राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्यांच्या जीविताच्या रक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे मानवाधिकार आयोगाचे 11 राज्यांना आवाहन
2018 ते 2022 कालावधीत उन्हाळा आणि उष्माघातामुळे 3,798 मृत्यू झाल्याचे NCRB च्या आकडेवारीतून समोर
निवाऱ्याच्या आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना, उघड्या जागेत काम करणारे श्रमिक, वृद्ध, लहान मुले आणि विशेषत: बेघर लोकांना अधिक धोका
राज्यांमधील विद्यमान नियमावली किंवा NDMA मार्गदर्शक तत्त्वांनुसार उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी केलेल्या उपायांचा अहवाल सादर करण्याची सूचना
Posted On:
01 MAY 2025 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2025
उन्हाळ्यात, विशेषत: देशाच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता, निवाऱ्याच्या अपुऱ्या सुविधा, संसाधनांच्या कमतरतेमुळे ज्या लोकांना त्याचा अधिक धोका आहे अशा विशेषत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील, घराबाहेर काम करणारे कामगार, वृद्ध, लहान मुले आणि बेघर लोकांच्या संरक्षणासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) 11 राज्यांना दिले आहेत. 2018 ते 2022 या कालावधीत कडक ऊन आणि उष्माघातामुळे 3,798 लोकांच्या मृत्यू झाल्याचे NCRB च्या डेटातून आढळल्याचे अधोरेखित करत आयोगाने त्यावर तातडीच्या एकात्मिक आणि सर्वसमावेशक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.
आयोगाने यासंदर्भात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून निवारा, मदत साहित्याचा पुरवठा, कामाच्या वेळांमध्ये बदल आणि उष्म्यामुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.
राज्यांना पाठवलेल्या पत्रात आयोगाने उष्णतेच्या लाटेमुळे होणारा परिणाम कमी करण्यासाठी NDMA मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जावे, याचा पुनरुच्चार केला आहे, त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- उष्म्याशी-संबंधित आजारावर उपचारांसाठी मानक प्रक्रियांची आखणी आणि अंमलबजावणी करावी;
- शाळा, अंगणवाडी केंद्र आणि कम्युनिटी हॉल अशांसारख्या सार्वजनिक जागी हवा खेळती राहण्याच्या, पंखे, पिण्याचे पाणी आणि मूलभूत वैद्यकीय पुरवठा अशा सोयींची तरतूद करावी
- अनौपचारिक वसाहती आणि कामगार वसाहतींमधील कुटुंबांना पंखे, छत थंड राहील असे साहित्य आणि ORS चे पाकीटे उपलब्ध करून द्याव्यात; आणि
- कामांच्या वेळांमध्ये बदल, सावलीत विश्रांती घेण्याजोगी जागा, पिण्याच्या पाण्यची सोय करावी तसेच उन्हापासून संरक्षण होईल, असे कपडे वापरण्यास प्रोत्साहन द्यावे.
विद्यमान मानक कार्यप्रणाली (SOPs) किंवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी राज्यांना जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उष्णतेच्या लाटेचा धोका असलेल्या लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत, याचा अहवाल सादर करण्याचीही सूचना या राज्यांना करण्यात आली आहे.
* * *
H.Raut/M.Ganoo/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2125868)
Visitor Counter : 14