पंचायती राज मंत्रालय
जागतिक बँक भू परिषद 2025 चा समारोप, भारताच्या ग्रामीण प्रशासन प्रारुपाच्या प्रतिकृतीची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक राष्ट्रे उत्सुक
Posted On:
09 MAY 2025 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2025
भारताने जागतिक बँक भू परिषद 2025 मध्ये आपला मजबूत आणि प्रभावी सहभाग नोंदवला. 5 ते 8 मे 2025 दरम्यान वॉशिंग्टन डी.सी. येथे झालेल्या चार दिवसांच्या परिषदेत, भारताने पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली ‘कंट्री चॅम्पियन’च्या रूपात आपले सामर्थ्य प्रदर्शित केले. या परिषदेत, सर्व समावेशक, तंत्रज्ञान-चालित ग्रामीण प्रशासनाचे प्रारुप म्हणून स्वामित्व योजना आणि ग्राम मानचित्र व्यासपीठ यासारख्या भारताच्या प्रमुख उपक्रमांकडे जगाचे लक्ष वेधण्यात आले.

"भूखंड हक्क आणि प्रशासन सुधारणांमधील उत्तम पद्धती आणि आव्हाने" या विषयाला समर्पित सत्रात, स्वामित्व योजनेद्वारे सुरक्षित भूखंड मालकीमुळे उपजीविका कशी सुधारत आहे, महिला कशा सक्षम बनत आहेत आणि ग्रामीण भारतात कशा प्रकारे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे हे स्पष्ट केले गेले. याशिवाय, देशभरातील शेतकरी, महिला आणि लघु नवउद्योजकांच्या वास्तविक जीवनातील यशोगाथांच्या माध्यमातून भारतातील मालमत्ता हक्क आणि औपचारिकीकृत जमिनीच्या नोंदींचा तळागाळातील लोकांच्या जीवनावर होणारा परिणाम दाखवण्यात आला. 68,000 चौरस किमी क्षेत्राचे सर्वेक्षण आणि 1.16 ट्रीलीयन रुपयांच्या जमिनीचे मुद्रीकरण करून, स्वामित्व योजनेने समावेशक आर्थिक परिवर्तनासाठी एक मापनीय प्रारुप म्हणून जागतिक स्तरावर स्थान मिळविले आहे. त्यानंतर, पंचायती राज मंत्रालयाने "अब्जावधी लोकांसाठी जमीन हक्क सुरक्षित करणे" या शीर्षकाच्या उच्चस्तरीय विशेष सत्राचे नेतृत्व केले. परिषदेतील या सत्रात, जागतिक बँक विभाग आणि अनेक देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत, स्वामित्व योजनेच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत म्हणजेच ड्रोन सर्वेक्षण आणि कायदेशीर चौकटींपासून ते मालमत्ता कार्ड जारी करणे आणि संस्थात्मक अभिसरणापर्यंतच्या अंमलबजावणी आणि परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला.
8 मे रोजी झालेल्या “हवामान कृती आणि आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी भू फाउंडेशन स्थापन करणे” या विषयावरील तांत्रिक सत्रात, पंचायती राज मंत्रालयाचे सहसचिव आलोक प्रेम नागर यांनी ग्राम मानचित्र या एका भू-स्थानिक नियोजन व्यासपीठाबद्दल माहिती दिली. हे व्यासपीठ ग्रामपंचायतींना डेटा-चालित, स्थानिक विकास योजना तयार करण्यास सक्षम बनवते. हवामानानुसार जुळवून घेणे, पायाभूत सुविधा नियोजन आणि योजनांचे एकत्रीकरण यांना प्रोत्साहन देण्यात या साधनाची भूमिका यावेळी मांडण्यात आली. ग्लोबल साउथ संदर्भात या व्यासपीठाच्या उपयुक्ततेबद्दल या व्यासपीठाचे कौतुकही झाले. नागर यांनी आपल्या सादरीकरणात क्षमता निर्माण, आर्थिक प्रोत्साहन आणि सामुदायिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्जता आणि समावेशक विकासासाठी ग्राम मानचित्र व्यासपीठ एक दूरदर्शी उपाय असल्याचे सांगितले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2127968)