पोलाद मंत्रालय
'इंडिया स्टील 2025 या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचा माहितीपूर्ण संवाद आणि उद्योग प्रेरित नवोन्मेषाने भरलेल्या वातावरणात उत्साहवर्धक प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
24 APR 2025 9:57PM by PIB Mumbai
मुंबई, 24 एप्रिल 2025
मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित इंडिया स्टील 2025 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचे आज उत्साहवर्धक वातावरणात उद्घाटन झाले. परिषदेच्या पहिल्या दिवशी आयोजित कार्यक्रमांनी पुढील तीन दिवस चालणारा संवाद, सहकार्य आणि नवोन्मेशासाठीचे व्यासपीठ सज्ज केले. भारत सरकारचे पोलाद मंत्रालय आणि फिक्की (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री), अर्थात भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या द्वैवार्षिक कार्यक्रमाने पोलाद उद्योगासाठी देशातील प्रमुख व्यासपीठ म्हणून पुन्हा एकदा आपले महत्व सिद्ध केले आहे.
उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. देशांतर्गत पोलाद उत्पादन वाढविणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि मेक इन इंडियाला प्रोत्साहन देणे, या भारताच्या धोरणात्मक दृष्टीकोनावर त्यांनी यावेळी भर दिला. पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा, पोलाद मंत्रालयाचे सचिव संदीप पोंड्रिक, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) चे अध्यक्ष अमरेंदू प्रकाश, फिक्की स्टील कमिटीचे अध्यक्ष अनंत गोएंका, फिक्कीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि आरपीजी ग्रुपचे उपाध्यक्ष, वर्ल्ड स्टील असोसिएशनचे महासंचालक एडविन बॅसन आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दिवसभरात भारतीय पोलाद क्षेत्राची क्षमता, आव्हाने आणि संधी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा लाभ घेण्यासाठीच्या पथदर्शक आराखड्यावर चर्चा करण्यासाठी महत्वाच्या सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
'विकसित भारत : भारतीय अर्थव्यवस्थेतील पोलाद क्षेत्राची भूमिका' या विषयावरील चर्चासत्रात, ज्येष्ठ धोरणकर्ते, अर्थतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांचा समावेश असलेल्या पॅनेल सदस्यांनी भारताच्या पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी पोलाद उद्योगाच्या महत्वाच्या भूमिकेवर अभ्यासपूर्ण विचार मांडले.
या सत्रात, आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत पायाभूत सुविधा, रोजगार आणि स्वावलंबनाला चालना देण्याच्या या क्षेत्राच्या क्षमतेवर भर देण्यात आला. सेलचे अध्यक्ष अमरेंदू प्रकाश यांनी सत्राची प्रस्तावना केली. तर, रशियाच्या उद्योग आणि व्यापार मंत्रालयाचे उपमंत्री मिखाइल युरिन, आणि भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार अश्विनी कुमार या पॅनेल सदस्यांनी आपले विचार मांडले.
केंद्रीय पोलाद आणि अवजड उद्योग राज्य मंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा ‘मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज’ बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. महत्वाच्या सहभागींनी भारतीय पोलाद क्षेत्रापुढील सध्याची आव्हाने आणि या क्षेत्राची वृद्धी यावर चर्चा केली.
‘भारत-रशिया गोलमेज’ बैठकीने दोन्ही देशांतील महत्त्वाच्या भागधारकांच्या द्विपक्षीय सहभागासाठीचा धोरणात्मक मंच म्हणून काम केले.यावेळी सहभागी भारतीय शिष्टमंडळात पोलाद विभाग सचिव, अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागार (एएस आणि एफए), बीआयएसचे महासंचालक, संयुक्त सचिव (एएन आणि व्हीकेटी), सेल कंपनीचे संचालक यांसारखे ज्येष्ठ अधिकारी तसेच टाटा स्टील, एएमएनएस, जेएसडब्ल्यू, जेएसपीएल, जेएसएल आणि उद्योगक्षेत्रातील इतर प्रमुख सदस्य कंपन्यांसह खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. रशियाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व उद्योग आणि व्यापार मंत्रालयाचे उपमंत्री मिखाईल युरीन तसेच उर्जा मंत्रालयातील कोळसा उद्योग विकास विभागाचे संचालक बॉबीलेव्ह पेत्र यांनी केले. व्यापार क्षेत्रातील महत्त्वाचे प्रतिनिधी देखील या गोलमेज परिषदेत उपस्थित होते. या बैठकीतील चर्चा पोलाद आणि खनन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवणे, संयुक्त उपक्रमांना चालना देणे आणि तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच व्यापार सुलभीकरण यांचे नवे मार्ग शोधून काढणे इत्यादी मुद्द्यांवर आधारलेली होती.
जगभरातील 15 देशांतून आलेल्या अडीचशेहून अधिक प्रदर्शकांच्या सहभागासह, अत्याधुनिक उपकरणे, स्वयंचलीकरण साधने आणि शाश्वत उत्पादन लाईन्सचे दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमांनी प्रदर्शन दालन गजबजले होते. येथे आलेल्या प्रतिनिधींनी पोलाद उद्योगाचे भविष्य घडवणाऱ्या कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स आणि पदार्थ विज्ञान या क्षेत्रांतील नव्या घडामोडींची माहिती घेतली.
उद्या, इंडिया स्टील 2025 या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय वाणिज्य तसेच उद्योगमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय नूतन आणि नुतनीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पायाभूत सुविधा, निर्यात धोरणे आणि कौशल्य विकास यांवर आधारित विविध सत्रांच्या माध्यमातून हे मान्यवर उपस्थित उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती, प्रतिनिधी आणि प्रदर्शक यांना संबोधित करतील. सीमापार सहयोग आणि व्यापार वृद्धीला चालना देण्यासाठी नेटवर्किंग कार्यक्रम आणि व्यापार संस्थांच्या दरम्यानच्या बैठका देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.
येत्या 26 एप्रिलपर्यंत चालणारा इंडिया स्टील 2025 हा उपक्रम भागधारकांना सहभागी होऊन, आपापल्या कल्पना मांडून, भविष्यातील मार्ग शोधण्यासाठी व्यापक मंच उपलब्ध करून देतो.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/Rajshree/Sanjana/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2124187)
आगंतुक पटल : 55