नौवहन मंत्रालय
एमआयसीटी या भारतातील सर्वात मोठ्या मुंबई आंतरराष्ट्रीय प्रवासी जलवाहतूक स्थानकातून, मुंबईत प्रवासी जलवाहतुकीचे केंद्रीय नौवहन आणि जलवाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन
सर्वानंद सोनोवाल यांनी कुलाबा येथील दोन इतर वारसा इमारतींसह व्हिक्टोरिया डॉक्स येथे नूतनीकरण केलेल्या अग्निशमन स्मारकाचे केले उद्घाटन; 'सागर उपवन' उद्यानासह किनाऱ्यापासून नांगरलेल्या जहाजाच्या धक्क्यापर्यंत विद्युत पुरवठ्यामुळे हरित बंदर उपक्रमांना चालना
बंदर पायाभूत सुविधा विकास आणि माल हाताळणी सुविधांच्या उद्देशाने वाढवण बंदराच्या धोरणात्मक विकासासाठी तीन सामंजस्य करारांवर, सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या
वाढवण बंदरात 5700 कोटी रुपये किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासासाठी सामंजस्य करारावर, सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी
Posted On:
21 APR 2025 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 एप्रिल 2025
मुंबई बंदराच्या नवीन आंतरराष्ट्रीय प्रवासी जलवाहतूक स्थानकातून (क्रूझ टर्मिनल) प्रवासी जलवाहतुकीचा औपचारिक शुभारंभ, तसेच विविध प्रकल्पांचे उद्घाटन, आज सोमवार 21 एप्रिल 2025 रोजी, प्रमुख पाहुणे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते झाले. मुंबई बंदर प्राधिकरणाने (एमबीपीए) आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. सीमाशुल्क, इमिग्रेशन आणि बंदर जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण जे एन पी ए चे अध्यक्ष उमेश वाघ, तसेच जे.एम. बक्षी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ध्रुव कोटक देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
एमबीपीएचे अध्यक्ष सुशील कुमार सिंह आणि उपाध्यक्ष आदेश तितरमारे, यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुरु होत असलेले प्रकल्प आणि एमबीपीएच्या दीर्घकालीन विकास धोरणाशी ते कसे सुसंगत आहेत, याविषयी त्यांनी माहिती दिली. बहुस्तरीय वाहनतळ आणि क्रूझ टर्मिनलच्या व्यावसायिक भागाचे काम, ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

क्रूझ भारत मिशननुसार विकसित केलेले एमआयसीटी हे नवीनतम जागतिक मानकांनुसार विकसित केले गेले आहे आणि भारतात क्रूझ पर्यटनाच्या विकासात अग्रणी भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. 4,15,000 चौरस फूटाहून क्षेत्रावर पसरलेले हे एमआयसीटी,मुंबईत बॅलार्ड पियर येथे विकसित करण्यात आले आहे. एमआयसीटी हे भारतातील सर्वात मोठे जागतिक दर्जाचे क्रूझ टर्मिनल आहे. पहिल्या दोन मजल्यांवर (तळमजला+1), 2,07,000 चौरस फूट क्षेत्रात पसरलेले 72 चेक इन आणि इमिग्रेशन काउंटर आहेत, तर इतर दोन मजले (2 + 3) व्यावसायिक मजले म्हणून विकसित केले आहेत. नव्याने उद्घाटन केलेल्या या एमआयसीटी ची रचना, दररोज अंदाजे 10,000 प्रवासी, असे दरवर्षी10 लाख प्रवाशांना हाताळू शकेल अशा पद्धतीने केली आहे. इथे एकाच वेळी 5 जहाजे देखील उभी राहू शकतात. या धक्क्यांची खोली 11मीटर आणि लांबी 300 मीटर आहे. इथल्या वाहनतळामध्ये एकाच वेळी 300 हून जास्त वाहने उभी केली जाऊ शकतात.या एम आय सी टी प्रकल्पामध्ये 556 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
एमआयसीटीकडून क्रूझ सेवेच्या सुरुवातीबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले, “मुंबईचा सागरी इतिहास समृद्ध आहे आणि आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. किनारी केंद्र म्हणून, मुंबई बंदराने आपल्या गजबजलेल्या किनारी व्यवसायाच्या माध्यमातून देशाची उत्तम सेवा केली आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या ‘भारत आपल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांद्वारे जागतिक क्रूझ हब बनावे’ हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण काम करत राहणे क्रमप्राप्त आहे. आज, जगातील एक प्रमुख सागरी केंद्र म्हणून दीर्घकाळापासून प्रतिष्ठा टिकवलेल्या मुंबईने, मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथून प्रवासी जलवाहतूक सुरू केली आहे, ज्यामुळे प्रवाशांना चांगल्या आणि सुरक्षित अनुभवासाठी आधुनिक सुविधा मिळतात.”

क्रूझ भारत मोहिमेच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री श्री. सर्वानंद सोनोवाल म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या बंदर-केंद्रित समृद्धीच्या आवाहनाने आपल्या सागरी महत्त्वाकांक्षांना पुन्हा परिभाषित केले आहे. आम्ही 'क्रूझ भारत मोहिमे'लाही गती देत आहोत.भारताला जगातील सर्वोत्तम क्रूझ स्थळांपैकी एक बनवण्याचा आमचा संकल्प आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली, भारताच्या सागरी क्षेत्रात आश्चर्यकारक परिवर्तन घडले आहे. ही अशा भारताची कहाणी आहे जो आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवतो आणि आपल्या नागरिकांसाठी गुंतवणूक करतो."
बंदर पायाभूत सुविधा विकास आणि माल हाताळणी सुविधांच्या उद्देशाने वाढवण बंदराच्या धोरणात्मक विकासासाठी तीन सामंजस्य करारांवर, सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या.वाढवण बंदरात 5700 कोटी रुपये किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विकासासाठी सामंजस्य करारावर देखील, सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी झाली.
4200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह कंटेनर, बल्क आणि लिक्विड कार्गो हाताळण्यासाठी टर्मिनल विकसित करणे, 1000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह बल्क आणि लिक्विड कार्गो हाताळण्यासाठी समर्पित टर्मिनल विकसित करणे आणि 500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह द्रवीभूत रसायने आणि संबंधित उत्पादने हाताळण्यासाठी 3,00,000 सीबीएम क्षमतेसह द्रवीभूत कार्गो जेट्टी आणि टँक फार्म विकसित करणे यासाठी हे करार करण्यात आले.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी समारंभात बोलताना श्री. सर्वानंद सोनोवाल म्हणाले, "आपले धडाडीचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी आपल्याला, वाढवण बंदर जगातील सर्वोत्तम 10 बंदरांपैकी एक बनवण्याचा संकल्प दिला आहे. वाढवण बंदर प्रकल्पामुळे भारताची सध्याची क्षमता तीन पटीने वाढण्याची शक्यता असल्याने, हे सर्व हवामानात तग धरु शकणारे, ग्रीन फिल्ड मोठी खोली असलेले प्रमुख बंदर केवळ भारताच्या सागरी क्षेत्रासाठीच नव्हे तर प्रादेशिक व्यापारासाठी कलाटणी देणारे म्हणून काम करणार आहे. 2047 पर्यंत भारत विकसित भारत बनण्याच्या तयारीत असल्याने, हे बंदर एक प्रमुख विकास वर्धक म्हणून काम करु शकेल. या संदर्भात, आज स्वाक्षरी केलेले सामंजस्य करार वाढवण बंदराच्या पायाभूत सुविधा आणि क्षमता बांधणीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलण्यात मदत करतात."

आजचा दिवस हा केवळ मुंबईसाठीच नाही तर भारताच्या संपूर्ण सागरी क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण आहे असे सांगत, मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या कार्यान्वित होण्यामुळे, केवळ एक नवीन पायाभूत सुविधाच सुरू होत नाहीये तर, एका उज्ज्वल, धाडसी सागरी भवितव्याचे दरवाजे उघडत आहेत, असे राज्यमंत्री शंतनू ठाकूर यावेळी बोलताना म्हणाले .
हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर 2024 मध्ये सुरू झालेल्या 'क्रूझ भारत मिशन'शी सुसंगत आहे. क्रूझ भारत मिशनने महत्त्वाकांक्षी परंतु साध्य करण्याजोगी उद्दिष्टे ठेवली आहेत. यामध्ये, 10 आंतरराष्ट्रीय समुद्री क्रूझ टर्मिनल्सचा विकास, 100 नदी क्रूझ टर्मिनल्सची निर्मिती, आपल्या किनाऱ्यावर 5 नौकावसाहतींचे (मरीना) उद्घाटन, 500 किमी पेक्षा जास्त जलमार्गांचे अखंड एकत्रीकरण, 2029 पर्यंत 10 दशलक्ष समुद्री क्रूझ प्रवासी आणि 1.5 दशलक्ष नदी क्रूझ प्रवाशांचे उद्दिष्ट, क्रूझ मूल्य साखळीत 400 हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती, यांचा समावेश आहे. 2014 पासून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सागरी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले आहे. प्रमुख बंदरांवर होणारी मालाची चढ उतार 2014 मधील 556 एमएमटीवरून 2024-25 मध्ये 854 एमएमटीपर्यंत वाढली, तर सागरी मालवाहतूक 119 % ने वाढली. आंतरदेशीय जल मालवाहतूक 6.89 एमएमटीवरून 133 एमएमटीपर्यंत वाढली. ही वाढ, 1800 % पेक्षा जास्त आहे. क्रूझ प्रवाशांची संख्या 2014 मधल 85,000 वरून आजपर्यंत 4.71 लाख इतकीझाली आहे.ही 454% ची अभूतपूर्व वाढ आहे.
व्हिक्टोरिया डॉक्स येथील नूतनीकरण केलेल्या अग्निशमन स्मारकात देखील आज, मुंबई बंदर अग्निशमनदलाच्या कर्तव्य बजावत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहणारा विशेष समारंभ झाला. या नूतनीकरणाचे उद्घाटन देखील सोनोवाल यांच्या हस्ते झाले. या स्मारकाचे नूतनीकरण "गोल्डन टीअर्स" अर्थात सोनेरी अश्रू या संकल्पनेसह करण्यात आले आहे. वारसा आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी, शहराच्या वारशाचे सौंदर्य आणि ऐतिहासिक आकर्षणात भर घालणारी प्रकाशयोजना, एमबीपीएच्या दोन प्रतिष्ठित वारसा इमारती - बॅलार्ड इस्टेट येथील पोर्ट हाऊस आणि कुलाबा येथील एव्हलिन हाऊस येथे दर्शनी भागावर करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, कुलाबा येथील पुनरुज्जीवित सागर उपवन उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे नागरिक आणि पर्यटकांसाठी, सुविधांसह एक सुधारीत ताजेतवाने हिरवेगार निसर्गस्थळ उपलब्ध झाले आहे. हरित बंदर उपक्रमा (ग्रीन पोर्ट इनिशिएटिव्ह्ज) अंतर्गत, किनाऱ्यापासून नांगरलेल्या जहाजाच्या धक्क्यापर्यंत विद्युत पुरवठ्याचे उद्घाटनही यावेळी झाले. परिचालन क्षेत्रात शाश्वत गतिशीलतेच्या दृष्टीकोनातून बंदराच्या प्रयत्नांना आणखी बळकटी देणाऱ्या इंधन वितरण पायाभूत सुविधांचे उद्घाटन देखील यावेळी झाले. यामध्ये,दोन एचएसडी युनिट्स, एक पेट्रोल युनिट आणि एक जलदगती विद्युत वाहन (ईव्ही) चार्जर समाविष्ट आहेत.

या कार्यक्रमात काही प्रमुख जमीन मालमत्तांचे भाडेपट्टीवर औपचारिक हस्तांतरण देखील झाले. यामध्ये, मॅलेट बंदर येथील भूखंड, जेएनपीएला त्यांच्या कॉर्पोरेट इमारतीसाठी सुपूर्द करण्यात आला. तसेच रे रोडवरील आणखी एक भूखंड सामाजिक आणि सामुदायिक उपक्रमांसाठी हरे कृष्ण मिशनला हस्तांतरित करण्यात आला, तर फेरी व्हार्फ पॅसेंजर टर्मिनल कोहिनूर ग्रुपला सुपूर्द करण्यात आले. याव्यतिरिक्त, मुंबई बंदरातील ई-शेड, मेसर्स रुची इंडिया लॉजिस्टिक्सकडे सुपूर्द करण्यात आली.
या कार्यक्रमात मुंबई बंदर प्राधिकरणाचा विकासासाठीचा समग्र दृष्टिकोन, पायाभूत सुविधांची प्रगती, पर्यावरणीय जबाबदारी आणि सांस्कृतिक वारसा यांचा विकास कथेत समावेश दर्शवला गेला आहे.
* * *
S.Tupe/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123311)
Visitor Counter : 11