कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागरी सेवांमध्ये ऐतिहासिक महिला प्रतिनिधित्व: 180 जणांच्या तुकडीमध्ये 74 महिला आयएएस अधिकारी म्हणजे सुमारे 41 टक्के, आतापर्यंतचे सर्वोच्च महिला प्रतिनिधित्व -डॉ. जितेंद्र सिंह यांनी केली प्रशंसा


केंद्रीय मंत्र्यांनी 2023 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला; 2047 पर्यंत भारताचे प्रशासकीय परिवर्तन आणि विकसित भारताचा दृष्टिकोन केला अधोरेखित

Posted On: 20 APR 2025 4:47PM by PIB Mumbai

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतील 2023 च्या (आयएएस) तुकडीतील अधिकारी प्रशिक्षणार्थीं (ओटी) सोबत विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी संवाद साधला. भारतीय प्रशासकीय सेवांच्या इतिहासातील सर्वोच्च महिला प्रतिनिधित्व या तुकडीत असल्याचे त्यांनी कौतुक केले. या 180 अधिकाऱ्यांच्या तुकडीत 74 महिला अधिकारी आहेत, ज्यांचे प्रमाण सध्याच्या तुकडीत 41 टक्के आहे.

हा संवाद सध्या सुरू असलेल्या सहाय्यक सचिव कार्यक्रमाचा एक भाग होता, ज्यामध्ये आयएएस अधिकारी प्रशिक्षणार्थी 1 एप्रिल ते 30 मे 2025 या कालावधीत 8 आठवड्यांच्या कालावधीसाठी 46 केंद्रीय मंत्रालयात प्रशिक्षणासाठी जोडले गेले आहेत. यामुळे त्यांना धोरण निर्मिती आणि केंद्र सरकारच्या कामकाजाची लवकर माहिती मिळते.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी या ऐतिहासिक विकासाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला दिले. मोदी यांच्या कार्यकाळात महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांना अभूतपूर्व गती मिळाली असल्याचे ते म्हणाले. "पंतप्रधान नेहमीच महिला सक्षमीकरणाचे समर्थक राहिले आहेत. हे विक्रमी प्रतिनिधित्व समावेशक आणि प्रगतीशील प्रशासनासाठी त्यांच्या निरंतर पाठिंब्याचा पुरावा आहे," असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

2015 मध्ये सहाय्यक सचिव कार्यक्रमाच्या स्थापनेबाबत मंत्र्यांनी माहिती दिली. हा कार्यक्रम म्हणजे तरुण अधिकाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच वास्तविक प्रशासनाची ओळख करून देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी मांडलेल्या विचारांचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. "या कार्यक्रमामुळे अधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास पुन्हा जागृत झाला आहे. कोरोना साथीच्या काळात, जिल्हास्तरीय संकट व्यवस्थापनासाठी बोलावले गेले तेव्हा यापैकी अनेक अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली," असेही डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

सक्षम आणि आत्मविश्वासू नागरी कर्मचाऱ्यांच्या घडणीवर या कार्यक्रमाचा उल्लेखनीय परिणाम झाल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी या उपक्रमाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना सांगितले.

मंत्र्यांनी नागरी सेवांच्या लोकशाहीकरणाबद्दल आनंद व्यक्त करताना जिथून खूप कमी अधिकारी निवडले जात होते अशा पंजाब, हरियाणा आणि ईशान्येकडील राज्यांमधून वाढत्या प्रतिनिधित्वाबद्दल समाधान व्यक्त केले.

केंद्रीय मंत्र्यांनी या तुकडीतील अधिकाऱ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विविधतेबद्दल अभिमान व्यक्त केला. या अधिकाऱ्यांपैकी 99 अधिकारी अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे असून अनेक जण वैद्यकीय आणि इतर तांत्रिक क्षेत्रातील आहेत असे त्यांनी सांगितले. "अनेक वर्षे मला आश्चर्य वाटत असे की तंत्रज्ञ नागरी सेवांमध्ये का सामील होत असतील. परंतु आता, मला जाणवले की डिजिटल इंडिया ते स्मार्ट सिटीज पर्यंतच्या प्रमुख सरकारी कार्यक्रमांचे तांत्रिक स्वरूप या तंत्रज्ञांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रीय संपत्ती बनते," असेही ते म्हणाले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी या तुकडीच्या सरासरी तरुण वयाचे (22-26 वर्षे) कौतुक केले. यामुळे हे अधिकारी देशाला योगदान देण्यासाठी दीर्घकाळ काम करू शकतील, असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या पुढे राहावे आणि iGOT कर्मयोगी व्यासपीठाचा पूर्ण वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2123057) Visitor Counter : 41