आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एम्स नागपूर येथे सर्वोत्तम पद्धतींबाबत आयोजित केलेल्या पहिल्या परिषदेचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन
शैक्षणिक उत्कृष्टता, क्षेत्रीयदृष्ट्या प्रासंगिक संशोधन आणि उच्च गुणवत्ता, प्रामाण्य आधारित आणि किफायतशीर आरोग्यसेवेची पुनर्परिभाषा, आंतरविद्याशाखीय सहयोग यासाठी प्रोत्साहन देण्याच्या सर्व एम्सच्या वचनबद्धतेवर टाकला प्रकाश
अध्यापन-अध्ययन आणि संशोधन; रुग्णालय सेवा; आणि प्रशासन व रुग्ण सुविधा या तीन क्षेत्रात नव्या एम्सचे समृद्ध अनुभव संकलित करण्यासाठी ही परिषद हा अग्रगण्य उपक्रम : जे.पी. नड्डा
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2025 5:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2025
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब आरोग्य कल्याण मंत्रालयाने आयोजित केलेल्या "सर्वोत्तम पद्धती" या विषयावरील पहिल्या परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. दोन दिवसांच्या या परिषदेत रुग्ण-केंद्रित काळजी, परिचालन कार्यक्षमता, डिजिटल परिवर्तन आणि शैक्षणिक उत्कृष्टता यावर लक्ष केंद्रित करून विविध एम्स संस्थांनी स्वीकारलेल्या अनुकरणीय पद्धती दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. देशभरातील एम्स संस्था, प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजना (पीएमएसएसवाय ) विभाग आणि संरक्षण मंत्रालय, या परिषदेत सहभागी आहे. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी या परिषदेत उद्घाटनपर भाषण केले.
आरोग्य मंत्री नड्डा यांनी आपल्या भाषणात एम्सचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून स्थापन केलेली प्रत्येक एम्स प्रगत उपचार देखभाल, उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन उत्कृष्टतेची त्रिवेणी आहे. प्रादेशिक असमानता दूर करण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या स्थित, प्रत्येक एम्स आरोग्यसेवा नवोन्मेष आणि शिक्षणाचे केंद्र म्हणून काम करते, जी समान, किफायतशीर आणि प्रामाण्यावर आधारित आरोग्यसेवा प्रदान करते. या संस्था सार्वजनिक आरोग्य प्रणाली मजबूत करण्यासाठी, निगाविषयक मापदंड उंचावण्यासाठी आणि आरोग्यसेवेतील धुरिणांची नवीन पिढी घडविण्यासाठी सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित करतात."

प्रत्येक नव्या एम्सच्या सर्वोत्तम पद्धती आणि नवोन्मेष इतर एम्ससोबत सामायिक करण्याच्या महत्त्वावर नड्डा यांनी भर दिला जेणेकरून त्यांचा व्यापक अवलंब आणि उपयोग होईल. या परिषदेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल आणि सर्वोत्तम पद्धती यावरील पहिल्या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी एम्स नागपूरचे कौतुक केले.
नड्डा यांनी परिषदेचे महत्त्व अधोरेखित करत अध्यापन- अध्ययन आणि संशोधन; रुग्णालय सेवा; आणि प्रशासन व रुग्ण सुविधा या तीन क्षेत्रात नव्या एम्सचा समृद्ध अनुभव संकलित करण्यासाठी ही परिषद हा अग्रगण्य उपक्रम असल्याचे सांगितले.
भविष्यात येणाऱ्या आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी डॉक्टरांना सज्ज करण्यात एम्सची महत्त्वाची भूमिका केंद्रीय मंत्री नड्डा यांनी अधोरेखित केली. ते असेदेखील म्हणाले की, अध्ययन-अध्यापनाच्या क्षेत्रात, स्पर्धेवर आधारित वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम, डिजिटल शिक्षणात गुंतवणूक, अत्याधुनिक सिम्युलेशन प्रयोगशाळा आणि संरचित मार्गदर्शन कार्यक्रमांची अंमलबजावणी शैक्षणिक उत्कृष्टतेप्रती दृढ बांधिलकी दर्शवते.”
“नव्या एम्स संस्था क्षेत्रीयदृष्ट्या समर्पक अभ्यास, नैतिक वैद्यकीय चाचण्या आणि अनुवादात्मक संशोधन यांच्या माध्यमातून भारताच्या वैज्ञानिक प्रगतीत अधिकाधिक योगदान देत आहेत. येत्या काळातील गुंतागुंतीच्या सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठीची गुरुकिल्ली असलेल्या आंतरशाखीय सहयोगाची जोपासना करण्याचे प्रयत्न होत असलेले पाहणे उत्साहवर्धक आहे” हे देखील त्यांनी ठळकपणे सांगितले.
“आधुनिक पायाभूत सुविधा आणि विशेष तज्ञांची विस्तृत श्रेणी यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाच्या, तथ्यावर आधारित तसेच परवडण्याजोग्या दरातील उपचार देऊ करून एम्स संस्थांचा परिसर रुग्णसेवेची नवी व्याख्या करत आहेत. ई-प्रशासन साधने, पारदर्शक प्रशासकीय आराखडा तसेच जनौषधी केंद्रे, डिजिटल नोंदणी प्रणाली आणि समर्पित मदतकक्ष यांसारखे रुग्ण-केंद्री अभिनव उपक्रम यांचा वापर सार्वजनिक आरोग्यसेवेच्या रचनेत कार्यक्षमता आणि दयाळूपणा यांचे सहअस्तित्व असू शकते हेच दाखवून देतात.” केंद्रीय मंत्री नड्डा पुढे म्हणाले.
उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी सरकारच्या “वैद्यकीय शिक्षणात तसेच सार्वत्रिक आरोग्यसेवेत उत्कृष्टता” या संकल्पनेला पुढे नेण्यात सर्व भागधारकांना असलेल्या महत्त्वावर अधिक भर दिला. संस्थात्मक विकास नेतृत्वाच्या दूरदृष्टीवर अवलंबून असतो हे अधोरेखित करत त्यांनी सर्वांना इतर संस्थांच्या सर्वोत्तम पद्धतींतून शिकण्याचे प्रोत्साहन दिले.


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या सह सचिव अंकिता मिश्रा बुंदेला, नागपूर येथील एम्सचे कार्यकारी संचालक डॉ.प्रशांत पी.जोशी, मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी, संरक्षण मंत्रालयातील सशस्त्र दल वैद्यकीय सेवा विभागाचे महासंचालक, सीआयआरए(संरक्षण मंत्रालय) आणि देशभरातील विविध एम्स संस्थांचे कार्यकारी संचालक तसेच ज्येष्ठ प्रशासक देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
N.Chitale/S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2136204)
आगंतुक पटल : 17