नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

फ्रान्समधील नीस येथे आयएएलए परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनात भारताचा उपाध्यक्ष म्हणून सहभाग

Posted On: 11 JUN 2025 9:59PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जून 2025

 

भारताने सागरी नौवहन सहाय्यतेसाठी आंतरराष्ट्रीय संघटनेचा (आयएएलए) उपाध्यक्ष म्हणून, फ्रान्समधील नीस येथे झालेल्या आयएएलए परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनात सक्रीय सहभाग घेतला. आयएएलए परिषद ही समुद्री जलवाहतुकीसाठी जबाबदार असलेल्या आंतरसरकारी संघटनेचे निर्णय घेणारी प्रमुख संस्था आहे.

भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी. के. रामचंद्रन यांनी केले. या कार्यक्रमाला सहसचिव मुकेश मंगल आणि संचालक कार्तिक चेन्सुदार उपस्थित होते.

उद्घाटन सत्रात, सचिव (पीएसडब्ल्यू) यांनी बीज भाषण दिले, भारताचे आयएएलए बरोबरचा  दीर्घकालीन सहयोग  आणि नेव्हिगेशन आणि जहाज वाहतूक सेवांसाठीच्या सागरी सहाय्यामध्ये झालेल्या महत्वाच्या प्रगतीवर त्यांनी प्रकाश टाकला. दीपगृह आणि लाइटशिप्स महासंचालनालयाच्या (डीजीएलएल) पुढील उपक्रमांवर त्यांनी भर दिला.

  • 12 प्रमुख बंदरांमधील जहाज वाहतूक सेवांचे एकत्रीकरण.
  • कोलकाता येथील मरीन नेव्हिगेशन प्रशिक्षण  संस्थेमधील सुनियोजित आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम. 

त्यांनी डिसेंबर 2025 मध्ये मुंबईत  होणार्‍या आयएएलए च्या तिसर्‍या सर्वसाधारण सभेला आणि 2027 मधील आयएएलए च्या 21 व्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी सर्व सदस्य राष्ट्रांना औपचारिक निमंत्रण दिले.

1957 मध्ये स्थापनेपासून भारत आयएएलएचा दीर्घकाळापासूनचा आणि वचनबद्ध सदस्य आहे, तसेच 1980 पासून दीपगृह  आणि लाइटशिप्स महासंचालनालयाच्या माध्यमातून परिषदेचा सदस्य आहे. भारताने नेव्हिगेशनमध्ये सागरी सहाय्याचा समन्वय साधण्यासाठी, आणि सुरक्षित, कार्यक्षम आणि पर्यावरणाप्रति जबाबदार सागरी संचालन  सुनिश्चित करण्याच्या  क्षमता विकसित करण्यामध्ये सक्रिय योगदान दिले आहे,

सिंगापूरमधील पहिल्या सर्वसाधारण सभेत आयएएलएच्या उपाध्यक्षपदी झालेली निवड, भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचे आणि धोरणात्मक सागरी दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.

परिषदेत पुढील प्रमुख तांत्रिक बाबींवर चर्चा झाली:

  • जलवाहतुकी दरम्यान सागरी सहाय्यकांचे सुसूत्रीकरण
  • दीपगृह वारशाचे जतन
  • व्हिज्युअल एटीओएनसाठी हार्मोनाइज्ड इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) प्रोटोकॉलसारखी उदयोन्मुख प्रगती
  • सागरी सेवा नोंदणी तपशील
  • 2025 आणि 2026 मधील नियोजित आयएएलए उपक्रमांसाठी कार्यक्रमाचे वेळापत्रक

परिषदेच्या सदस्यांनी भारताच्या सक्रिय भूमिकेची प्रशंसा केली आणि आयएएलए च्या प्रमुख कार्यक्रमांच्या यजमानपदाचे स्वागत केले. भारताचा सक्रिय सहभाग सागरी सुरक्षा, नवोन्मेष आणि वारसा जतन, याप्रती असलेली त्याची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2135845)
Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi