संरक्षण मंत्रालय
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्क्रॅमजेट इंजिन विकासात गाठला महत्वाचा टप्पा
Posted On:
25 APR 2025 8:30PM by PIB Mumbai
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अखत्यारितील हैदराबादस्थित संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने ध्वनीपेक्षा पाचपट अधिक वेगाने (हायपरसॉनिक) मारा करू शकणार्या शस्त्रास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. डीआरडीएलने 25 एप्रिल 2025 रोजी हैदराबाद इथे नव्याने उभारलेल्या अत्याधुनिक स्क्रॅमजेट कनेक्ट चाचणी सुविधेत 1,000 सेकंदांपेक्षा जास्त कालावधीसाठी सक्रिय शीतकरण प्रणाली असलेल्या स्क्रॅमजेट सबस्केल कम्बस्टरची जमिनीवर दीर्घकाळ चाचणी केली. यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये 120 सेकंदासाठी अशी चाचणी घेतली गेली होती. आज 25 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आलेल्या चाचणी ही याच मालिकेतील पुढची चाचणी आहे. या यशस्वी चाचणीनंतर आता या तंत्रज्ञानाची पूर्ण क्षमतेच्या आणि हवाई उड्डाणासाठी योग्य असलेल्या कम्बस्टर चाचणी करता येणार आहे.

हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र अर्थात दिशानियंत्रित क्षेपणास्त्र ही ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट अधिक (> 6100 किमी प्रति तास) वेगाने दीर्घकाळ मार्गक्रमण करू शकणार्या आणि वायुसंशोषक इंजिनद्वारे (Air breathing engine) संचालित असलेल्या वर्गवारीतील शस्त्रांमधील क्षेपणास्त्रे आहेत. आज 25 एप्रिल 2025 रोजी घेतलेल्या चाचणीद्वारे दीर्घकाळ कार्यरत राहणाऱ्या स्क्रॅमजेट कम्बस्टरच्या तसेच चाचणी सुविधेच्या डिझाइनची पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आजच्या चाचणीचे यश हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळा, तसेच संबंधित उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक संस्था या सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे आणि यामुळे देशाच्या हायपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमासाठी एक मजबूत पाया तयार होण्याचा मार्गही प्रशस्त झाला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, उद्योग क्षेत्रातले भागीदार आणि शैक्षणिक संस्थांचे अभिनंदन केले आहे. देशाला हायपरसॉनिक शस्त्र तंत्रज्ञानासारखे महत्वाचे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी केंद्र सरकारच्या दृढ संकल्पाचे प्रतिबिंब या यशातून उमटले असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या अंतर्भावासह 1,000 सेकंदांपेक्षा जास्त काळ सुपरसॉनिक ज्वलनाच्या या यशस्वी प्रात्यशिकासाठी संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत यांनी देखील संस्थेच्या क्षेपणास्त्रे आणि सामरिक प्रणाली विभागाचे महासंचालक यू. राजा बाबू, संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे संचालक डॉ. जी. ए. श्रीनिवास मूर्ती आणि संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2124443)
Visitor Counter : 51