वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांचा यशस्वी स्वित्झर्लंड दौरा संपन्न, ईएफटीए टीईपीए अंतर्गत भारत-स्वित्झर्लंड भागीदारीला मिळाली गती
Posted On:
11 JUN 2025 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2025
दिनांक 9 आणि 10 जून 2025 या कालावधीतील दोन दिवसीय अधिकृत स्वित्झर्लंड दौऱ्याची यशस्वी सांगता झाल्यानंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल स्वीडनला पोहोचले.
स्वित्झर्लंड दौऱ्यामध्ये त्यांनी भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातील आर्थिक सहकार्य वाढवणे तसेच यावर्षीच्या सुरुवातीला भारत आणि युरोपीय मुक्त व्यापार संघटना (ईएफटीए) यांच्या दरम्यान झालेल्या व्यापार तसेच आर्थिक भागीदारी कराराचे (टीईपीए) कार्यान्वयन करणे यावर प्रामुख्याने भर दिला.
या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्री गोयल यांनी स्विस सरकार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह धोरणात्मक समन्वय मजबूत करणे तसेच दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक आणि नवोन्मेष-प्रेरित विकासाचे नवे मार्ग खुले करून देणे या उद्देशाने अनेक बैठका घेतल्या.
केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी जैवतंत्रज्ञान आणि औषधनिर्मिती, आरोग्यसुविधा, संरक्षण तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान यांसह इतर अनेक क्षेत्रांतील स्विस उद्योजकांशी व्यापक संवाद साधला. विभागनिहाय गोलमेज आणि द्विपक्षीय बैठकांमध्ये गोयल यांनी भारताचे वाढते आर्थिक सामर्थ्य, धोरणात्मक स्थैर्य तसेच जागतिक गुंतवणूकदारांसाठी आणि सुलभ वातावरण निर्माण करण्याप्रती सरकारची बांधिलकी अधोरेखित केली. स्वीस कंपन्यांनी भारताचा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा विस्तार, तंत्रज्ञान-प्रेरित प्रशासन तसेच देशांतर्गत वापर संबंधी पायाचा विस्तार यांचे स्वागत केले असून विकासाचे केंद्र आणि जागतिक उत्पादन केंद्र अशा दोन्ही भूमिकांतून भारताकडे पाहण्यास सुरुवात केली आहे.
या भेटीतील महत्वाची घडामोड म्हणजे 10 जून रोजी झुरिक येथे आयोजित 18 व्या स्विसमेम औद्योगिक दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गोयल यांचा सहभाग.याप्रसंगी केलेल्या बीजभाषणात गोयल यांनी एसएमईज आणि डीप-टेक नवोन्मेषकारांसह सर्व स्विस कंपन्यांना टीईपीएद्वारे देऊ करण्यात आलेल्या नव्या व्यापार संरचनेचा वापर करुन भारतातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी आमंत्रित केले. भारताचे लोकसंख्याविषयक लाभांश, जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त अभियांत्रिकी प्रतिभा आणि सशक्त पुरवठा साखळी यांच्या संदर्भात माहिती देऊन केंद्रीय मंत्र्यांनी स्विस उद्योजकांना संशोधन आणि विकास कार्ये हाती घेण्यासाठी, स्थानिक उत्पादक पाया स्थापन करण्यासाठी तसेच ग्लोबल साउथ देशांसाठी तंत्रज्ञानाची सह-निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. टीईपीए ला एक ‘विश्वसनीय आणि कार्यक्षम भागीदारी करार’ असे संबोधत त्यांनी भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातील परस्परपुरकतेची भावना आणि हे दोन्ही देश जागतिक बाजार पेठेत संयुक्तपणे देऊ करू शकतील अशा अनोख्या मुल्यांवर अधिक भर दिला.
या सगळ्याचा तात्काळ परिणाम म्हणून भारतात वाढता व्यवसाय असलेल्या जागतिक प्रक्रिया स्वयंचलीकरण कंपनी एंड्रेस प्लस हौसर यांच्यातर्फे करण्यात आलेल्या सुलभता विनंतीवर तातडीची कार्यवाही. या संदर्भातील चर्चेदरम्यान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील यांच्या विद्यमान सुविधेच्या परिसरात जमिनीच्या तुकड्याच्या उपलब्धतेचा मुद्दा मांडला. गुंतवणूकदारांच्या समस्यांचे जलदगतीने निराकरण तसेच सुगम व्यापार वातावरणाची सुनिश्चिती यांच्याप्रती भारत सरकारच्या कटिबद्धतेचे दर्शन घडवत केंद्रीय मंत्री गोयल आणि भारतीय अधिकाऱ्यांनी समन्वयीत प्रयत्नांच्या माध्यमातून काही तासांच्या आत ही समस्या सोडवली. प्रतिसादात्मक प्रशासनाचा आदर्श नमुना अशा शब्दात स्विस उद्योगातील सदस्यांनी या प्रक्रियेची प्रशंसा केली.
भारतात येण्यात रुची असलेल्या काही स्विस कंपन्यांशी केंद्रीय मंत्र्यांनी अनेक थेट वैयक्तिक बैठका घेतल्या.
स्वीडन भेटीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल स्वीडनचे आंतरराष्ट्रीय विकास सहकार्य आणि परदेश व्यापार विभाग मंत्री बेंजामिन डोऊसा यांच्यासह आर्थिक, औद्योगिक आणि वैज्ञानिक सहकार्यासाठीच्या भारत-स्वीडिश संयुक्त आयोगाच्या 21 व्या कार्यक्रमाचे सहअध्यक्षपद भूषवणार आहेत.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135761)