कंपनी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफए) आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे “निवेशक शिबीर” उपक्रमासाठी धोरणात्मक पूर्वतयारीविषयक बैठकीचे आयोजन

Posted On: 10 MAY 2025 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 मे 2025

 

गुंतवणूकदारांपर्यंत पोहोच सुधारण्यासाठी तसेच दावा न केलेले लाभांश आणि समभाग परत मिळवण्याची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी हाती घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफए) या संस्थेने भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (एसईबीआय) अर्थात सेबीच्या सहकार्याने काल 9 मे 2025 रोजी मुंबई येथील वांद्रे -कुर्ला संकुलातील सेबीच्या कार्यालयात एका पूर्वतयारी बैठकीचे आयोजन केले.

या धोरणात्मक बैठकीचे आयोजन हा “निवेशक शिबीर” या देशव्यापी गुंतवणूकदार सहाय्यक उपक्रमाच्या अंमलबजावणीतील महत्त्वाचा टप्पा आहे. वित्तीय साक्षरतेत सुधारणा करून तसेच मध्यास्थांवरील अवलंबित्व कमी करून गुंतवणूकदारांना दावा न केलेले लाभांश तसेच समभाग अधिक सुलभतेने परत मिळवणे शक्य करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सर्व प्रकारच्या मदतीसाठी गुंतवणूकदारांना कंपन्यांच्या प्रतिनिधींशी तसेच रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंटशी (आरटीएज) संवाद साधणे शक्य करून देणारा समर्पित हेल्पडेस्क या उपक्रमाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ज्या समभागधारकांचे समभाग आयईपीएफएकडे हस्तांतरित करण्यासाठी पात्र  आहेत त्यांच्याशी अधिक उत्तम प्रकारे संवाद साधता यावा यासाठी खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली:

  1. ज्या समभागधारकांकडे डीमटेरियलाईझ्ड स्वरूपातील समभाग असतील आणि ते आयईपीएफएकडे हस्तांतरित करायचे असतील तर अशा समभाग धारकांना स्पष्टीकरण तसेच मदतीसाठी संबंधित कंपनीला थेट संपर्क करण्यास सांगण्यात येत आहे.
  2. कागदपत्र स्वरुपातील समभाग बाळगणाऱ्या समभागधारकांनी त्यांच्या समभागांची सद्यस्थिती आयईपीएफएच्या संकेतस्थळावर पडताळून घ्यावी. जर असे समभाग आधीच हस्तांतरित झाले असतील तर आयईपीएफ-5 हा अर्ज भरून समभागधारक त्यांच्या दाव्याची प्रक्रिया सुरु करू शकतात. किंवा, ते संबंधित कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंटशी (आरटीएज) संपर्क करू शकतात. आणि  
  3. आयईपीएफएने समभागधारकांसाठी सर्च  सुविधेची तरतूद केली असून ही सुविधा समभागधारकांना त्यांचे समभाग आयईपीएफएकडे हस्तांतरित झाले आहेत की ते अजूनही संबंधित कंपनीकडेच आहेत हे तपासणे शक्य करून देते. यामुळे दावेदारांना त्यांच्या समभागांची सद्यस्थिती ठरवण्याची मुभा मिळून पुनर्प्राप्ती प्रक्रियेतील विलंब कमी करण्यात मदत होते.

IEPFA Search Facility:    https://iepfa.gov.in/login

For more information, visit

https://www.iepf.gov.in/content/iepf/global/master/Home/Home.html

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2128122)
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil