कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आगामी ‘विकसित कृषी संकल्प अभियाना’वर चर्चा करण्यासाठी राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी आभासी पद्धतीने साधला संवाद


‘विकसित कृषी संकल्प अभियान’ हा कृषी उत्पादनवाढीला चालना देणारा एक प्रमुख उपक्रम : चौहान

Posted On: 19 MAY 2025 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2025

केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतील कृषी भवनातून विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी आभासी पद्धतीने संवाद साधला आणि 29 मे ते 12 जून 2025 या कालावधीत देशभरात होणाऱ्या आगामी 'विकसित कृषी संकल्प अभियान'च्या तयारीबाबत चर्चा केली. चौहान यांनी या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्याचे तसेच कृषी नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचा  फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने काम करण्याचे आवाहन राज्यांना केले.

कृषी उत्पादकता वाढवण्याच्या दिशेने हे अभियान एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगून चौहान म्हणाले की,'विकसित कृषी संकल्प अभियान' हा भारतीय शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणणारा एक प्रमुख उपक्रम आहे. "ही आपली जमीन, ही आपली माती आणि हे आपले शेतकरी आहेत," असे सांगून त्यांनी सर्व नागरिकांना पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्याबरोबर शेतीला फायदेशीर बनवणे, अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे तसेच अन्नधान्य, डाळी, फळे आणि भाज्यांचे उत्पादन वाढवणे ही या अभियानाची उद्दिष्टे असल्याचे स्पष्ट केले.

मंत्री चौहान यांनी यावर भर दिला की ही फक्त सुरुवात आहे आणि अजून बरेच काही करायचे आहे. त्यांनी सांगितले की केंद्र आणि राज्य पातळीवरील संस्था, विभाग, विद्यापीठे आणि संसाधनांमधील अधिक चांगल्या समन्वयामुळे भारतीय शेतीला आणखी मोठे यश मिळू शकेल."समन्वित आणि एकत्रित पद्धतीने काम केल्याने शेतीमध्ये चमत्कार घडू शकतात,"असे ते म्हणाले. त्यांनी अधोरेखित केले की 'विकसित कृषी संकल्प अभियान' हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'लॅब टू लँड' म्हणजेच प्रयोगशाळा ते जमीन या दृष्टिकोनाशी सुसंगत असा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, ज्याचा उद्देश संशोधन आणि शेतकऱ्यांच्या वास्तविक जीवनातील गरजा यांच्यातील दरी कमी करणे हा आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी यावर भर दिला की ही मोहीम विकसित भारतासाठी विकसित कृषी व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने आखली असून देशाचे अन्न भविष्य सुरक्षित करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. त्यांनी हे अभियान साकार करण्यातील राज्य सरकारांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली आणि सर्व राज्यांना ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सामूहिक मालकी आणि कळकळीचे प्रयत्न यांच्याद्वारे हातभार लावण्याचे आवाहन केले.

आपल्या समारोपाच्या भाषणात चौहान यांनी सर्व राज्यांना "एक राष्ट्र, एक शेती, एक पथक" या भावनेने आगेकूच करण्याचे तसेच कृषी उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने आगामी खरीप पेरणीच्या हंगामापूर्वी या नाविन्यपूर्ण मोहिमेत स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्याचे आवाहन केले.


N.Chitale/N.Mathure/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(Release ID: 2129730)
Read this release in: English , Urdu , Tamil