दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ड्रोनवर आधारित क्वांटम संपर्क तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सी-डीओटी आणि सिनर्जी क्वांटम यांच्यात सामंजस्य करार
Posted On:
12 MAY 2025 11:38AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 12 मे 2025
केंद्रीय दूरसंवाद विभागाच्या अखत्यारीतील सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटीक्स (सी-डीओटी)या प्रमुख संशोधन आणि विकास संस्थेने क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रातील सिनर्जी क्वांटम या आघाडीच्या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. डीकॉय-आधारित बीबी84 नियमावलीचा वापर करून ड्रोन-आधारित साधनांसाठी वापरायच्या क्वांटम की वितरण (क्यूकेडी) यंत्रणा विकसित करणे हा या सहयोगामागील उद्देश आहे.
क्वांटमच्या माध्यमातून सुरक्षित संवाद क्षेत्रासंदर्भातील स्वदेशी संशोधनातील प्रगती साध्य करून ही धोरणात्मक भागीदारी ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला पाठबळ पुरवते. सी-डीओटी आणि सिनर्जी क्वांटम या संस्था प्रकाशने तसेच तज्ञांच्या सहभागातून तंत्रज्ञान विकास, संशोधन प्रस्ताव आणि माहितीचा प्रसार यांसंदर्भात एकत्र येऊन काम करतील.
याप्रसंगी बोलताना, सी-डीओटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजकुमार उपाध्याय यांनी भारताचे डिजिटल भविष्य सुरक्षित करण्यात सरकारी-खासगी भागीदारीला असलेल्या महत्त्वावर अधिक भर दिला. सिनर्जी क्वांटमचे मुख्य कार्यकारी अधिकारी जय ओबेरॉय यांनी भारताला ड्रोनवर आधारित क्वांटम संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक नेता म्हणून स्थापित करण्यात या युतीची क्षमता अधोरेखित केली.
उपरोल्लेखित दोन्ही संस्थांतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे संरक्षण क्षेत्र, आपत्कालीन सेवा तसेच महत्त्वाच्या संवादविषयक गरजांसाठी निर्धोक दूरसंवाद पायाभूत सुविधांच्या उभारणीत नवोन्मेषाला अधिक चालना मिळेल.
***
A.Chavan/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128221)
Visitor Counter : 2