वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत थेट परकीय गुंतवणूक क्षेत्रातील भारताच्या परिवर्तनशील प्रवासाचे ठळक मुद्दे अधोरेखित
Posted On:
06 JUN 2025 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्लीत वाणिज्य भवन इथे 5 जून 2025 रोजी आयोजित गुंतवणूकदार गोलमेज परिषदेत गुंतवणूकदारांना अनुभवांची देवाणघेवाण करण्यास, भारतातील गुंतवणूक परिसंस्थेतील बदलांविषयी चर्चा करण्यास, भविष्यातील विस्तार योजना आणि देशांतर्गत उत्पन्नाच्या पुनर्गुंतवणूक प्रोत्साहनासाठी रणनीती मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले.
प्रमुख कंपन्या, औद्योगिक संकुले आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी असे 90 हून अधिक जण या गोलमेज परिषदेत सहभागी झाले. राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतील 50 हून अधिक औद्योगिक संकुलांचे प्रतिनिधित्व या कार्यक्रमात होते.
सत्राची सुरुवात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या व्हिडिओ संदेशाने झाली. भारताचा थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) प्रवास खरोखर परिवर्तनशील असल्याचे ते म्हणाले. गुंतवणूकदारांना अनुकूल धोरणांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की बहुतांश क्षेत्रांमध्ये 100% एफडीआय स्वयंचलित मार्गाने परवाना घेऊन करणे शक्य आहे. गोयल म्हणाले की, 2013-14 मध्ये 89 देशांतून थेट गुंतवणूक येत होती, आता 112 देशांमधून गुंतवणूक भारतात येत आहे. हे भारताच्या वाढत्या जागतिक आकर्षणाचे चिन्ह आहे.
भारताची एफडीआय यशोगाथा केवळ प्रभावी आकड्यांपुरती मर्यादित नाही; तर ती दूरगामी सुधारणा, धोरणात्मक स्पष्टता आणि जागतिक समुदायाचा भारताच्या आर्थिक भविष्यावर असलेला विश्वास दर्शवणारी आहे, यावर मंत्र्यांनी भर दिला. भारताला जगातील सर्वाधिक पसंतीचे गुंतवणूक गंतव्य स्थान बनविण्याच्या सरकारच्या दृढ संकल्पाचा त्यांनी पुनरुच्चार केला.
या गोलमेजच्या अध्यक्षस्थानी उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सचिव अमरदीप सिंह भाटिया होते. एफडीआय हा भारताच्या विकासाचा कणा असून, भारताच्या क्षमतेवरील जागतिक विश्वासाचा महत्त्वपूर्ण निदर्शक आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
***
S.Kane/R.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2134549)