सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितन राम मांझी यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयाला दिली भेट

Posted On: 03 JUL 2025 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जुलै 2025

 

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितन राम मांझी यांनी आज दि. 03 जून रोजी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला प्रथमच  भेट दिली. या भेटीत त्यांनी आयोगाच्या कामकाजाला बळकटी देण्यासाठी भविष्यातील मार्गदर्शक आराखड्याच्या अनुषंगाने आयोगाची आजवरची कामगिरी, यश आणि भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला.

यावेळी मांझी यांनी मंत्रालयाच्या तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोग आणि नारळी तंतू मंडळाच्या (कॉयर बोर्ड) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उदरनिर्वाहासाठी ग्रामीण भागाच्या तळागाळापर्यंत संबंध मजबूत करण्याविषयी मुद्दे निहाय सविस्तर चर्चा केली. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या एकूण कामगिरीबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. यावेळी केंद्रीय मंत्री मांझी यांनी खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या चरख्यावरील सूतकताईसाठी स्थानिक पातळीवर उत्तम प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीवर भर असलेले अधिक व्यापक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी विशेषकरून प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासारख्या प्रमुख योजनेवर चर्चा केली आणि या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचनाही दिल्या.

   

देशात आत्मनिर्भरतेच्या भावनेला बळकटी देणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने कोट्यवधी कारागिरांच्या जीवनात आशेचा नवा किरण आणला असल्याच्या शब्दांत त्यांनी आयोगाची प्रशंसाही केली.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूप राशी यांनी केंद्रीय मंत्री मांझी यांच्यासमोर खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे आजवरचे ठळक यश आणि प्रगतीविषयी सादरीकरण केले, आणि मांझी यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली नवी उंची गाठण्याचे आश्वासन दिले.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयात झालेल्या या बैठकीला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री, कॉयर बोर्ड  आणि खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

* * *

S.Kane/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2141979)
Read this release in: Urdu , English , Hindi