पंतप्रधान कार्यालय
नवी दिल्ली येथे विज्ञान भवनामध्ये आयोजित आचार्य श्री विद्यानंद महाराज यांच्या शताब्दी कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
Posted On:
28 JUN 2025 2:18PM by PIB Mumbai
ओम नमः, ओम नमः, ओम नमः !!
परम श्रध्देय आचार्य प्रज्ञ सागर महाराज जी, श्रवण बेळगोळच्या मठाचे मठाधिपती स्वामी चारूकीर्ती जी, माझे सहकारी गजेंद्रसिंह शेखावत, संसदेतील माझे सहकारी नवीन जैन, भगवान महावीर अहिंसा भारती न्यासाचे अध्यक्ष प्रियंक जैन, सचिव ममता जैन, विश्वस्त पीयूष जैन आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, संतवर्ग, भगिनी आणि सद्गृहस्थ हो, जय जिनेंद्र!
आज आपण सर्वजण भारताच्या आध्यात्म परंपरेचे एक महत्वपूर्ण साक्षीदार बनत आहोत. पूज्य आचार्य श्री विद्यानंद जी मुनिराज, यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित या पुण्यपर्वामध्ये त्यांच्या अमर प्रेरणांनी ओतप्रोत भरलेला हा कार्यक्रम म्हणजे एक अभूतपूर्व प्रेरणादायी वातावरण निर्मिती करणारा ठरत आहे आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम आपल्या सर्वांना भरपूर प्रोत्साहन दणारा आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांबरोबरच ऑनलाइन व्यवस्थेच्या माध्यमातून लक्षावधी लोक जोडले गेले आहेत. आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. आज इथे येण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो.
मित्रांनो,
आजचा हा दिवस आणखी एका कारणामुळे खूप विशेष ठरतो. वर्ष 1987 मध्ये 28 जून म्हणजे आजच्या तारखेलाच आचार्य श्री विद्यानंद जी मुनिराज यांना आचार्य पदाची उपाधी प्राप्त झाली होती. आणि हा काही फक्त एक सन्मान नव्हता तर जैन परंपरेला विचार, संयम आणि करूणा यांनी जोडणारा एक पवित्र प्रवाह प्रवाहीत झाला. आज ज्यावेळी आपण त्यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम करीत आहोत, त्यावेळी ही तारीख आपल्याला त्या ऐतिहासिक क्षणांचे स्मरण करून देत आहे. या प्रसंगी मी आचार्य श्री विद्यानंद जी मुनिराज यांच्या चरणी वंदन करतो. त्यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांना कायम मिळत रहावा, अशी प्रार्थनाही करतो.
मित्रांनो,
श्री विद्यानंद जी मुनिराज यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन करणे, ही गोष्ट काही सामान्य नाही. यामध्ये एका संपूर्ण युगाच्या स्मृती आहेत. एका तपस्वी जीवनाचा प्रतिध्वनी आहे. आजच्या या ऐतिहासिक प्रसंगाला अमर बनविण्यासाठी, विशेष स्मरण नाण्यांचे तसेच टपाल तिकिटाचे प्रकाशन केले गेले आहे. यासाठीही मी सर्व देशवायियांचे अभिनंदन करतो. यावेळी मी विशेषत्वाने आचार्य श्री प्रज्ञ सागर जी यांचे अभिनंदन करतो, त्यांना वंदन करतो. आपल्या मार्गदर्शनाखाली आज कोट्यवधी अनुयायी पूज्य गुरूदेव यांनी सांगितलेल्या मार्गावर पुढे जात आहेत. आज या प्रसंगी आपण मला ‘धर्म चक्रवर्ती’ अशी उपाधी देण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यासाठी मी स्वतःला तितके पात्र आहे, असे समजत नाही. परंतु आपले संस्कार असे आहेत की, आपल्याला संतांकडून जे काही मिळते, ती गोष्ट त्यांच्याकडून मिळालेला प्रसाद आहे, असे समजून त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि म्हणूनच, मी आपल्याकडून मिळणा-या या प्रसादाचा विनम्रतेने स्वीकार करतो आणि भारत मातेच्या चरणी मी हा सन्मान समर्पित करतो.
