सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विकसित भारतसाठी दर्जेदार डेटा प्रदान करण्याच्या कटिबद्धतेसह एनएसओ इंडियाने डिजिटल परिवर्तनात केलेल्या प्रगतीचे सांख्यिकी दिनाच्या निमित्ताने दर्शन

Posted On: 28 JUN 2025 10:20AM by PIB Mumbai

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MOSPI) अखत्यारीतील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) गेल्या वर्षभरात आपल्या सर्वंकष डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासात लक्षणीय प्रगती केली आहे. 29 जून 2024 रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिनी eSankhyiki पोर्टलच्या आरंभाच्या निमित्ताने, एक डझनहून अधिक नवीन डिजिटल मॉड्यूल्स, पोर्टल्स आणि वेबसाइट्सच्या यशस्वी कार्यान्वयनासह प्रगतीचा वेग कायम राहिला आहे, त्यामुळे सांख्यिकी मंत्रालयाच्या सेवा लोकाभिमुख असल्याने डेटा प्रसार आणि डेटा संकलनाला प्राधान्य देणारा हा पहिला महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

सर्वंकष डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास

गेल्या वर्षी अनेक प्रमुख डिजिटल मालमत्ता सादर करण्यात आल्या असून त्या संशोधक, धोरणकर्ते आणि नागरिकांना डेटाची उपलब्धता आणि पारदर्शकता वाढवणाऱ्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने DI लॅब (डेटा इनोव्हेशन लॅब), OCMS, मेटाडेटा पोर्टल्स आणि राष्ट्रीय सांख्यिकी प्रणाली प्रशिक्षण अकादमी (NSTA) आणि राष्ट्रीय सांख्यिकी आयोग (NSC) साठी नवीन समर्पित वेबसाइटचा समावेश आहे. या व्यतिरिक्त NSO ने eSankhyiki पोर्टलचा भाग म्हणून सामाजिक सांख्यिकी विभाग (SSD), उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण (ASI), आर्थिक जनगणना (EC) आणि राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) यासह अत्यंत महत्त्वाच्या सांख्यिकी डोमेनसाठी लोकाभिमुख डॅशबोर्ड सुरू केले आहेत, यामुळे याच्याशी संबंधित भागधारकांना भारताचा प्रत्यक्ष त्याक्षणीचा (रीअल-टाइम) अधिकृत डेटा उपलब्ध पुरवण्याची सोय झाली आहे. या नवीन उपलब्ध झालेल्या सुविधांबरोबरच, या पोर्टलवर 135 दशलक्षाहून अधिक नोंदीही आहेत. आमच्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अलीकडेच पडलेली आणखी भर म्हणजे आमचे GoISTats मोबाइल ॲप ज्याचा 2025 च्या सांख्यिकी दिनी आरंभ करण्यात येणार आहे.

उदयोन्मुख तंत्रज्ञानाद्वारे नवोन्मेष

नवोन्मेष आणि भविष्यासाठी सज्जतेप्रती आपली बांधिलकी दर्शवत, MOSPI ने आपल्या सांख्यिकीय कामकाजाला उदयोन्मुख तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी त्याचा वापर करता येईल अशा सात प्रमुख कामांची निवड केली आहे. मंत्रालयाने संकल्पनेचे तीन पुरावे (पीओसी) पूर्ण केले असून तीन कामांसाठी वापर करण्याच्या दृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर काम  सुरू केले आहे. भारताचा अधिकृत डेटा जागतिक सांख्यिकीय नवोन्मेषात आघाडीवर राहील हे सुनिश्चित करण्यासोबतच मुख्य सांख्यिकीय उत्पादन प्रणालीमध्ये सिद्ध तंत्रज्ञान समाकलित करणे हा या पद्धतशीर दृष्टीकोनामागील उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय आणि बहुपक्षीय संस्थांचे कार्य मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एनएसओ त्यांच्याशी सहकार्य करत आहे. भारत आता अधिकृत सांख्यिकी (UNCEBD) साठी बिग डेटा आणि डेटा विज्ञानासंबंधीच्या संयुक्त राष्ट्रांच्या समितीचा सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रांच्या युरोपसाठीच्या आर्थिक आयोगाच्या (UNECE) जनरेटिव्ह AI या विषयावरील परिषदेत आपल्या संस्थात्मक व्यवस्था आणि वापर प्रकरणे सादर करण्यासाठी भारताच्या NSO ला आमंत्रित करण्यात आले होते..

