वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याकडून स्विसमेम उद्योग दिवसानिमित्त स्विस उद्योग क्षेत्राला भारताच्या प्रगतीत भागीदार होण्याचे आमंत्रण
Posted On:
10 JUN 2025 10:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2025
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज स्विसमेम उद्योग दिवसानिमित्त स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या प्रतिष्ठित कार्यक्रमात स्विस उद्योगजगत आणि नवप्रवर्तकांना संबोधित केले. भारताच्या परिवर्तनशील विकासकथेचे आणि सहकार्याच्या मोठ्या संधींचे उल्लेख करत गोयल यांनी स्विस उद्योग समुदायाला भारताच्या 30-35 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या प्रवासात सक्रिय भागीदार होण्याचे आवाहन केले.
भागीदारीचे प्रतीक म्हणून गोयल यांनी भारतात ‘स्विस एन्क्लेव्ह’ तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. स्विस व्यवसायांसाठी सुसज्ज व त्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या अशा विशेष क्षेत्रामुळे त्यांना भारतात व्यवसाय सुरु करताना आपल्या घरासारखे वाटेल.
30 वर्षांपूर्वी 270 अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेपासून आज 4 ट्रिलियन डॉलरपर्यंतची झेप आणि 2047 पर्यंत 30-35 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट या भारतातील लक्षणीय परिवर्तनाचा उल्लेख केंद्रीय मंत्र्यांनी केला.
भारत-ईएफटीए व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार - टीईपीएवर भाष्य करताना गोयल यांनी याला ‘विश्वासार्ह आणि कार्यक्षम भागीदारी’ अर्थात परस्पर विश्वास व पूरकतेवर आधारलेले नाते असे म्हटले. हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नवप्रवर्तनासाठी नवीन दारे उघडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“मी विशेषतः स्वित्झर्लंडमधील लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला भारताचे गेल्या दशकातील परिवर्तन पाहण्याचे आमंत्रण देतो. हेच तुम्हाला आवश्यक आत्मविश्वास देईल,” असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
आपल्या भाषणाचा शेवट करताना गोयल यांनी स्विस उद्योग समुदायाला भारतात येण्याचे वैयक्तिक आमंत्रण दिले, “या आणि नवा भारत पाहा, या आणि अनोखा भारत अनुभवा. या आणि भूतकाळाच्या सावल्यांमधून बाहेर पडून जागतिक स्तरावर आपले योग्य स्थान मिळवणाऱ्या देशाचे परिवर्तन पाहा.”
* * *
S.Kane/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2135531)