मित्रांनो,
ज्या दिव्य आत्म्याच्या वाणीला, त्यांच्या वचनांना, आपण जीवनभर ‘गुरू वाक्य‘ मानून त्यातून मिळणारे ज्ञान घेतो, ज्यांच्याबरोबर आपण अगदी हृदयापासून, मनःपूत भावनेने जोडले जात आहे, त्यांच्याविषयी काहीही बोलायचे म्हटले तरी, मी भावूक होत आहे. आत्ताही मी विचार करतो की, श्री विद्यानंद जी मुनिराज यांच्याविषयी बोलण्याऐवजी जर आपल्याला आज त्यांचेच विचार ऐकण्याचे सद्भाग्य मिळाले असते तर? अशा महान व्यक्तित्वाचा जीवन प्रवास शब्दांमध्ये सांगणे, म्हणजे काही सोपे काम नाही. 22 एप्रिल, 1925 रोजी कर्नाटकच्या पवित्र भूमीवर ते अवतरले. त्यांचे आध्यात्मिक नामकरण झाले आणि ते विद्यानंद बनले. त्यांचे जीवन म्हणजे, शिक्षण आणि आनंद यांचा अव्दितीय संगम होता. त्याच्या वाणीमध्ये गंभीर ज्ञान होते. मात्र ते शब्द इतके सरळ, सोपे वापरत होते की, प्रत्येकाला ते सहज समजू शकत होते. 150 पेक्षा जास्त ग्रंथांचे त्यांनी लेखन केले. हजारो किलोमीटरची पदयात्रा केली. लाखो युवकांना संयम आणि संस्कृती यांच्याशी जोडण्याचा महायज्ञ त्यांनी केला. आचार्य श्री विद्यानंद मुनिराज युगपुरूष होते, युगद्रष्टा होते. माझे सद्भाग्य म्हणजे, मला त्यच्या आध्यात्मिक वलयाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळत गेली. वेळोवेळी ते मला विविध विषयांवर मार्गदर्शनही करीत होते. आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच मला मिळत राहिला. आज त्यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचा हा मंच आहे. आणि इथेही मला त्यांच्या प्रेमळपणाची, आपलेपणाची भावना अनुभवायला मिळत आहे.
मित्रांनो,
आपल्या भारताची म्हणजे, या देशाची अवघ्या विश्वात सर्वात प्राचीन जीवंत संस्कृती आहे. आपण हजारों वर्षांपासून अमर आहे, याचे कारण म्हणजे आपले विचार अमर आहेत. त्या विचारांमागे आपले चिंतन आहे, आपले तत्वज्ञान अमर आहे. आणि या तत्वज्ञानाचे स्त्रोत म्हणजे - म्हणजे आपले ऋषी, मुनी, संत आणि आचार्य! आचार्य श्री विद्यानंद जी मुनिराज भारताच्या या महान परंपरेतील आधुनिक प्रकाश स्तंभ आहेत. कितीतरी विषयांमध्ये त्यांनी विशेषज्ञ बनण्याइतके ज्ञान घेतले होते. कितीतरी क्षेत्रांमध्ये त्यांनी ज्ञान ग्रहण केले होते. त्यांचे प्रखर आध्यात्मिक ज्ञान त्यांच्या ग्रंथातून दिसून येते. कन्नड, मराठी, संस्कृत आणि प्राकृत यासारख्या विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. आणि आत्ताच ज्याप्रमाणे पूज्य महाराज जी, म्हणाले, ‘18 भाषांचे ज्ञान, त्याव्दारे केलेली साहित्य आणि धर्माची सेवा, त्यांची संगीत साधना, राष्ट्रसेवेसाठी त्यांनी केलेले समर्पण, त्यांच्या जीवनकार्याकडे पाहिल्यावर लक्षात येते, त्यांनी आपल्या कार्याने प्रत्येक क्षेत्रात महान कार्य करून आदर्शांचे शिखर गाठले आहे. यातून एकही क्षेत्र सुटले नाही! ते एक महान संगीतज्ज्ञही होते. ते एक प्रखर राष्ट्रभक्त आणि स्वातंत्र्य सेनानीही होते आणि ते एक निःस्पृह दिगंबर मुनीही होते. ते विद्या आणि ज्ञानाचे भांडारही होते, आणि ते आध्यात्मिक आनंदाचे कंद होते. मला असे वाटते की, सुरेंद्र उपाध्याय ते आचार्य श्री विद्यानंद मुनिराज बनण्याचा त्यांचा प्रवास म्हणजे सामान्य मानव ते महामानव बनण्याची यात्रा आहे. आपले भविष्य म्हणजे आपल्या वर्तमान जीवनाच्या मर्यादेमध्ये बांधले गेलेले नसते, या गोष्टीची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते. आपली दिशा कोणती आहे, आपले लक्ष्य काय आहे आणि आपले संकल्प काय आहेत, अशा गोष्टीने आणि त्यावर आपले भविष्य निश्चित होते, हेही आचार्य मुनिराज यांनी दाखवून दिले.
मित्रांनो,
आचार्य श्री विद्यानंद मुनिराज यांनी आपले जीवन फक्त साधनेइतकेच मर्यादित ठेवले नाही. त्यांनी जीवनाला समाज आणि संस्कृतीच्या पुनर्निर्माणाचे माध्यम बनवले. प्राकृत भवन आणि अनेक संशोधन संस्थांची स्थापना करून त्यांनी ज्ञानाच्या दीपशिखेला नवीन पिढीपर्यंत पोहोचवले. त्यांनी जैन इतिहासालाही त्याची योग्य ओळख निर्माण करून दिली. ‘जैन दर्शन’ आणि ‘अनेकांतवाद‘ यासारख्या मौल्यवान ग्रंथांचे लेखन करून त्यांनी आपल्या विचारांची खोली, त्यातील व्यापकत्व दाखवून समरसता निर्माण केली. मंदिरांच्या जीर्णोध्दारापासून ते गरीब मुलांच्या शिक्षणाचे आणि सामाजिक कल्याणाचे कार्य करण्यासाठी त्यांनी केलेले प्रत्येक प्रयत्न, आत्मकल्याणापासून ते लोकमंगलपर्यंत जोडले गेले.
मित्रांनो,
आचार्य विद्यानंद जी महाराज म्हणत होते - ज्यावेळी जीवनच स्वतः सेवा बनले जाईल, त्यावेळी जीवन सर्व धर्ममय होवू शकते ! त्यांचा हा विचार जैन तत्वज्ञानाच्या मूळ भावनेशी जोडला गेला आहे. हा विचार भारताच्या चैतन्याशीही निगडीत आहे. कारण भारत सेवा प्रधान देश आहे. भारत मानवता प्रधान देश आहे. जगामध्ये ज्यावेळी हजारो वर्षांपर्यंत हिंसेला हिंसेनेच उत्तर देण्याचा प्रयत्न केला जात होता, त्यावेळी भारताने अवघ्या विश्वाला अहिंसेतील शक्तीचे सामर्थ्य दाखवून दिले. आपण मानवतेच्या सेवेची भावना सर्वात वरच्या स्थानी ठेवली आहे.
मित्रांनो,
आपला सेवाभाव विनाशर्तीचा, विनाअटीचा आहे. स्वार्थाच्याही पल्याडचा आहे आणि परमार्थाची प्रेरणा देणारा आहे. हाच सिद्धांत आपण आज समोर ठेवला आहे. आणि आपण देशामध्येही याच आदर्शांची प्रेरणा घेत आहोत. आचार्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेवून आज काम केले जात आहे. यामध्ये पीएम घरकुल योजना असो, जल जीवन मिशन असो, आयुष्यमान योजना असो, गरजवंत लोकांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा करणे असो, अशा प्रत्येक योजनेमध्ये समाजाच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या व्यक्तीविषयी सेवा भावना आहे. आम्ही या योजना संपृक्ततेपर्यंत पोहोचविण्याच्या भावनेने काम करीत आहोत. याचा अर्थ कोणीही व्यक्ती मागे राहू नये, सर्वांची बरोबरीने वाटचाल सुरू असावी, सर्वांनी मिळून एकमेकांच्या सहकार्याने पुढे गेले पाहिजे, हीच आचार्य श्री विद्यानंद मुनिराज जी यांच्याकडून मिळणारी प्रेरणा आहे आणि हाच आमचाही संकल्प आहे.
