वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
एनएमसीजीची 63 व्या बैठकीत गंगेच्या उपनद्यांमध्ये पर्यावरणीय प्रवाहासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांना हिरवा कंदील
Posted On:
21 MAY 2025 5:02PM by PIB Mumbai
गंगा आणि तिच्या उपनद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी एका ठोस आणि समग्र उपक्रमांतर्गत, राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाच्या 63 व्या कार्यकारी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पाण्याची गुणवत्ता सुधारणे, शाश्वत शहरी जल व्यवस्थापन आणि गंगा खोऱ्यातील परिसंस्थेची पुनर्स्थापना यासारख्या अभियानाच्या मुख्य उद्दिष्टांशी पूर्णपणे सुसंगत असलेल्या 'शाश्वतता आणि नवोन्मेष' यावर बैठकीचा भर होता.
यावेळी, विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली, ज्यामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प, वैज्ञानिक अध्ययन, तांत्रिक उपाय आणि पुनरुज्जीवन योजनांचा समावेश होता. अल्पकालीन सुधारणांबरोबरच दीर्घकालीन आणि मोजता येण्याजोगा परिणाम सुनिश्चित करण्याचा त्यांचा उद्देश आहे, जेणेकरून नद्या आणि जलसाठ्यांचे अस्तित्व भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित राहील.
बैठकीदरम्यान, उत्तर प्रदेशातील आग्रा या ऐतिहासिक शहरात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली, ज्याची एकूण तरतूद 126.41 कोटी रुपये आहे. या प्रकल्पांतर्गत, 21.20 किलोमीटरच्या इंटरसेप्शन आणि डायव्हर्शन सीवर लाईन्ससह 40 इंटरसेप्शन आणि डायव्हर्शन स्ट्रक्चर्स बांधले जातील. याशिवाय, 8 आधुनिक पंपिंग स्टेशन बसवले जातील आणि जलस्रोतांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी 5 प्रमुख नाल्यांमध्ये प्रभावी पातेरा पटल बसवले जातील.
पर्यावरणीय प्रवाहाची सखोल समज वाढवण्यासाठी, समितीने दोन प्रमुख प्रकल्पांना मान्यता दिली: "कोसी, गंडक आणि महानंदा नद्यांचे पर्यावरणीय प्रवाह मूल्यांकन" ज्याची आर्थिक तरतूद अंदाजे 6 कोटी रुपये आहे आणि "घाघरा आणि गोमती नदी खोऱ्यातील पर्यावरणीय प्रवाह मूल्यांकन" ज्याचा अंदाजे खर्च अंदाजे 8 कोटी रुपये आहे.

बैठकीत पुढील दोन वर्षांसाठी 2.47 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीसह "उत्तराखंडच्या डेहराडून जिल्ह्यातील रामसर स्थळ 'आसन वेटलँड'चे संवर्धन आणि व्यवस्थापन" या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.
***
S.Patil/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2130402)