लोकसभा सचिवालय
विद्यार्थ्यांनी संस्कृतचे राजदूत म्हणून भारताच्या प्राचीन ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार जगभरात करावा - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन
लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी आणि सुवर्णपदक प्रदान
Posted On:
17 APR 2025 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2025
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संस्कृत भाषेच्या शाश्वत महत्वाचा गौरव केला असून, संस्कृत ही केवळ अभिजात भाषा नाही, तर वैज्ञानिक दृष्टीकोन आणि तात्विक सुस्पष्टता मिळवण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे म्हटले आहे. जयपूर येथील जगद्गुरु रामानंदाचार्य राजस्थान संस्कृत विद्यापीठाच्या सातव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. योग, आयुर्वेद आणि वेदांतिक तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून जग भारताकडे असलेल्या ज्ञानाचा नव्याने शोध घेत आहे, अशा वेळी तरुण पिढीला संस्कृत भाषेत दडलेल्या अमूल्य खजिन्याविषयी जागरूक करणे, हे आपले पवित्र कर्तव्य ठरते, असे ते यावेळी म्हणाले.
जगभरातील नामांकित विद्यापीठे संस्कृत भाषेवरील संशोधनाचे काम करत असताना, आपण या प्राचीन भाषेला आधुनिक नवोन्मेश आणि तांत्रिक प्रगतीच्या धाग्यात गुंफायला हवे, असे ते म्हणाले.
योगाभ्यासाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन आणि ऑनलाइन लर्निंग मॉड्यूल सुरू करणे, यासारख्या विद्यापीठाच्या महत्वाच्या उपक्रमांची प्रशंसा करून, ते म्हणाले की सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या दिशेने उचललेली ही दूरदर्शी पावले आहेत. विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेच्या कालातीत गौरवाची मशाल तेवत ठेवायला हवी, असे सांगून स्नातक विद्यार्थ्यांनी संस्कृतचे राजदूत म्हणून भारताच्या प्राचीन ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार जगभरात करावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात बिर्ला यांच्या हस्ते विद्यापीठातील गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी व सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2122574)