ग्रामीण विकास मंत्रालय
सशक्त ग्रामीण समुदायांविना विकसित भारत साकारणे शक्य नाही : केंद्रीय मंत्री चंद्रशेखर पेम्मासानी
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2025 1:17PM by PIB Mumbai
सशक्त ग्रामीण समुदायांशिवाय विकसित भारत घडणे शक्य नाही असे केंद्रीय ग्रामविकास आणि दळणवळण राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. गोव्यात मिरामार येथे पंतप्रधान आवास योजना(पीएमएवाय) -ग्रामीण अंतर्गत आज आयोजित क्षेत्रीय ग्रामीण कार्यशाळेत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की जेव्हा आपली गावे समृद्ध होतील तेव्हाच भारत समृद्ध होईल.

पीएमएवाय-ग्रामीण हे केवळ एक धोरण नाही , या योजनेंतर्गत आशेला मूर्त स्वरूप मिळाले, स्वप्ने साकार झाली आणि कुटुंबांची अनिश्चिततेकडून सुरक्षिततेकडे वाटचाल झाली असे त्यांनी सांगितले. “मार्च 2029 पर्यंत 4.95 कोटी घरांच्या उभारणीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने आम्ही यापूर्वीच उल्लेखनीय भरारी घेतली आहे.आजघडीला, एकूण 3.90 कोटी घरे वितरीत झाली असून 3.69 कोटी घरांच्या उभारणीला मंजुरी मिळाली आहे तसेच 2.76 कोटी घरे बांधून पूर्ण झाली आहेत. यातील प्रत्येक घर शांतपणे झोपणाऱ्या कुटुंबाचे, निर्धोकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांचे आणि सन्मानाने वृद्ध होत जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधित्व करते,” असे ते म्हणाले.

हे परिवर्तन केवळ घराच्या उंबरठ्यापाशी थांबत नाही असे सांगून केंद्रीय मंत्री म्हणाले की केवळ घरे उभारण्यासाठी नव्हे तर समग्र अधिवासाची निर्मिती करण्यासाठी सरकार पीएमएवाय-जी उपक्रमाचे उज्ज्वला, जल जीवन अभियान तसेच स्वच्छ भारत यांसारख्या महत्त्वाच्या योजनांसह एकत्रीकरण करत आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला स्वच्छ पाणी, स्वच्छतेच्या सोयी आणि स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळेल याची सुनिश्चिती आम्ही करून घेत आहोत.

“आम्ही शाश्वत विकास ध्येयांशी जुळवून घेत आमच्या स्थानिक आकांक्षांना जागतिक जबाबदाऱ्यांशी जोडून घेत आहोत जेणेकरुन प्रत्येक गाव मानवतेच्या प्रगतीत योगदान देऊ शकेल. आणि आम्ही सूक्ष्म वित्तपुरवठ्याची पुनर्कल्पना करुन त्याचे रुपांतर अशा सशक्त सेतूमध्ये करत आहोत जो ग्रामीण आकांक्षांना वास्तव संधींशी जोडून लोकांना त्यांची स्वप्ने यशात परिवर्तीत करणे शक्य करेल,”असे केंद्रीय राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर म्हणाले.

यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे ग्रामीण विकास, संस्कृती आणि क्रीडा मंत्री गोविंद गावडे, केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2134528)
आगंतुक पटल : 7