मित्रांनो,
आपल्या तीर्थंकर, मुनी आणि आचार्य यांची वाणी, त्यांची शिकवण प्रत्येक काळात तितकीच प्रासंगिक आहे. विशेषतः आताच्या काळात जैन धर्माचे सिद्धांत, पाच महाव्रत, अणुव्रत, त्रिरत्न षट यांची आवश्यकता आहे, पहिल्यापेक्षा आत्ता त्याला खूप महत्त्व आहे. प्रत्येक काळात शाश्वत शिकवण/उपदेश काळानुरूप सामान्य माणसासाठी सहजसोप्या करण्याची गरज असते. आचार्य श्री विद्यानंद मुनिराज यांचे आयुष्य त्याचे कार्य याचसाठी समर्पित होते. त्यांनी 'वचनामृत' चळवळ राबवली, ज्यामध्ये जैन ग्रंथ सामान्य भाषांमध्ये सादर करण्यात आले. त्यांनी भजन संगीताच्या माध्यमातून धर्मातील सखोल विषयदेखील सुलभ सोप्या भाषांमध्ये लोकांसाठी अधिक सोपे केले आहे. 'अब हम अमर भये न मरेंगे, हम अमर भये न मरेंगे, तन कारन मिथ्यात दियो तज, क्यों करि देह धरेंगे,' आचार्य श्री यांची अशी कितीतरी भजने आहेत, ज्यामध्ये त्यांनी अध्यात्माचे मोती पेरून त्यांनी आपल्या सर्वांसाठी एक पवित्र माळ निर्माण केली. ‘अब हम अमर भये न मरेंगे’ अमर असण्यावर सहज विश्वास, अमरत्वावरील ही नैसर्गिक श्रद्धा, त्याकडे पाहाण्याचे धैर्य हेच भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीचे वैशिष्ट्य आहेत.
मित्रहो,
आचार्य श्री विद्यानंद मुनिराज यांचे हे जन्मशताब्दी वर्ष, आपल्या नित्य प्रेरणादायी आहे. आपणांस आचार्य श्रींच्या अध्यात्मिक शिकवण आपल्या जीवनात आत्मसात करायच्या आहेतच, मात्र समाज आणि राष्ट्र यांसाठी त्यांचे कार्य पुढे नेण्याचीही जबाबदारी आपलीच आहे. आपण सर्व जाणताच, आचार्य श्री विद्यानंद मुनिराज यांनी आपल्या साहित्यातून, आपल्या भजनांच्या माध्यमातून प्राचीन प्राकृत भाषेचे पुनरूज्जीवन केले आहेत. प्राकृत ही भारतातील सर्वात जुनी भाषांपैकी एक आहे. ती भगवान महावीर यांच्या शिकवणीची हीच भाषा आहे.संपूर्ण मूळ 'जैन आगम' याच भाषेच रचले गेले आहे. परंतु, आपल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांमुळे ही भाषा सामान्यांच्या वापरातून बाहेर जाऊ लागली होती. आम्ही आचार्य श्रीं सारख्या संतांच्या प्रयत्नांना देशव्यापी प्रयत्न केले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आमच्या सरकारने प्राकृत भाषेला 'शास्त्रीय भाषेचा' दर्जा दिला आहे. आणि काही आचार्यांनी त्याचा उल्लेख देखील केला आहे. आम्ही भारताच्या प्राचीन पांडुलिपीला/प्राचीन हस्तलिखितांचे डिजीटाईज करण्याचे अभियान राबवत आहोत. यामध्ये जैन धर्मग्रंथ आणि आचार्य यांच्यासाठी निगडीत पांडुलिपींचा समावेश आहे. आणि आपण सांगितले त्या 50,000 हून अधिक पांडुलिपींविषयी आमचे सचिव या ठिकाणी बसले आहेत, ते तुमचा मागोवा घेतील. आम्हाला या दिशेने प्रगती करायची आहे. आता आपण उच्च शिक्षणामध्येही मातृभाषेला प्रोत्साहन देत आहोत. आणि त्यासाठीच मी लाल किल्ल्यावरून म्हटले होते की, आम्हाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करायचे आहे. आम्हाला विकास आणि परंपर एकत्र घेऊन पुढे जायचे आहे. हा संकल्प केंद्रस्थानी ठेवून, भारतातील सांस्कृतिक स्थळांचा, तीर्थक्षेत्रांचाही विकास करतो आहोत. आमच्या सरकारने 2024 मध्ये भगवान महावीरांच्या दोन हजार पाचशे पंच्चावन्न निर्वाण महोत्सवाचे व्यापक स्तरावर आयोजित केला होता. या आयोजनामागे आचार्य श्री विद्यानंद मुनीजींची प्रेरणा होती. आचार्य श्री प्रज्ञ सागरजीं सारख्या संतांचा आशीर्वाद त्याला लाभला होता. येत्या काळात, आम्हाला आपल्या सांस्कृतिक वारसा आणि त्याला समृद्ध करणारे असेच अनेक मोठे कार्यक्रम सातत्याने करत रहावे लागणार आहेत. या कार्यक्रमांप्रमाणेच, आमचे हे सर्व प्रयत्न लोक सहभागाच्या भावनेतून केले जातील, 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास' याच मंत्राचा अवलंब होईल.
