आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन 2025 निमित्त वृक्षारोपण मोहीम; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी "प्लास्टिक प्रदूषण समाप्‍त करणे" या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करून हरित उपक्रमाचे केले नेतृत्व

Posted On: 05 JUN 2025 4:35PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 5 जून 2025

"प्लास्टिक प्रदूषण समाप्त करणे" या संकल्पनेवर आधारित जागतिक पर्यावरण दिन 2025च्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून,आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाने नवी दिल्ली येथील आयुर्वेद मंत्रालयाच्या परिसरात वृक्षारोपण मोहीम आयोजित केली. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संवर्धनाशी आयुर्वेदाचा जवळचा संबंध अधोरेखित करणे आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुष मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी केले.

याप्रसंगी प्रतापराव जाधव यांनी पर्यावरण संवर्धन प्रयत्नांसह आयुर्वेदिक तत्त्वांचे एकत्रीकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले."आयुर्वेद हा मूळतः पर्यावरणाविषयी जागरूक आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, आपण  वृक्षारोपण करून आणि प्लास्टिकचा वापर कमी करून शाश्वत जीवन जगण्याच्या आपल्या  वचनबद्धतेला दुजोरा देतो. प्लास्टिक प्रदूषण संपवण्यासाठी आणि निरोगी वसुंधरेचे  संवर्धन  करण्यासाठी आपण एकत्र काम करूया," असे ते म्हणाले.

यावेळी विविध स्वदेशी आणि औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण केले, ज्यातून  निसर्गाशी सुसंगत राहण्याच्या आयुर्वेदिक तत्वज्ञानाचा पुनरुच्चार करण्यात आला. या कार्यक्रमाने प्लास्टिक प्रदूषणाच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पारंपरिक भारतीय ज्ञान प्रणालींशी जुळवून घेण्याच्या पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम केले.

याप्रसंगी, सर्व उपस्थितांना कापडी पिशव्या देखील वाटण्यात आल्या, ज्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या आणि दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक पर्यायांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहेत. या उपक्रमाने सहभागींना शाश्वत सवयी स्वीकारण्यास आणि एकल-वापराच्या प्लास्टिकपासून दूर जाण्यास प्रोत्साहित केले.

जागतिक पर्यावरण दिनाच्या जागतिक संकल्पनेशी सुसंगत राहण्यासाठी आणि पर्यावरणीय आणि मानवी आरोग्याला समर्थन देणाऱ्या पारंपरिक पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालय आणि राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे.

S.Kane/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2134187)