नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महत्त्वाच्या सागरी प्रकल्पांचा मुंबईत घेतला सर्वंकष आढावा

Posted On: 09 MAY 2025 10:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 मे 2025

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत अधिकाऱ्यांच्या सविस्तर आढावा बैठका घेतल्या. सध्याची परिस्थिती लक्षात घेता केंद्रीय मंत्र्यांनी महत्त्वाच्या सागरी प्रकल्पांचा आढावा घेतला आणि व्यापार  सुरळीत राहील याची काळजी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सोनोवाल यांनी मालवाहतूक सुरळीत आणि नियमित राहावी यासाठी करायच्या उपाययोजनांचाही आढावा घेतला.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय), जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए), भारतीय बंदरे रेल्वे आणि रोपवे महामंडळ लिमिटेड (आयपीआरसीएल), इंडियन पोर्ट ग्लोबल लिमिटेड (आयपीजीएल), नौवहन महासंचालनालय आणि मुंबई बंदर प्राधिकरण या प्रमुख संस्थांनी दिवसभर चाललेल्या या बैठकीत भाग घेतला.

केंद्रीय मंत्र्यांनी मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांपैकी एक असलेल्या, गुजरातमधील लोथल येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या (एनएमएचसी) प्रगतीचा आढावा घेतला.

एससीआयचे सीएमडी आणि संचालकांशी झालेल्या सविस्तर संवादामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी  चालू परिचालन , ताफ्यामध्ये वाढ, आणि सरकारच्या व्हिजन 2047 ला अनुसरून दीर्घकालीन विस्तार धोरणांचा आढावा घेतला. भारताची सामरिक राष्ट्रीय शिपिंग लाइन म्हणून, एससीआय, सागरी क्षेत्रातील स्वावलंबन आणि क्षमता विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावते.

जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ व वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर वाढवण येथील ग्रीनफिल्ड मेगा पोर्ट प्रकल्पाचा सखोल आढावा घेण्यात आला. भारताला सागरी क्षेत्रातील जागतिक नेतृत्व बनवण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरून, या बंदराच्या विकासाला गती देण्याच्या आवश्यकतेवर  त्यांनी भर दिला.

केंद्रीय मंत्र्यांनी आयपीजीएलचे अध्यक्ष सुनील मुकुंदन यांचीही भेट घेऊन कंपनीच्या जागतिक कामगिरीचा आढावा घेतला. इराणमधील चाबहार बंदर आणि म्यानमारमधील सित्वे बंदराची प्रगती आणि भविष्यातील योजनांवर यावेळी चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या सागरी पाऊलखुणा उमटवणे, हे या महत्वाच्या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे.

आयपीआरसीएलचे अध्यक्ष एम. के. सेमवाल आणि वरिष्ठ व्यवस्थापनाबरोबर महत्वाच्या  रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात आली. यामध्ये विशेषतः आसाममधील आयडब्ल्यूएआय ऑपरेशन्स आणि प्रमुख बंदरांमधील पायाभूत सुविधांना आधार देणाऱ्या प्रकल्पांचा समावेश होता. मालवाहतुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेता आयपीआरसीएलने बंदराशी जोडलेल्या रेल्वे रुळांच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी केले.

याशिवाय केंद्रीय मंत्र्यांनी नवनिर्मित राष्ट्रीय नौवहन मंडळाशी (एन एस बी) संवाद साधला, त्याचे अध्यक्ष आणि सदस्य यांचे स्वागत करताना मंत्री सोनोवाल यांनी धोरणविषयक  दिशानिर्देशांमधील मंडळाची धोरणात्मक भूमिका विशद केली आणि भारताच्या सागरी भविष्याला आकार देण्यामधील त्याच्या योगदानावर विश्वास व्यक्त केला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही नील अर्थव्यवस्थेच्या संधी शोधण्यासाठी तसेच आपल्या सागरी क्षेत्राला जगातील एक प्रमुख शक्ती बनण्याच्या दिशेने सक्षम करण्यासाठी काम करत आहोत. आपल्या सर्व एजन्सी, संघटना आणि पथके आपल्या देशाचे विकसित भारतात रूपांतर करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या दृष्टिकोनाला साकार करण्यासाठी काम करत आहेत. आम्ही आमच्या प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आणि या सागरी उद्दिष्टांच्या जलद अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्याकरिता भेटलो,” असे सोनोवाल म्हणाले.

टी.के. रामचंद्रन, सचिव (बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग) तसेच आर. लक्ष्मणन, सहसचिव (बंदरे), हेदेखील यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी उच्चस्तरीय चर्चासत्रात भाग घेतला.

 

* * *

N.Chitale/Rajshree/Nandini/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2128009) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Hindi