दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या हस्ते व्हीव्हीडीएन इनोव्हेशन पार्क येथे एरिक्सनच्या भारतात निर्मित पहिल्या अँटेना सुविधेचे उद्घाटन
Posted On:
30 JUN 2025 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2025
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी आज मानेसर येथील व्हीव्हीडीएनच्या ग्लोबल इनोव्हेशन पार्क येथे एरिक्सनच्या अत्याधुनिक अँटेना उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले.
उद्घाटन समारंभात केंद्रीय मंत्र्यांनी सुविधेचे उद्घाटन केले आणि त्यानंतर प्रेक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अत्याधुनिक अँटेना उत्पादन बाबत दोन मिनिटांचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
भारताच्या डिजिटल आणि निर्मिती प्रवासातील हा एक महत्त्वाचा क्षण असल्याचे नमूद करत सिंधिया म्हणाले, "हा केवळ एका उत्पादन युनिटचा प्रारंभ नाही तर अशा सुविधेचा उदय आहे जी उद्याच्या नेटवर्कला बळ देईल आणि जगभरातील कोट्यवधी लोकांना जोडेल. यातून भारताच्या क्षमतांवरील जागतिक विश्वास आणि भारताचा त्याच्या भविष्यावरील वाढता विश्वास दिसून येतो."

केंद्र सरकारचा व्यापक दृष्टिकोन अधोरेखित करत सिंधिया म्हणाले, "येथे जागतिक तंत्रज्ञान भारतीय कल्पकतेशी एकरूप होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, 'मेक इन इंडिया' अभियानाचे रूपांतर 'मेक फॉर द वर्ल्ड' चळवळीत होत आहे."
भारताच्या दूरसंचार क्षेत्रावरील जागतिक तंत्रज्ञान भागीदारीच्या परिवर्तनात्मक प्रभावावर भर देताना, केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले की एरिक्सन, अॅपल, गुगल आणि क्वालकॉम सारख्या कंपन्यांकडून होणारी जागतिक गुंतवणूक वित्तीय योगदानापेक्षा अधिक आहे. "ती अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाची उत्पादन मानके आणि आपल्या अभियंत्यांसाठी व्यापक प्रशिक्षण क्षमता घेऊन येतात" असे ते म्हणाले. जागतिक स्तरावर भारतीय प्रतिभेचे स्थान निर्माण करण्यात हे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे.
“पुढील दोन दशकांमध्ये भारत आपल्या अमृत काळाकडून शताब्दी काळाकडे संक्रमण करत असताना हा प्रवास केवळ भारताला नव्हे तर भारताद्वारे जगाला बदलण्यास मदत करेल.” असे त्यांनी सांगितले, एरिक्सन आणि व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीज यांच्या सहकार्याने विकसित केलेली ही सुविधा जागतिक बाजारपेठांसाठी भारतात पॅसिव्ह अँटेनाची निर्मिती करणारी एरिक्सनची पहिली सुविधा आहे. जुलै 2025 मध्ये पहिली खेप पाठवली जाण्याची शक्यता आहे. ही एक अनोखी सुविधा आहे, जिथे देशांतर्गत बाजारपेठेसाठी कठोर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करण्यासाठी अँटेना उत्पादनाचे 50% पेक्षा जास्त काम स्थानिक पातळीवर केले जाईल, आणि भारताला एक विश्वासार्ह जागतिक निर्मिती आणि नवोन्मेष केंद्र बनण्याला बळ मिळेल.

केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी या परिवर्तनाचे श्रेय भारताच्या सक्षम धोरण परिसंस्थेला दिले. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेच्या यशाचा उल्लेख करताना त्यांनी नमूद केले की यामुळे 4,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आकर्षित झाली आहे, उत्पादनातून 80,000 कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे आणि 34,000 हून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. उदार एफडीआय धोरणे आणि क्षेत्रीय सुधारणांमुळे वर्ष 2000 पासून 39 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परकीय गुंतवणूक झाली आहे आणि भारताच्या जीडीपीमध्ये दूरसंचार क्षेत्र आता जवळपास 7% योगदान देत आहे.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140945)