सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षण, 2026

Posted On: 23 JUN 2025 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जून 2025

 

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (एनएसएस) हे त्याच्या स्थापनेपासूनच विविध विषयांवर वार्षिक आणि तिमाही कौटुंबिक सर्वेक्षणांच्या अग्रगण्य प्रमाण आणि व्याप्तीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते. पहिले सर्वेक्षण 1950  मध्ये सुरू करण्यात आले आणि तेव्हापासून एनएसएसने धोरणनिर्मितीसाठी डेटा-चालित माहिती प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अशा डेटाचे वाढते महत्त्व ओळखून, गेल्या 75 वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत झालेले गहन संरचनात्मक बदल चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी समर्पित उत्पन्न वितरण सर्वेक्षणाची तातडीची गरज असल्याची दखल एनएसएस ने  घेतली आहे.

अलिकडेच, सामाजिक आणि आर्थिक हितसंबंधांच्या विविध क्षेत्रातील डेटामधील तफावत भरून काढण्यासाठी एनएसएसने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. उत्पन्न वितरण आणि त्याच्या  कल्याणाची महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी  कौटुंबिक  उत्पन्न सर्वेक्षण हा मंत्रालयाचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

मंत्रालयाने यापूर्वी 9 व्या फेरीत (मे 1955 - सप्टेंबर 1955) आणि  14 व्या फेरीत (जुलै 1958 - जून 1959) प्रायोगिक तत्वावर ग्राहक व्यय  सर्वेक्षणांसह कौटुंबिक उत्पन्नाची माहिती संकलित  करण्याचे प्रयत्न केले आहेत, परंतु त्यासाठी कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली  नाही.

या सर्वेक्षणांमधून आलेल्या अनुभवावरून असे दिसून आले की या क्षेत्रात उत्पन्न संबंधी विश्वसनीय माहिती गोळा करण्यात अडचणी येत होत्या आणि या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आणि सर्वेक्षण प्रक्रियेत अधिक स्पष्टता आणण्यासाठी तसेच कौटुंबिक उत्पन्न सर्वेक्षणाच्या एकूण कामांवर देखरेख ठेवण्यात ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका सारख्या देशांना आलेले अनुभव लक्षात घेऊन सांख्यिकी आणि कार्यक्रम  अंमलबजावणी मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे भारताचे माजी कार्यकारी संचालक डॉ. सुरजित एस. भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली एक तांत्रिक तज्ञ गट स्थापन केला आहे. हा गट  राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाला 2026 साठी नियोजित  अखिल भारतीय उत्पन्न वितरण सर्वेक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करेल.

तज्ञ गट संकल्पना आणि व्याख्यांना अंतिम स्वरूप देणे, सर्वेक्षण पद्धती आणि साधनांची तयारी, नमुना डिझाइन आणि अंदाज पद्धती तयार करणे आणि जगभरात स्वीकारल्या जाणाऱ्या सर्वोत्तम देशांच्या  पद्धतींचा समावेश करणे यासंदर्भात मार्गदर्शन करेल. सर्वेक्षणात घरगुती उत्पन्नावर (मजुरी) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या परिणामाचे मूल्यांकन करण्याचा देखील प्रयत्न केला जाईल. सर्वेक्षण निकालांना अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी हा गट  मार्गदर्शन देखील करेल.

हा गट  सरकारमधील आणि/किंवा सरकारबाहेरील विषय तज्ञांची मदत घेऊ शकतो आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या मान्यतेने आवश्यकतेनुसार त्यांना सदस्य म्हणून निवडू शकतो. विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी गरज भासल्यास हा गट विषय तज्ञांना विशेष आमंत्रित म्हणून बैठकीत आमंत्रित करू शकतो.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2139082)
Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati