युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी बीएमपीएस 2025 मध्ये  ईस्पोर्ट्सच्या क्षमतेचे महत्त्व केले अधोरेखित


बीएमपीएस 2025 मधील  खडसेंच्या भेटीने दिले भारतातील स्पर्धात्मक गेमिंगसाठी नव्या युगाचे संकेत

Posted On: 04 JUL 2025 5:08PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे  आज द्वारका येथील यशोभूमी, इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर येथे आयोजित बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया प्रो सिरीज (BMPS) 2025 च्या भव्य महाअंतिम सोहळ्यात उपस्थित राहिल्या. 4 ते 6 जुलै दरम्यान आयोजित तीन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी मंत्र्यांनी दिलेली ही भेट, तसेच भारतातील  आघाडीच्या 16  BGMI व्यावसायिक संघांमध्ये ₹4 कोटींच्या बक्षीस रकमेसाठी सुरू असलेली स्पर्धा, यातून भारत सरकारकडून स्पर्धात्मक गेमिंगला (esports) मुख्य प्रवाहातील एक क्रीडा प्रकार म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळत असल्याचे स्पष्ट होते.

खडसे यांनी स्पर्धा स्थळाला भेट दिली आणि सहभागी ई-स्पोर्ट्स खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रसारणाच्या व्यवस्थापनासह तांत्रिक आणि लॉजिस्टिक व्यवस्थांचे निरीक्षण केले.

या भेटीदरम्यान, खडसे यांनी ई-स्पोर्ट्स आणि पारंपरिक खेळांमधील समानता अधोरेखित केली, दोन्हीसाठी शिस्त, मानसिक लवचिकता आणि सांघिक कार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. "ई-स्पोर्ट्स भारतातील तरुणांना वेगाने बदलणाऱ्या डिजिटल जगात उत्कृष्ट कामगिरी करण्यास प्रेरणा देत आहे," असे त्या म्हणाल्या.

भारत सरकारने डिसेंबर 2022 मध्ये राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे स्पर्धात्मक गेमिंगला युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या कक्षेत आणून औपचारिकपणे ई-स्पोर्ट्सला मान्यता दिली. फेब्रुवारी 2025 मध्ये, मंत्रालयाने ऑलिंपिक आणि राष्ट्रकुल पदक विजेत्यांसाठी राखीव असलेला त्यांचा रोख रक्कम-प्रोत्साहन कार्यक्रम ई-स्पोर्ट्स खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना देखील लागू केला. सध्या, नियामक देखरेख युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात विभागली गेली आहे, यामुळे क्रीडा आणि डिजिटल प्रशासनासाठी धोरणात्मक चौकट संरेखित होते. भारतातील ई-स्पोर्ट्स खेळाडूंनी सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या आगामी ऑलिंपिक ई-स्पोर्ट्स गेम्स 2027 सारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर लक्ष केंद्रित केले असल्याने हा संरचित दृष्टिकोन महत्त्वपूर्ण आहे.

गेल्या काही वर्षांत ई-स्पोर्ट्समधील युवा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक अभ्यास आणि अहवालानुसार, लाखो भारतीय युवक विविध क्षमतेने ई-स्पोर्ट्समध्ये भाग घेत आहेत. ही वाढ भारतातील तरुण पिढीमध्ये ई-स्पोर्ट्सच्या वेगाने झालेल्या मुख्य प्रवाहाचे प्रतिबिंब आहे.

बीएमपीएस 2025 महाअंतिम फेरी ही भारतीय ई-स्पोर्ट्ससाठी एक महत्त्वपूर्ण क्षण दर्शवत आहे, ज्यामुळे स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन मिळत आहे आणि उद्योगातील सहकार्याला चालना मिळत आहे. ही स्पर्धा व्यावसायिक खेळाडूंना त्यांची कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी, उत्साही चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी आणि भारतातील स्पर्धात्मक गेमिंगच्या वेगाने विकसित होत असलेल्या परिदृश्यात योगदान देण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ प्रदान करत आहे.

***

S.Kane/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2142360) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil