निती आयोग
azadi ka amrit mahotsav

संपूर्ण भारतभर निकोप उद्योजकता परिसंस्थांच्या निर्मितीस अधिक गती देण्यासाठी जीएएमई आणि निती आयोग यांच्यामध्‍ये धोरणात्मक भागीदारी


नागपूर, विशाखापट्टणम, उत्तर प्रदेशमधील पथदर्शी कार्याव्दारे स्थान-आधारित उद्योजकता हस्तक्षेपांना प्रोत्साहन देण्यावर भागीदारीचा मुख्य भर

Posted On: 02 MAY 2025 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2025

 

भारतातील विविध राज्यांमध्ये चैतन्यशील उद्योजकता परिसंस्था निर्माण होण्यास पाठबळ देण्याच्या उद्देशाने ‘ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशिप’ (GAME) आणि निती आयोगाने धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून नागपूर, विशाखापट्टणम आणि उत्तर प्रदेशमधील पथदर्शी स्थळे  म्हणून निवडण्यात आलेल्या ठिकाणांपासून सुरुवात करून स्थान-आधारित हस्तक्षेपांना चालना देण्यावर मुख्य भर असणार आहे.

या भागीदारीद्वारे स्थानिक उद्योजकांना सक्षम बनवण्याचा तसेच त्या विशिष्ट भागातील उद्योजकता परिसंस्थेमध्ये संबंधित स्थानिक भागधारकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल, या भागधारकांमध्ये सरकार, कॉर्पोरेट्स, शैक्षणिक संस्था, वित्तीय संस्था, यशस्वी उद्योजक आणि समुदाय संघटनांचा समावेश आहे. प्रत्येक भागातील विशिष्ट अशा आव्हानांवर स्थानिक पातळीवर उपाय शोधून उद्योजकतेला आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीस चालना देणाऱ्या चळवळीचे रुप प्राप्त करून देणे हा GAME आणि निती आयोगाचा उद्देश आहे. 

या उपक्रमाविषयी बोलताना, निती आयोगाच्या उद्योग/एमएसएमई विभागाचे कार्यक्रम संचालक इश्तियाक अहमद म्हणाले, "विविध क्षेत्रांमध्ये एंड-टू-एंड सुविधा आणि सहयोग हा आमच्या दृष्टीकोनाचा मूळ उद्देश आहे. त्यांच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि त्यांना आव्हानांना तोंड देण्यास मदत करण्याकरिता बॉटम्स-अप दृष्टीकोनाचा लाभ करून घेणे आणि स्थानिक उद्योजक आणि यशस्वी मान्यवरांसोबत जवळून काम करणे गरजेचे आहे, 

या सहयोगामागील आपला दृष्टीकोन स्पष्ट करताना GAME चे अध्यक्ष केतुल आचार्य यांनी सांगितले की "लोकांचे जीवन आणि समुदायांमध्ये बदल घडवून आणण्याची उद्योजकतेमध्ये ताकद आहे, असा GAME मधील, आम्हा सर्वाना विश्वास आहे. एकमेकांच्या साथीने स्थानिक पातळीवर नवोन्मेषाला प्रेरणा देणारी आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देणारी वाढती परिसंस्था निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे."

GAME आणि निती आयोग यांच्यातील या सहकार्यामुळे उद्योजकतेच्या आड येणारे व्यवस्थेतील अडथळे दूर करणाऱ्या नाविन्यपूर्ण उपायांचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे.

जीएएमई विषयी:

मोठ्या संख्येने उद्योजकतेची देशव्यापी चळवळ पुढे जाण्यास  उत्प्रेरक ठरेल या हेतूने ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशिप (GAME) ची निर्मिती करण्यात आली. धारणा बदलणे तसेच बहुआयामी आणि एकात्मिक पद्धतीने उद्योजकतेची जोपासना करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. आर्थिक, शैक्षणिक आणि धोरण व्यवस्थांमध्ये सहयोगी दृष्टिकोनाद्वारे वित्त पुरवठा तसेच बाजारपेठ उपलब्ध होण्याबाबतची  आणि त्याचबरोबर नियामक आव्हाने दूर करण्यासाठी GAME  कार्य करते.

 

* * *

S.Bedekar/M.Ganoo/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2126130) Visitor Counter : 21
Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil