वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सरकार आणि उद्योगांसोबतच्या व्यापक संवादांच्या माध्यमातून भारत आणि स्वीडन यांच्यातील सहकार्याला दिली चालना


पीयूष गोयल यांनी साधला भारत-स्वीडन व्यापार आणि गुंतवणूक धोरण मंचावर उद्योग धुरीणांसोबत संवाद, भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार करार संधींचा घेतला आढावा

21व्या भारत-स्वीडन संयुक्त आयोगाच्या सत्रात हरित संक्रमण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि लवचिक पुरवठा साखळी या विषयांमधील धोरणात्मक सहकार्याची चाचपणी

भारत-स्वीडन व्यवसाय गोलमेज परिषदेने अधोरेखित केल्या स्वच्छ ऊर्जा, स्मार्ट वस्तुनिर्माण, वाहतूकव्यवस्था, जीवन विज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानातील गुंतवणूक संधी

Posted On: 12 JUN 2025 9:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2025

केंद्रीय वाणिज्य  आणि उद्योग मंत्री,  पीयूष गोयल यांनी स्टॉकहोमच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्याच्या पहिल्या दिवशी स्वीडिश सरकारमधील वरिष्ठ सदस्य आणि उद्योग धुरिणांसोबत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या. द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ करणे, व्यापार आणि गुंतवणुकीचा ओघ वाढवणे, तसेच उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या नवीन संधी शोधणे हा या भेटीचा उद्देश होता.

गोयल यांनी आपल्या अधिकृत भेटींमध्ये आंतरराष्ट्रीय विकास सहकार्य आणि परराष्ट्र व्यापार मंत्री बेंजामिन डौसा  आणि परराष्ट्र व्यापार राज्य सचिव हाकान जेव्हरेल यांची भेट घेतली. या चर्चांमध्ये भारत-स्वीडन व्यापार आणि गुंतवणूक भागीदारीची व्याप्ती वाढवणे, शाश्वत औद्योगिक सहकार्याला गती देणे आणि तंत्रज्ञान व नवोन्मेषावर आधारित विकासासाठी महत्त्वाची क्षेत्रे लक्षात घेण्यावर भर देण्यात आला.

या भेटीदरम्यान, भारत-स्वीडन आर्थिक, औद्योगिक आणि वैज्ञानिक सहकार्यासाठी संयुक्त आयोगाच्या 21 व्या सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्राच्या विषयपत्रिकेत नवोन्मेष आणि संशोधनातील धोरणात्मक सहकार्य तसेच भारत-स्वीडन आर्थिक भागीदारी मजबूत करण्यासाठी गोलमेज चर्चा यांचा समावेश होता. या बैठकीत लीडआयटी (LeadIT), विनोवा (Vinnova), स्वीडिश ऊर्जा संस्था, स्वीडिश राष्ट्रीय अंतराळ संस्था, नॅशनल बोर्ड ऑफ ट्रेड, स्वीडिश निर्यात पतपुरवठा संस्था, बिझनेस स्वीडन  आणि भारतातील स्वीडिश चेंबर ऑफ कॉमर्स  यासह प्रमुख स्वीडिश संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दोन्ही बाजूंनी हरित संक्रमण, प्रगत तंत्रज्ञान  आणि लवचिक पुरवठा साखळी  या क्षेत्रांतील संयुक्त प्रकल्पांना पुढे नेण्याची त्यांची सामायिक वचनबद्धता अधोरेखित केली.

यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष  गोयल यांनी भारत-स्वीडन बिझनेस लीडर्सच्या गोलमेज परिषदेलाही संबोधित केले. यावेळी त्यांनी स्वीडनच्या उद्योग क्षेत्राशी संबंधित महत्वाच्या व्यक्तींशी  संवाद साधला.स्वीडनमधल्या कंपन्यांनी भारतातील अनुकूल नियामक वातावरण, वाढता ग्राहक वर्ग, कुशल मनुष्यबळ आणि नियोजनबद्ध रितीने विकसित औद्योगिक पायाभूत सुविधांचा लाभ घेऊन भारतात आपल्या  कंपन्यांचा विस्तार करावा असे आवाहनही त्यांनी केले. ही गोलमेज परिषद स्वच्छ ऊर्जा, स्मार्ट वस्तुनिर्माण, गतिशीलता, जीवन विज्ञान  आणि डिजिटल तंत्रज्ञानामध्ये खाजगी क्षेत्रातील परस्पर सहकार्य मजबूत करण्यासाठीचे एक व्यासपीठ म्हणून उपयुक्त ठरली.

यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, कॉन्फेडरेशन ऑफ स्वीडिश एंटरप्राइजमध्ये झालेल्या भारत-स्वीडन उच्च-स्तरीय व्यापार आणि गुंतवणूक धोरण मंचाच्या (India–Sweden High-Level Trade and Investment Policy Forum) कार्यक्रमातही सहभागी झाले. या निमित्ताने व्यापाराचे सातत्याने बदलत असलेले स्वरूप आणि प्रस्तावित भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार करार (India–EU Free Trade Agreement) अंतर्गतच्या संधींबद्दल चर्चा  करण्यासाठी दोन्ही देशांच्या  उद्योग - व्यावसाय क्षेत्रातली आघाडीच्या व्यक्ती  आणि धोरणकर्ते  एकत्र आले. या अनुषंगानेच भारतीय उद्योग महासंघ (CII) आणि कॉन्फेडरेशन ऑफ स्वीडिश एंटरप्राइजने आपापली सादरीकरणेही मांडली. यावेळी आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मूल्य-साखळी भागीदारी, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि गुंतवणूकीच्या सुलभीकरणाबद्दलचे आपापले विचार आणि मते मांडली.

या निमित्ताने स्वयंचलन (automation), नवीकरणीय ऊर्जा, शाश्वत अन्न प्रणाली, सागरी तंत्रज्ञान आणि प्रगत सामग्री (advanced materials) यांसारख्या क्षेत्रांतील स्वीडिश कंपन्यांसोबत भारताने अनेक स्वतंत्र बैठकाही घेतल्या. यावेळी अनेक कंपन्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर आपला दृढ विश्वास व्यक्त केला. नवीन गुंतवणूक  करून, तसेच क्षमता विस्तार आणि स्थानिक पातळीवर तळागाळापर्यंत सहभाग वाढवून आपल्या कंपन्यांचे भारतातील अस्तित्व वाढवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये जमिनीची  उपलब्धता, कौशल्यविषयक भागीदारी आणि जलद मंजुरी प्रक्रिया यांसारख्या पाठबळ देण्याशी संबंधित महत्वाच्या मुद्यांवरही चर्चा झाली.

या निमित्ताने स्वीडनमधील भारतीय दूतावास आणि स्वीडन-इंडिया व्यवसाय परिषदेने संयुक्तपणे संध्याकाळी व्यावसायिक भागधारक, विचारवंत आणि सरकारी प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या एका गोलमेज स्वागत समारंभाचेही आयोजन केले. या समारंभातही पीयूष  गोयल यांनी भारताचा वस्तुनिर्माण  आणि नवोन्मेषाचे जागतिक  केंद्र बनण्याविषयीचा दृष्टिकोन पुन्हा एकदा व्यक्त केला. हरित तंत्रज्ञान, नवोन्मेषाधारीत प्रगती आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या  क्षेत्रांमध्ये स्वीडनसोबत शाश्वक भागीदारीचे आवाहनही केले.

स्टॉकहोममधील हा व्यापक परस्पर संवादातून भारत-स्वीडन धोरणात्मक भागीदारीच्या सातत्यपूर्ण प्रगतीचीही प्रचिती आली. या सोबतच या व्यापक संवादांमुळे दोन्ही देशांची उच्च-परिणामकारकतेच्या भविष्य-केंद्रित उपक्रमांसाठी सहयोगात्मक भागीदारी  करण्याची सामायिक महत्त्वाकांक्षाही अधोरेखित झाली.

S.Kakade/S.Patil/T.Pawar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2136064)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil