माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘कंटेंट पायरसी’- आशयातील चौर्यकर्म या समस्येने आता जागतिक आर्थिक धोक्याचे रूप घेतले - पायरसीला अटकाव करण्याच्या उपायांसंदर्भात जागतिक तज्ञांची वेव्हज 2025 मध्ये चर्चा
मध्यवर्ती आशय चौर्यकर्म प्रतिबंधक कृती दल आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा यासाठी वापर करण्याचे भागधारकांचे आवाहन
Posted On:
03 MAY 2025 10:40PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 3 मे 2025
मुंबईत सध्या सुरु असलेल्या वेव्हज 2025 शिखर परिषदेत आयोजित “आशय संरक्षण धोरणे आणि समन्वय या संदर्भात आंतरराष्ट्रीय हक्कधारकांचे दृष्टीकोन” या विषयावरील महत्त्वाच्या सत्राने डिजिटल पायरसीच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्याच्या तसेच आशय संरक्षणासाठी सहयोगी दृष्टिकोनांचा शोध घेण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी जागतिक पातळीवरील भागधारकांना एकत्र आणले.
तेलुगु चित्रपटसृष्टीतील सुप्रसिध्द चित्रपट निर्माते आणि पायरसीला जोरदार विरोध करणारे राजकुमार अकेला यांनी या सत्रातील चर्चेला प्रारंभ करताना प्रादेशिक चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांना असलेल्या आशय चौर्यकर्मा च्या धोक्यावर अधिक भर दिला. पायरसीविरोधी समर्पित कक्ष आणि डिजिटल पायरसी पथकाच्या स्थापनेसह तेलुगु चित्रपट उद्योगाने या संदर्भात हाती घेतलेल्या धडाडीच्या उपायांची त्यांनी ठळकपणे माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय हक्क तज्ञ डाऊन बॅरिटो आणि जिही ली यांनी बोलताना पायरसीच्या समस्येने आता अत्याधुनिक, सीमापार सायबर गुन्ह्याचे स्वरूप घेतले आहे ही बाब अधोरेखित केली. प्रत्यक्ष भौतिक स्वरूप होणाऱ्या पायरसीबरोबरच विविध संकेतस्थळांवर थेट डाऊनलोड करणे आणि टेलिग्रामसारखे समाज माध्यम मंच यांनी सुलभ करून दिलेल्या डिजिटल स्वरूपातील पायरसीबाबत झालेला चिंताजनक बदल त्यांनी नमूद केला. तज्ज्ञ ली पुढे म्हणाल्या की, सध्याच्या परिसंस्थेत, पायरसी ही आता विशिष्ट स्थानापुरती मर्यादित समस्या राहिलेली नसून तिने जागतिक आर्थिक धोक्याचे रूप घेतले आहे.
नव्याने उदयाला येत असलेल्या डिजिटल पद्धतींवर अधिक भर देत वक्त्यांनी उपस्थितांना असे लक्षात आणून दिले की, कोरियन कार्यक्रम (के-ड्रामाज आणि के-पॉप) भारतात मोठ्या प्रमाणात बघितले जात असतात, मात्र त्यांच्या उत्पन्नाचे नमुने ‘पायरसी मेट्रिक्स’ ने नाही तर कायदेशीर दर्शक सहभाग आणि ब्रँड सहयोगाद्वारे चालवले जातात. या उलट जपानसारख्या देशांमध्ये भारतीय चित्रपटांना वाढती लोकप्रियता मिळत असून त्यायोगे संधी आणि आंतरराष्ट्रीय पायरसी आघाडीवरील धोके अशा दोन्हींसाठी मार्ग खुले झाले आहेत.

आर्थिक घोटाळे आणि सायबर गुन्ह्यांसह अधिक विस्तृत गुन्हेगारी कारवायांना पायरसी कशा प्रकारे वित्तपुरवठा करते याचा देखिल सदर सत्रामध्ये शोध घेण्यात आला. या सत्रातील चर्चांनी व्यापक, जागतिक धोरणांच्या माध्यमातून पायरसीच्या समस्येवर उपाय शोधण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. देशांच्या सीमांच्या पल्याड जाऊन प्रयत्नांमध्ये समन्वय आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वासह मध्यवर्ती पायरसी-विरोधी कृती दलाच्या स्थापनेसह अनेक महत्त्वाच्या शिफारसी यावेळी करण्यात आल्या. अधिक परिणामकारकरीत्या पायरसीचा शोध घेऊन तिचा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने आधुनिक डिजिटल देखरेख आणि अंमलबजावणी तंत्रज्ञाने यामध्ये वाढीव गुंतवणूक करण्याचे देखील आवाहन करण्यात आले. पायरसी केवळ आर्थिक नुकसान करत नाही तर त्यामुळे नवोन्मेष, गुंतवणूक आणि जागतिक सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी एक दीर्घकालीन धोका देखील निर्माण करते यावर सर्व वक्त्यांचे एकमत झाले.
* * *
PIB Mumbai |S.Bedekar/S.Chitnis/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126733)
| Visitor Counter:
15