आदिवासी विकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीचा घेतला आढावा
योग हा केवळ एक व्यायाम नाही तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील एकतानता साधण्याचा मार्ग: केंद्रीय मंत्री जुआल ओराम
Posted On:
16 JUN 2025 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2025
यावर्षीच्या योग दिनी समावेशक आणि सामुदायिक नेतृत्वाखालील कार्यक्रमांच्या आवश्यकतेवर आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम यांनी भर दिला आहे.यावेळी आदिवासी भागात हा कार्यक्रम आधुनिक योगासह स्थानिक पारंपरिक आरोग्य पद्धतींचा अनोखा संगम सादर करेल असे ओराम म्हणाले. योग प्रात्यक्षिके,आरोग्य सत्रे आणि जागरूकता कार्यक्रमांद्वारे आदिवासी समुदायांच्या सक्रिय सहभागाला त्यांनी प्रोत्साहन दिले.
21जून 2025 रोजी साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी आदिवासी मंत्रालयाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ओराम या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला मंत्रालयाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सध्या सुरू असलेल्या धरती आबा जनभागीदारी या देशव्यापी जागरूकता आणि लाभ संतृप्ति मोहिमेचा एक प्रमुख भाग म्हणून योग दिवस साजरा केला जाणार आहे.

योग हा केवळ एक व्यायाम नाही तर शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील एकतानता साधण्याचा मार्ग आहे, असे त्यांनी योगाचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले. निसर्गाशी आणि पारंपारिक उपचार पद्धतींशी खोलवर रुजलेल्या संबंधामुळे आदिवासी समुदाय या सुसंवादाचे प्रतीक आहेत, असे ते म्हणाले. यावर्षीचा योग दिन आधुनिक आणि स्वदेशी आरोग्य प्रणालींचा उत्सव बनेल याची ग्वाही आपण दिली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
या उत्सवाचा एक भाग म्हणून, 477 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील (ईएमआरएस) अंदाजे 1.4 लाख विद्यार्थी आणि 10 लाखांहून अधिक आदिवासी नागरिक आगामी योग सत्रांमध्ये आणि संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

योग दिनाचे समारंभ यशस्वी करण्यासाठी आयुष मंत्रालये, राज्य आदिवासी कल्याण विभाग, आदिवासी संशोधन संस्था, ईएमआरएस, आश्रम शाळा, ट्रायबल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया (ट्रायफेड),राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळ (एनएसटीएफडीसी) आणि इतर भागधारकांशी प्रभावी समन्वय साधण्याचे आवाहनही ओराम यांनी केले आहे. संवाद आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, कम्युनिटी रेडिओ आणि स्थानिक आदिवासी भाषांचा वापर केला पाहिजे असे ते म्हणाले.
N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2136807)