इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारताच्या एकूण कॉम्प्युट क्षमतेने ओलांडला 34,000 जीपीयूचा टप्पा
Posted On:
30 MAY 2025 6:03PM by PIB Mumbai
भारताच्या राष्ट्रीय कॉम्प्युट क्षमतेने 34,000 जीपीयूचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर भारताचे स्वतःचे फाउंडेशन मॉडेल तयार करण्यासाठी तीन नवीन स्टार्टअप्सची निवड करून, इंडियाएआय मिशनने स्वदेशी एआय क्षमता मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

हा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित ‘इंडियाएआय- मेक एआय इन इंडिया, मेक एआय वर्क फॉर इंडिया’ कार्यक्रमात भारताच्या एआय म्हणजेच कृत्रिम प्रज्ञा प्रवासाला चालना देण्याच्या उद्देशाने अनेक प्रमुख उपक्रमांची घोषणा केली.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इंडियाएआय मिशन अंतर्गत नवीन निवड झालेल्या चमूंना त्यांच्या संबंधित क्षेत्रात जागतिक स्तरावर अव्वल पाचमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनावर भर देत केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले, "तंत्रज्ञान मोजक्या लोकांपुरते सीमित राहू नये. समाजातील एका मोठ्या वर्गाला तंत्रज्ञानाचा वापर करता यावा, नवीन उपाय विकसित करता यावेत आणि चांगल्या संधी मिळाव्यात हे खूप महत्वाचे आहे. याच तत्वज्ञानाला अनुसरून इंडियाएआय मिशनची निर्मिती झाली. आपण एआय मिशनच्या जवळजवळ प्रत्येक टप्प्यात उल्लेखनीय प्रगती करत आहोत. तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यासाठी कॉमन कॉम्प्युट हे एक अतिशय महत्त्वाचे तत्व आहे."
एआय कोशवर 367 डेटासेट यापूर्वीच अपलोड करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. रिव्हर्स ब्रेन ड्रेनला चालना देण्यासाठी आणि पायाभूत मॉडेल्स, कॉम्प्युट क्षमता, सुरक्षा मानके आणि गुणवत्ता विकास उपक्रमांचा समावेश असलेली एक व्यापक परिसंस्था तयार करण्यात इंडियाएआय मिशनची भूमिका देखील त्यांनी अधोरेखित केली. भारतात एक संपूर्ण आणि समावेशक एआय परिसंस्था तयार करणे हा या प्रयत्नांचा उद्देश आहे यावर त्यांनी भर दिला .

आणखी तीन स्वदेशी फाउंडेशन मॉडेल्स
मिशनमधील इंडियाएआय फाउंडेशन मॉडेल स्तंभाचा उद्देश प्रामुख्याने भारतीय डेटाचे प्रशिक्षण घेतलेली स्वदेशी पायाभूत मॉडेल्स विकसित करणे आणि वापरात आणणे हा आहे. प्रस्तावांसाठी आवाहन केल्यापासून, 30 एप्रिल 2025 पर्यंत 506 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. भारताची सार्वभौम एलएलएम परिसंस्था तयार करण्यासाठी 26 एप्रिल 2025 रोजी, सर्वम एआयची निवड करण्यात आली आहे, जे "2047: सिटीझन कनेक्ट" आणि "AI4Pragati" च्या माध्यमातून प्रशासन आणि सार्वजनिक सेवा प्रवेश सुलभ करण्यासाठी ओपन सोर्स 120 अब्ज पॅरामीटर एआय मॉडेल विकसित करत आहे.
सर्वम एआय व्यतिरिक्त, कठोर बहु-स्तरीय तज्ञ मूल्यांकनानंतर आणखी तीन प्रस्ताव निवडण्यात आले आहेत.
कॉम्प्युट क्षमतेचा विस्तार
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विद्यमान 18,417 सूचीबद्ध जीपीयूमध्ये अतिरिक्त 15,916 जीपीयूची घोषणा केली , त्यामुळे उद्योग भागीदारांच्या मदतीने एकूण 34,333 जीपीयू तयार होतात. क्लाउडवरील ही विस्तारित कम्प्युट क्षमता प्रशिक्षण तसेच कयास बांधण्यासाठी एक सामायिक कम्प्युटेशनल एआय प्लॅटफॉर्म प्रदान करेल, जे भारतीय संदर्भानुसार स्वदेशी आधारभूत मॉडेल आणि एआय उपाय विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
इंडियाएआय I4C सायबरगार्ड एआय हॅकेथॉन
इंडियाएआय अॅप्लिकेशन्स विकास उपक्रमाअंतर्गत , केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इंडियाएआय I4C सायबरगार्ड एआय हॅकेथॉनच्या विजेत्यांची घोषणा केली, जी परिशिष्ट 1 नुसार गृह मंत्रालयाच्या इंडियन सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) सोबत संयुक्तपणे आयोजित करण्यात आली होती.
इंडिया एआय बद्दल
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा एक स्वतंत्र व्यवसाय विभाग असलेली इंडियाएआय ही इंडियाएआय मिशनची अंमलबजावणी संस्था आहे.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2132914)