मित्रांनो,
मी आज तुमच्यात सामील झालो आहे तर नवकार महामंत्र दिवसाची आठवण येणेही स्वाभाविक आहे. त्या दिवशी आम्ही 9 संकल्पांविषयी बोललो. मला आनंद वाटतो की, मोठ्या संख्येने देशवासीय ते प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. आचार्य श्री विद्यानंद मुनिराज यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळते, त्यामुळे या 9 सकंल्पांना बळ मिळते. त्यासाठी, आजच्या दिवशी, तेच 9 संकल्प पुन्हा एकदा तुमच्याबरोबर सामाईक करण्याची मला इच्छा होते आहे. पहिला संकल्प, पाणीबचतीचा आहे. एक एक पाण्याच्या थेंबाचे मूल्य समजून घ्या. ही आपली जबाबदारी आहेच पण भूमातेप्रती ते कर्तव्यदेखील आहे. दुसरा संकल्प, एक पेड मां के नाम. प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे एक झाड लावावे. जसे आई आपले पालनपोषण करते तसेच त्या झाडाची काळजी घ्या. प्रत्येक झाड आईचा आशीर्वाद ठरो. तिसरा संकल्प, स्वच्छतेचा. स्वच्छता ही केवळ दिखाऊपणासाठी नाही तर ती अंतर्गत अहिंसा असते. प्रत्येक गल्ली, प्रत्येक बोळ, प्रत्येक शहर स्वच्छ असले पाहिजे. प्रत्येकाने या कामात सहभागी व्हायचे आहे. चौथा संकल्प, ‘वोकल फॉर लोकल’; ज्या गोष्टीला भारतीय मातीचा वास असेल, भारतीयाचे कष्ट त्यात असतील तीच वस्तू तुम्हाला खरेदी करायची आहे. आणि आपल्यापैकी बहुतांश लोक व्यापार उदीमात आहेत. मला तुमच्याकडून विशेष अपेक्षा आहेत. जर आपण व्यावसायिक असू, तर आपल्या माणसांनी तयार केलेल्या वस्तूंची प्राधान्याने विक्री करा. केवळ नफा/फायदा पाहू नका. आणि इतरांनाही प्रेरणा द्या. पाचवा संकल्प आहे तो देशदर्शन/पर्यटन. जग पहायचे आहे, जरूर पहा. पण आपला देशाची/भारताची ओळख करून घ्या, समजून घ्या, जाणून घ्या. सहावा संकल्प, नैसर्गिक शेती आपलीशी करा. आपल्या पृथ्वीला विषमुक्त करायचे आहे. शेतीला रसायनांपासून दूर न्यायचे आहे. गावां गावांत नैसर्गिक शेतीबाबत सांगायचे आहे. आपले पूज्य महाराज साहेब पादत्राणे घालणार नाही, एवढ्या गोष्टीने काही होणार नाही, आपल्याला सुद्धा भूमातेचे रक्षण करावे लागेल. सातवा संकल्प, आरोग्यदायी जीवनशैली. ते खाल ते विचारपूर्वक खा. भारताच्या पारंपरिक आहारात, भरडधान्ये/श्रीधान्ये असावीत, आपल्या जेवणातून कमीत कमी 10 टक्के तेलही कमी करायचे आहे. त्यामुळे स्थूलपणा/लठ्ठपणा जाईल आणि जीवन उर्जावान होईल. आठवा संकल्प, योग आणि खेळ यांचा. खेळ आणि योग, दोघांना दैनंदिन आयुष्याचा भाग बनवा. नववा संकल्प, गरीबांची मदत करण्याचा. कोणत्याही गरीबाचा हात सावरणे, त्याला गरीबीतून बाहेर पडण्यात मदत करणे ही खरी सेवा आहे. आपण या 9 सकंल्पांसाठी कार्यरत राहू, असा मला विश्वास वाटतो, त्यामुळे आचार्य श्री विद्यानंदजी मुनिराजजींना आणि त्यांच्या शिकवणुकीला बळकटी देऊ.
***
S.Pophale/S.Bedekar/VSS/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2140575)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam