विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारतात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची चाचणी सुलभ करण्यासाठी विकसित स्वदेशी एचपीव्ही चाचणी कीटचे पुनरावलोकन आणि वैज्ञानिक समीक्षा करण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जैवतंत्रज्ञान विभाग, एम्स (AIIMS) नवी दिल्ली, बीआयआरएसी, आयसीएमआर आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन
Posted On:
23 APR 2025 9:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2025
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे, भारतात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी विकसित स्वदेशी एचपीव्ही चाचणी किटचे पुनरावलोकन करण्यासाठी जैवतंत्रज्ञान विभाग, एम्स (AIIMS) नवी दिल्ली, बीआयआरएसी, आयसीएमआर आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत जैवतंत्रज्ञान विभागाने (डीबीटी) प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा क्षेत्रात गाठलेला हा महत्वाचा टप्पा असल्याचे ते यावेळी म्हणाले.

प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेत भारताला जगात अव्वल स्थान मिळवून देणे, हे अंतिम उद्दिष्ट असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले. डीबीटी आणि बीआयआरएसी मधील टीम ने मिळवलेल्या यशाच्या महत्वाच्या टप्प्यांना मान्यता देण्याची हीच वेळ असून, यामध्ये भारताने विकसित केलेल्या पहिल्या डीएनए लसीचा समावेश आहे, ज्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आणि आरोग्यसेवेच्या क्षेत्रात भारतीय विज्ञानाला सन्मान प्राप्त झाला, असे ते म्हणाले.
डीएनए लसीने भारताला प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेत अग्रेसर राहण्यासाठी सक्षम देश म्हणून ओळख मिळवून दिली, ज्यामुळे भारताने प्रतिबंधात्मक अथवा उपचारात्मक आरोग्यसेवेला कधीच प्राधान्य दिले नाही, या कालबाह्य समजुतीला छेद दिला, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.
भारतातील पहिले स्वदेशी प्रतिजैविक, नेफिथ्रोमाइसिनचा देखील त्यांनी उल्लेख केला, ज्याला उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला आहे. जितेंद्र सिंह यांनी खासगी क्षेत्राचा सहभाग, हा या यशोगाथेचा अविभाज्य भाग असल्याचा पुनरुच्चार केला, आणि "संपूर्ण विज्ञान आणि संपूर्ण सरकार दृष्टीकोन" अधोरेखित केला.

हिमोफिलियामधील यशस्वी जनुक थेरपी चाचणी, ज्याने प्रतिष्ठित न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन (एनईजेएम) मध्ये स्थान मिळवले. विशेष म्हणजे जगातील सर्वात जुन्या वैद्यकीय नियतकालिकांपैकी एक असलेल्या ब्रिटिश मेडिकल जर्नल आणि एनईजेएम या दोन्ही नियतकालिकांनी भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील अग्रगण्य संशोधनाला मान्यता दिली आहे, असे ते म्हणाले.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी विशेष लक्ष केंद्रित करण्याचे चार स्तंभ सांगितले. 1. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा- आरोग्यसेवेचे भविष्य प्रतिबंधातच असल्यामुळे आगामी काळात सरकारचे मुख्य उद्दिष्ट हेच राहील. 2. युवाकेंद्रित प्रतिबंधात्मक उपाय- किशोरवयीन आणि तरुणी मुलींमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन, लहान वयात हस्तक्षेप करण्यावर भर दिला जाईल. 3. महिलांचे आरोग्य - आरोग्य आणि महिला व बाल विकास मंत्रालयासह इतर मंत्रालयांमध्ये सरकारी उपक्रमांना बळकटी देणे. 4. खासगी क्षेत्राचा सहभाग- सरकारी आणि खासगी कंपन्या देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर परस्परांना सहकार्य करतील, अशी परिसंस्था निर्माण करणे.

या आढावा बैठकीला अनेक मान्यवर आणि संबंधित क्षेत्रातील तज्ञ उपस्थित होते. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल, जैवतंत्रज्ञान विभागाचे (डीबीटी) सचिव डॉ. राजेश गोखले, बीआयआरएसी चे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र कुमार, आणि स्त्रीरोग ऑन्कोलॉजी क्षेत्रातील ख्यातनाम तज्ञ पद्मश्री डॉ. नीरजा भाटला यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती आणि त्यांनी पुनरावलोकन प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123969)
Visitor Counter : 18