आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
‘आरोग्य क्षेत्रातील आपत्ती सज्जता आणि प्रतिसाद’ आणि ‘आरोग्य सेवा सुविधांमधील अग्निसुरक्षा’ या विषयांवरील दुसऱ्या राष्ट्रीय कार्यशाळेचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी केले उद्घाटन
Posted On:
06 MAY 2025 7:56PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, जगत प्रकाश नड्डा यांनी आज नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात ‘आरोग्य क्षेत्रातील आपत्ती सज्जता आणि प्रतिसाद’ आणि ‘आरोग्य सेवा सुविधांमधील अग्निसुरक्षा’ या विषयांवरील दुसऱ्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन केले. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील आपत्ती नोडल अधिकाऱ्यांच्या समन्वयाने मंत्रालयाने ‘अग्निसुरक्षा सप्ताहाचा’ भाग म्हणून आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची सांगता म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून ही कार्यशाळा, आयोजित केली जात आहे.

या कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित करताना, नड्डा म्हणाले की, "ही दुसरी कार्यशाळा आरोग्य सेवा सुविधांमधील आपत्ती आणि अग्निशमन सज्जतेबाबत आरोग्य मंत्रालयाची वचनबद्धता दर्शवते". "आपल्या आरोग्य सुविधा, आपत्ती आणि आगीच्या घटनांसाठी अधिक लवचिक आणि प्रतिरोधक बनवणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच अशा आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा नियमितपणे आयोजित करणे आवश्यक आहे," असे त्यांनी अधोरेखित केले.

आरोग्य सेवा सुविधांची वाढलेली जबाबदारी अधोरेखित करताना, नड्डा म्हणाले की, "आपण उच्च-भाराची उपकरणे आणि ऑक्सिजन आणि रसायनांसारख्या अत्यंत ज्वलनशील पदार्थांसोबत काम करत असल्याने, जे केवळ जीव वाचवतात असे नाही, तर ज्वलनशील देखील आहेत आणि धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे, त्यांच्याबद्दल अधिक संवेदनशीलतेची गरज आहे.
या कर्तव्यात सर्व भागधारकांनी योगदान देण्याचे आवाहन करताना, नड्डा म्हणाले की, "ही जबाबदारी केवळ उच्च स्तरावरील अधिकाऱ्यांवरच नाही, तर रचनेतील पायथ्याशी असलेले कर्मचारी आणि निमवैद्यकीय व्यावसायिकांवरही आहे." केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आपत्ती-प्रतिसादाबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज देखील अधोरेखित केली, ज्यासाठी त्यांनी सैद्धांतिक ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञान आणि प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
नड्डा यांनी अधोरेखित केले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संस्थांचे नियमित अग्निसुरक्षा व्यवस्था परीक्षण करण्याची आणि आपत्ती येण्याआधीच ती रोखण्याच्या गरजेवर भर दिला आहे".
नड्डा यांनी आरोग्य सुविधांमधील आगीच्या धोक्यांबद्दल आणि आपत्ती सज्जतेबाबत संवेदनशीलतेच्या गरजेवर भर दिला आणि सर्वांना नियमित अग्निसुरक्षा परीक्षणासह संवेदनशीलतेच्या पैलूबाबत अतिशय सावध आणि ठाम राहण्याचे आवाहन केले कारण "आपत्ती आणि अग्निसुरक्षेप्रति संवेदनशीलतेचा अभाव आत्मसंतुष्टतेला कारणीभूत ठरतो आणि आत्मसंतुष्टतेमुळे निष्काळजीपणा येतो जो आगीची ठिणगी, आपत्तीची ठिणगी ठरतो".
21 ते 25 एप्रिल 2025 दरम्यान आयोजित 'अग्निसुरक्षा सप्ताह' मध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश, अधिकारी आणि हितधारकांचे नड्डा यांनी अभिनंदन केले. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सामूहिक कृतींच्या गरजेवर भर देत, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य सेवा वितरण प्रणालीच्या सर्व स्तरांवर सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील विविध प्रकारच्या आरोग्य सुविधांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्याची गरज अधोरेखित केली.
नड्डा म्हणाले की, "ही कार्यशाळा केवळ सरकारी रुग्णालयांसाठी नाही तर खाजगी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, सुश्रुषा गृहे , प्रसूती केंद्रे, आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि प्रतिबंधात्मक सुविधांसह देशातील संपूर्ण आरोग्य सेवा क्षेत्रासाठी आहे."
कार्यशाळेतील दोन दिवसांच्या व्यापक सल्लामसलतीमुळे कृतीभिमुख शिफारशी मिळतील अशी अपेक्षा नड्डा यांनी व्यक्त केली. या शिफारशी केवळ आगींविरुद्धच नव्हे तर सर्व-धोकादायक बाबींबद्दल आरोग्य सुविधांची लवचिकता आणि प्रतिसादक्षमता सुधारतील.


कार्यक्रमादरम्यान 'आरोग्यसेवा सुविधांमध्ये अग्निसुरक्षा' या विषयावर आयजीओटी अभ्यासक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. 'अग्निसुरक्षा सप्ताह' दरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनाही या कार्यक्रमादरम्यान गौरवण्यात आले.
***
S.Kakade/S.Kane/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2127353)