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लोकांना आशीर्वाद देईल, अशी मी प्रार्थना करतो.

मित्रांनो,

आम्हाला आमच्या डायस्पोराच्या शक्ती आणि पाठिंब्याची खूप कदर आहे. जगभरात पसरलेल्या ३५ दशलक्षाहून अधिक लोकांसह, भारतीय डायस्पोर हा आमचा अभिमान आहे. मी अनेकदा म्हटल्याप्रमाणे, तुमच्यापैकी प्रत्येकजण राष्ट्रदूत आहे - भारताच्या मूल्यांचे, संस्कृतीचे आणि वारशाचे राजदूत.

या वर्षी, जेव्हा आपण भुवनेश्वरमध्ये प्रवासी भारतीय दिनाचे आयोजन केले होते, तेव्हा महामहिम राष्ट्रपती क्रिस्टीन कार्ला कंगालू आमच्या प्रमुख पाहुण्या होत्या. काही वर्षांपूर्वी, पंतप्रधान कमला प्रसाद-बिस्सेसर जी यांनी त्यांच्या उपस्थितीने आम्हाला सन्मानित केले होते.

प्रवासी भारतीय दिवसाच्या कार्यक्रमात, मी जगभरातील गिरमिटिया समुदायाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली होती. आम्ही भूतकाळाचे मानचित्रण  करत आहोत आणि उज्ज्वल भविष्यासाठी लोकांना एकत्र आणत आहोत. आम्ही गिरमिटिया समुदायाचा एक व्यापक डेटाबेस तयार करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत. भारतातील त्या गावांचे आणि शहरांचे दस्तऐवजीकरण करणे, जिथून त्यांचे पूर्वज स्थलांतरित झाले , ते जिथे स्थायिक झाले आहेत ती ठिकाणे ओळखणे, गिरमिटिया पूर्वजांच्या वारशाचा अभ्यास करणे आणि त्यांचे संवर्धन  करणे तसेच  नियमितपणे जागतिक गिरमिटिया संमेलने  आयोजित करण्यासाठी काम करत आहोत. यामुळे त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील आमच्या बंधू आणि भगिनींसोबतच्या घनिष्ठ आणि ऐतिहासिक संबंधांना देखील समर्थन मिळेल.

आज, मला हे घोषित  करताना आनंद होत आहे की त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाच्या  सहाव्या पिढीला आता ओसीआय कार्ड दिले जातील. तुम्ही केवळ  रक्ताचे नाते  किंवा आडनावाने जोडलेले नाही आहात. तुम्ही आपलेपणाच्या भावनेने जोडलेले आहात. भारताचे  तुमच्याकडे लक्ष आहे, भारत तुमचे स्वागत करतो आणि भारत तुम्हाला आलिंगन देतो.

मित्रांनो,

पंतप्रधान कमला जी यांचे पूर्वज बिहारमधील बक्सर येथे राहत होते. कमला जी देखील तिथे येऊन गेल्या आहेत.... लोक त्यांना बिहारची कन्या मानतात.

भारतातील लोक पंतप्रधान कमला जी यांना बिहारची कन्या मानतात.

मित्रहो,

येथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांचे पूर्वज बिहारमधून आले होते. बिहारचा वारसा ... भारताबरोबरच  जगाचा देखील गौरव आहे. लोकशाही असो, राजकारण असो, मुत्सद्देगिरी  असो किंवा उच्च शिक्षण असो...अनेक शतकांपूर्वी बिहारने अशा अनेक विषयांमध्ये जगाला एक नवीन दिशा दाखवली होती. मला विश्वास  आहे की 21 व्या शतकातील जगासाठी देखील बिहारच्या भूमीतून नवीन प्रेरणा आणि नवीन संधी निर्माण होतील.

मला विश्वास आहे की जेव्हा भारताचा विकास होतो तेव्हा तुमच्यातील प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटतो. नवीन भारतासाठी, आकाश देखील सीमा नाही. भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरले तेव्हा तुम्हा सर्वांना देखील खूप आनंद झाला असेल. ज्या ठिकाणी ते उतरले, त्याला आम्ही शिवशक्ती बिंदू असे नाव दिले आहे.

तुम्हीही अलिकडेच ही बातमी ऐकली असेल. आता आपण बोलत असताना एक भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उपस्थित  आहे. आपण आता गगनयान या मानवयुक्त अंतराळ मोहिमेवर काम करत आहोत . तो काळ दूर नाही जेव्हा एक भारतीय चंद्रावर पाऊल ठेवेल आणि भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक असेल.

आपण आता फक्त तारे मोजत नाही... आदित्य मिशनच्या रूपाने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आपल्यासाठी आता चांदोमामा दूर राहिले नाहीत. आपण आपल्या कठोर परिश्रमाने अशक्य ते शक्य करत आहोत.

भारताचे अंतराळातील यश केवळ आमचे  नाही. त्याचे लाभ आम्ही जगासोबत सामायिक करत आहोत.

मित्रहो,

भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. लवकरच, आम्ही  जगातील आघाडीच्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सामील होऊ. भारताच्या विकासाचे आणि प्रगतीचे लाभ  सर्वात गरजू लोकांपर्यंत पोहोचत आहे.

गरिबांना सक्षम बनवून , सशक्त बनवून गरीबीवर मात करता येते हे भारताने दाखवून दिले आहे. पहिल्यांदाच, कोट्यवधी लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे की भारत गरीबीपासून मुक्त होऊ शकतो.

गेल्या दशकात भारताने 25 कोटींहून अधिक लोकांना दारिद्र्यरेषेतून  बाहेर काढले आहे, असे जागतिक बँकेने नमूद केले आहे. भारताच्या विकासाला आपल्या नवोन्मेषी  आणि उत्साही तरुणाईची साथ लाभत आहे.

आज, भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे स्टार्टअप केंद्र आहे. यापैकी जवळजवळ निम्म्या स्टार्टअप्समध्ये देखील महिला संचालक आहेत. सुमारे  120 स्टार्टअप्सना युनिकॉर्न दर्जा मिळाला आहे. एआय, सेमीकंडक्टर आणि क्वांटम कम्प्युटिंगसाठी  राष्ट्रीय अभियान विकासाचे  नवीन इंजिन बनत आहे. एक प्रकारे,नवोन्मेष  एक लोकचळवळ बनत आहे.

भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय ) ने डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती घडवून आणली आहे. जगातील सुमारे   50% रिअल-टाइम डिजिटल व्यवहार भारतात होतात. मी त्रिनिदाद आणि टोबॅगोचे अभिनंदन करतो कारण युपीआय स्वीकारणारा या प्रदेशातील हा पहिला देश आहे.  आता पैसे पाठवणे 'सुप्रभात ' संदेश  पाठवण्याइतके सोपे होईल ! आणि मी वचन देतो की ते वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीपेक्षाही वेगवान असेल.

मित्रहो,

आमचे उत्पादन अभियान भारताला उत्पादन केंद्र बनवण्यासाठी काम करत आहे. आम्ही जगातील दुसऱ्या क्रमांकाचे  सर्वात मोठे मोबाइल उत्पादक बनलो आहोत. आम्ही जगाला रेल्वे इंजिन  निर्यात करत आहोत.

गेल्या दशकात आमची संरक्षण निर्यात  20 पटीने वाढली आहे. आम्ही केवळ  भारतात उत्पादन करत नाही . आम्ही जगासाठी उत्पादन करत आहोत. आम्ही जसजसे पुढे जात आहोत  तसतसे आम्ही जगाच्या परस्पर फायद्याचा देखील विचार करत आहोत.

मित्रहो,

आजचा भारत ही संधींची भूमी आहे. व्यवसाय असो, पर्यटन असो, शिक्षण असो किंवा आरोग्यसेवा असो, भारताकडे देण्यासारखे बरेच काही आहे.

तुमच्या पूर्वजांनी इथे पोहचण्यासाठी समुद्र पार करून 100 दिवसांहून अधिक मोठा आणि कठीण प्रवास केला - साता समुद्रापार ! आज, तोच प्रवास अवघ्या  काही तासांमध्ये होतो. मी तुम्हा सर्वांना केवळ सोशल मीडियावर व्हर्च्युअली नव्हे तर प्रत्यक्ष भारताला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करतो!

तुमच्या पूर्वजांच्या गावांना भेट द्या. ते  ज्या मातीतून चालले होते त्या मातीत चाला. तुमच्या मुलांना सोबत घेऊन या, तुमच्या शेजाऱ्यांना घेऊन या. चहा आणि चांगली गोष्ट आवडणाऱ्या सर्वांना घेऊन या. आम्ही तुमचे सर्वांचे  मोकळ्या मनाने , अगत्यपूर्ण  आणि जिलबी भरवून  स्वागत करू !

या शब्दांसह, तुम्ही माझ्याप्रति दाखवलेल्या प्रेम आणि आपुलकीबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

मी विशेषतः पंतप्रधान कमला जी यांचे मला  सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल  आभार मानतो.

खूप खूप धन्यवाद.

नमस्कार!

सीता राम!

जय श्री राम!

***

M.Jaybhaye/S.Mukhedkar/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2142427)