लोकसभा सचिवालय
लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ध्येय असायला हवी असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन
नागरी सेवकांनी समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी करुणा,निष्पक्षता आणि कर्तव्याची तीव्र भावना जोपासायला हवी: ओम बिर्ला
मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीच्या 127 व्या पदाधिष्ठान प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला लोकसभा अध्यक्षांनी संबोधित केले
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2025 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2025
लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ध्येय असायला हवे, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे. मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीच्या (एलबीएसएनएए) 127 व्या पदाधिष्ठान प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रशिक्षणार्थीं अधिकाऱ्यांना ते संबोधित करत होते. समाजाच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रशासनाचे साधन म्हणून नवोन्मेश आणि पारदर्शकता अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपल्या वैयक्तिक अनुभवांचा दाखला देत, बिर्ला यांनी नमूद केले की लोक, विशेषतः जे उपेक्षित आहेत, ते नागरी सेवकांकडे आशेने पाहतात, आणि म्हणूनच, या आशा पूर्ण करण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी करुणा, निष्पक्षता आणि कर्तव्याची तीव्र भावना बाळगून काम करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.
मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमी (एलबीएसएनएए), ही लोकशाही मूल्ये, साधेपणा आणि सचोटीचे प्रतीक असल्याचा उल्लेख करून, बिर्ला यांनी राष्ट्र उभारणीमधील अकादमीच्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. अधिकाऱ्यांना "कर्मयोगी" असे संबोधून त्यांनी देशाची समृद्धी आणि प्रगतीमध्ये सक्रियपणे योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
भारताच्या भाषिक, सांस्कृतिक, भौगोलिक आणि सामाजिक अशा अतुलनीय विविधतेचा उल्लेख करून, ते म्हणाले की, विविधता असूनही, देशाने सामूहिक सहभाग आणि सहकार्य यामध्ये खोलवर रुजलेली एक मजबूत लोकशाही आणि प्रशासकीय व्यवस्था यशस्वीपणे उभी केली आहे. ते पुढे म्हणाले की, जगातील इतर लोकशाही देशांमध्ये भारत याच कारणामुळे उठून दिसतो.
अधिकाऱ्यांनी केवळ कायदे आणि योजनांची अंमलबजावणी करणारे म्हणून नव्हे, तर जन समुदायाचे विशेषतः संकटकाळी आणि आव्हानात्मक परिस्थितीत उत्थान करणारे बदल घडवून आणणारे म्हणूनही महत्वाची भूमिका बजावावी असे आवाहन बिर्ला यांनी केले. आपल्या कामातून समाजाच्या तळागाळातील व्यक्तीला न्याय आणि सेवा देण्याची वचनबद्धता प्रतिबिंबित व्हायला हवी, असे ते म्हणाले. नागरी सेवकांनी कायद्याची अंमलबजावणी करून समाजातील सर्वात उपेक्षित घटकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी काम करावे, अशी सूचनाही बिर्ला यांनी केली. ते पुढे म्हणाले की, अधिकाऱ्याशी संपर्क साधणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपले म्हणणे ऐकले जात आहे, आणि आपल्याला आधार मिळत आहे, असे वाटायला हवे.
अधिकाऱ्यांनी प्रत्येक समस्येकडे आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून पहावे, आणि एकही व्यक्ती तिचे म्हणणे ऐकल्याशिवाय आणि दुर्लक्षित राहणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन बिर्ला यांनी केले. खरा आनंद वैयक्तिक लाभातून मिळत नाही, तर अर्थपूर्ण कामातून मिळतो, असे ते म्हणाले. न्याय मिळवून देणे अथवा सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणे हे केवळ आशीर्वादच मिळवून देत नाही, तर आपल्या ध्येयाची नव्याने जाणीवही करून देते, असे बिर्ला यांनी सांगितले.
S.Kakade/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2136058)
आगंतुक पटल : 7