सायबर सुरक्षेच्या फ्रेमवर्कला बळकटी

MOSPI ने आपल्या डिजिटल इकोसिस्टमचा विस्तार करताना, आपल्या राष्ट्रीय डेटा मालमत्तांच्या सुरक्षितेतलाही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. डिजिटल युगात डेटा सुरक्षेचे महत्त्वाचे महत्त्व ओळखून मंत्रालयाने भारतातील सांख्यिकीय डेटा पायाभूत सुविधांची अखंडता, गोपनीयता आणि उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सायबर सुरक्षा फ्रेमवर्कचे नेतृत्व करण्यासाठी आणि ते आणखी बळकट करण्यासाठी मुख्य माहिती सुरक्षा अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रासाठी तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होईल हे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने तज्ञ एजन्सी देखील नियुक्त करण्यात आली आहे.

टप्प्याटप्प्याने परिवर्तनाचा धोरणात्मक दृष्टीकोन

MOSPI ने आपल्या डिजिटल परिवर्तन उपक्रम टप्प्याटप्प्याने राबवण्याचा धोरणात्मक दृष्टीकोन अंगिकारला आहे. सध्याच्या टप्प्यात मुख्यत्वे डेटा प्रसार आणि डेटा संकलनावर मुख्य भर आहे, डेटा उपलब्धता सुलभ व्हावी यासाठी संकलन पद्धतींचे आधुनिकीकरण करण्यात eSigma प्लॅटफॉर्म विविध सांख्यिकीय ऑपरेशन्स आणि पोर्टल्स आणि वेबसाइट्ससह महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. हा पद्धतशीर दृष्टिकोन पुढील टप्प्यात पोहोचण्यापूर्वी सांख्यिकीय उत्पादन प्रणालीचा प्रत्येक घटक पूर्णपणे ऑप्टिमाइझ केला गेला आहे हे सुनिश्चित करतो. वेगवान आणि अधिक कार्यक्षम सांख्यिकीय आउटपुट सुनिश्चित करण्यासाठी आगामी टप्प्यात डेटा प्रोसेसिंग सुधारण्यावर भर दिला जाईल. पुढील टप्प्यासाठी सर्वंकष डिजिटल परिवर्तन अंमलबजावणी योजना अंतिम टप्प्यात असून लवकरात लवकर पूर्णपणे परिवर्तन होण्याची शक्यता आहे.

विकसित भारताच्या दिशेने मार्गक्रमण करताना धोरण तयार करण्यासाठी वेळेत आणि सातत्याने दर्जेदार डेटा उपलब्ध असेल याची खबरदारी घेऊन मंत्रालय डिजिटल परिवर्तनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. हे डिजिटल परिवर्तन डेटा-चालित नव भारताच्या गरजेनुसार अधिकृत आकडेवारी अधिक वेळेत, विश्वासार्ह आणि प्रवेशयोग्य बनविण्याच्या आमच्या अढळ वचनबद्धतेचे द्योतक आहे. प्रत्येक नागरिक, संशोधक आणि धोरणकर्त्याला दर्जेदार डेटा मिळवण्यास सक्षम करणे हे आमचे ध्येय आहे जेणेकरून निर्णय प्रक्रियेस चालना मिळेल आणि 2047 पर्यंतच्या भारताच्या विकासाची महत्त्वाकांक्षी उद्दीष्टे साध्य करण्यास ते सहाय्यक होईल.

***

A.Chavan/M.Ganoo/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2140363)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil