वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

153 देश भारतातून  खेळणी आयात  करत आहेत : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल

Posted On: 04 JUL 2025 7:54PM by PIB Mumbai

 

एकेकाळी आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेला भारतातील खेळणी उद्योग आता देशांतर्गत उत्पादन करत आहे आणि 153 देशांमध्ये निर्यात करत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे 16 व्या टॉय बिझ इंटरनॅशनल बी 2 बी एक्स्पो 2025 ला संबोधित करताना या उल्लेखनीय परिवर्तनावर प्रकाश टाकला. सातत्यपूर्ण धोरणात्मक पाठबळ, गुणवत्ता मानकांची अंमलबजावणी आणि स्थानिक उत्पादन समूहांचे बळकटीकरण यामुळे हा बदल शक्य झाल्याचे ते म्हणाले. गुणवत्ता नियंत्रण आदेशाच्या अंमलबजावणीमुळे भारताला गुणवत्तेबाबत जागरूक देश बनवण्यासाठी मदत झाली, तसेच देशांतर्गत खेळणी उत्पादक जागतिक मानकांची पूर्तता करण्यासाठी सक्षम बनले, असेही ते म्हणाले.

भारताची 1.4  अब्ज लोकसंख्या मोठी बंदिस्त बाजारपेठ उपलब्ध करून देते, ज्यामुळे उत्पादन वाढवण्यासाठी नैसर्गिक लाभ मिळतो. या मोठ्या प्रमाणामुळे, उद्योग कमी खर्चात अधिक उत्पादन क्षमता प्राप्त करू शकतो आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनू शकतो, असे ते म्हणाले.

जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी उद्योगाने चांगले ब्रँडिंग, आकर्षक पॅकेजिंग आणि मजबूत उत्पादन डिझाइनवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे गोयल यांनी संगितले. या तिन्ही पैलूंना प्राधान्य दिले गेले, तर भारतीय खेळणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय होऊ शकतील, असे ते म्हणाले. 

गोयल म्हणाले की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे खेळण्यांच्या नवोन्मेशी संकल्पना विकसित करणाऱ्या स्टार्टअप्सना लक्षणीय पाठिंबा मिळाला असून, त्याचा कालावधी आता 20 वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे छोट्या व्यावसायिकांना विनातारण कर्ज उपलब्ध झाले आहे, असे ते म्हणाले.

ही प्रगती पुढे नेण्यासाठी सरकार खेळणी क्षेत्रासाठी एक नवीन प्रोत्साहन योजना आणण्याचा विचार करत आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की, ही योजना भारतीय खेळणी उत्पादकांना डिझाइन क्षमता वाढवून, दर्जेदार उत्पादन सुनिश्चित करून, पॅकेजिंग मजबूत करून आणि ब्रँड बिल्डिंगला पाठबळ देऊन जागतिक दर्जाचे बनायला सहाय्य करेल.

नवोन्मेष, गुणवत्ता आणि बाजारपेठ विकासावर सातत्याने लक्ष केंद्रित करत, भारताचा खेळणी उद्योग जागतिक बाजारपेठेत आघाडीची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहे, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2142366) Visitor Counter : 3
Read this release in: English , Hindi , Urdu , Tamil