निती आयोग
azadi ka amrit mahotsav

नीती आयोगाच्या ग्रामीण विकास विभागाने केले 'ग्रामीण सूक्ष्म उद्योगांना बळकटी देणे' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

Posted On: 04 JUN 2025 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जून 2025

नीती आयोगाच्या ग्रामीण विकास विभागाने 4 जून 2025 रोजी नवी दिल्लीतील नीती आयोग कार्यालयात 'ग्रामीण सूक्ष्म उद्योगांना बळकटी देणे' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात धोरणकर्ते, उद्योग प्रमुख, वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था, तंत्रज्ञान पुरवठादार आणि तळागाळातील उद्योजकांना एकत्र जमवून ग्रामीण सूक्ष्म उद्योगांना सक्षम बनवण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

या चर्चासत्रात, समावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यात तसेच प्रादेशिक विषमता कमी करण्यात ग्रामीण सूक्ष्म उद्योगांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आली. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) अर्थात डिजिटल व्यापारासाठी खुले नेटवर्क सारख्या उपक्रमांचा वापर करून धोरणात्मक चौकटी सक्षम करणे, परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज उपलब्धता सुधारणे तसेच डिजिटल आणि बाजारपेठेतील प्रवेश वाढवणे यावरही चर्चासत्रात भर देण्यात आला. नियामक नियमांचे सुलभीकरण तसेच डिजिटल साधने आणि व्यासपीठांची शेवटच्या टप्प्यातील लोकांपर्यंतच्या उपलब्धतेची खात्री करण्याचे महत्त्व चर्चेत अधोरेखित करण्यात आले.

ग्रामीण नवउद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी मिश्र वित्त मॉडेल, संस्थात्मक दुवे आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) निधीचा वापर करण्याचे तज्ञांनी समर्थन केले. बाजारपेठेतील प्रवेश आणि प्रभाव वाढविण्यासाठी ई-कॉमर्स व्यासपीठ आणि खाजगी क्षेत्रातील संसाधने खुली करण्याची गरज देखील अधोरेखित करण्यात आली.

लिंगभाव समावेशावरील एका समर्पित सत्रात भारतातील विविध ग्रामीण भागातील 'लखपती दीदी'सह ग्रामीण महिला नवउद्योजकांच्या तळागाळातील नवोन्मेष आणि यशोगाथांवर प्रकाश टाकण्यात आला. महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योग वाढवण्यासाठी महिला नवउद्योजकता व्यासपीठाचा (WEP) एक प्रमुख सक्षमकर्ता म्हणून उल्लेख करण्यात आला.

चर्चेतील मुख्य निष्कर्षात बहुपक्षीय सहयोग अधिक मजबूत करण्याची आवश्यकता, शासकीय योजनांचा समन्वय, ग्रामीण संस्थांची क्षमता वाढवणे आणि नवोन्मेषासाठी सक्षम परिसंस्था निर्माण करणे यांचा समावेश होता. ग्रामीण नवउद्योजकांना, विशेषतः महिलांना, भारताच्या विकास कथेच्या केंद्रस्थानी ठेवणे हे राष्ट्रीय प्राधान्य निश्चित केले गेले.

या चर्चासत्राचा समारोप नवयुवक परिवर्तनकर्ता आणि हरित उद्योगांच्या नेतृत्वकर्त्यांनी केलेल्या नवोन्मेष, शाश्वतता आणि ग्रामीण विकासाचा वाढता संबंध स्पष्ट करणाऱ्या सादरीकरणाने झाला.

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2133988)
Read this release in: Tamil , English , Urdu , Hindi