युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
डॉ. मनसुख मांडविया यांनी 2 दिवसीय एनएसएस राष्ट्रीय अधिवेशनाचे केले उद्घाटन , 'सेवेच्या' आधुनिक युगासाठी केले आवाहन
Posted On:
25 APR 2025 8:40PM by PIB Mumbai
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) - राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन केले. 15 वर्षांच्या खंडानंतर हे प्रतिष्ठित अधिवेशन पुन्हा होत आहे. दोन दिवसांच्या या अधिवेशनात देशभरातील 200 हून अधिक एनएसएस अधिकारी सहभागी होणार आहेत.
एनएसएस अधिवेशनाला संबोधित करताना, डॉ. मांडविया यांनी सध्याच्या जागतिक आव्हानांच्या संदर्भात 'सेवा' पुनर्भाषित करण्याची गरज अधोरेखित केली. एनएसएसचे माजी स्वयंसेवक म्हणून आपल्या अनुभवाच्या आधारे त्यांनी पर्यावरणीय सक्रियता, सांस्कृतिक संवर्धन आणि अनुभवात्मक शिक्षणात युवकांना सहभागी करून घेण्यावर भर दिला.
"डिजिटल युगात, 'सेवा'चा अर्थ बदलला पाहिजे. पर्यावरणीय सक्रियता, वारसा जतन इत्यादींमध्ये आपले युवक आघाडीवर असले पाहिजेत. अनुभवात्मक शिक्षणासोबत सेवा हा नवीन नियम असायला हवा ," असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली 2023 मध्ये सुरू झालेल्या मेरा युवा भारत (माय भारत) च्या परिवर्तनात्मक भूमिकेवर त्यांनी भर दिला. राष्ट्र उभारणीच्या दिशेने युवकांची ऊर्जा आणि क्षमता वळवण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे असे त्यांनी नमूद केले. डॉ. मांडविया यांनी युवकांना प्रेरित करण्यासाठी , सक्षम बनवण्यासाठी सर्व हितधारकांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले जेणेकरून ते विकसित भारताचे स्वप्न साकारण्यात माहितीपूर्ण आणि सक्रिय योगदान देणारे बनतील.
तत्पूर्वी डॉ. मांडविया यांनी राष्ट्रीय एनएसएस सल्लागार परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले, ज्यामध्ये युवा स्वयंसेवेचे आधुनिकीकरण आणि उदयोन्मुख राष्ट्रीय प्राधान्यांशी एनएसएसचे संरेखन करण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत एनएसएस मानक कार्यपद्धती (एसओपी) सुधारण्यासाठी तज्ञ उप-समित्या स्थापन करणे, संशोधनाभिमुख उपक्रम सुरू करणे, पुरस्कार प्रणाली अद्ययावत करणे आणि प्रशिक्षण चौकट विस्तारणे या प्रमुख ठरावांना मंजुरी देण्यात आली. युवकांच्या सहभागासाठी एक एकीकृत, समग्र मॉडेल तयार करण्यासाठी मेरा युवा भारत (माय भारत) प्लॅटफॉर्म अंतर्गत एनएसएस आणि एनसीसीचे धोरणात्मक एकत्रीकरण करण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांनुसार, एनएसएस स्वयंसेवक उपक्रमांना वाढीव रोजगारक्षमतेशी जोडणे, शैक्षणिक क्रेडिट्सची तरतूद करणे आणि राष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त कौशल्य प्रमाणपत्रांद्वारे मान्यता देणे यावर देखील चर्चा करण्यात आली. तसेच , सार्वजनिक-खाजगी सहकार्य, नवोन्मेष-प्रणित उपक्रम आणि संशोधनाभिमुख स्वयंसेवा यांना प्रोत्साहन देण्यावर चर्चेत भर देण्यात आला. युवा सक्षमीकरण आणि राष्ट्र-उभारणीसाठी एनएसएसला एका गतिमान माध्यमात परिवर्तित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2124444)
Visitor Counter : 20