वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार, आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो ताजानी यांची घेतली भेट
उभय मंत्र्यांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करण्यावर चर्चा
Posted On:
11 APR 2025 5:11PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनियो ताजानी यांची भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करण्यावर उभय मंत्र्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीमुळे लोकशाही आणि निष्पक्षतेच्या सामायिक मूल्यांवर आधारित भारत आणि इटलीमधील दीर्घकालीन संबंध अधिक दृढ झाले. दोन्ही नेत्यांनी आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली आणि ही भागीदारी पुढे नेण्यासाठी नवीन मार्गांचा शोध घेतला.
नोव्हेंबर 2024 मध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या पातळीवर झालेल्या बैठकीमध्ये संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025 -2029 ला पुढे नेण्यासाठी आता उच्चस्तरीय सहकार्य घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. यावेळी व्यापार सहकार्याला उद्देशपूर्ण गती देणे, सुरळीत व्यापार प्रवाहांना प्रोत्साहन देणे, गुंतवणुकीच्या संधींना प्रोत्साहन देणे आणि त्यातून मूर्त परिणाम साध्य करणे, यांचा समावेश आहे, याचा दोन्ही राष्ट्रांना फायदा होवू शकेल, अशा समृद्ध, परस्पर फायदेशीर भागीदारीचा मार्ग मोकळा होईल. वर्ष 2023 – 2024 मध्ये भारत-इटली यांच्या दरम्यान सुमारे 15 अब्ज अमेरिकन डॉलर्सची व्यापारी उलाढालीचा अंदाज आहे; तर वर्ष 2000 पासून इटलीमधून भारतात होणारी थेट परकीय गुंतवणूक सुमारे 4 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आहे.
या चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी भारताच्या गतिमान आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेची प्रासंगिकता मान्य केली, तर वाढ आणि समृद्धी साध्य करण्यासाठी व्यापार संबंधांमध्ये विविधता आणणे आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
उभय नेत्यांनी युरोपीय संघ -भारत मुक्त व्यापार करार (एफटीए) वाटाघाटींच्या प्रगतीवर देखील चर्चा केली. वाटाघाटी सुलभ करण्यासाठी व्यापार मुद्द्यांना प्राधान्य देण्याच्या महत्त्वावर भर दिला. उदयोन्मुख जोखमींविरुद्ध व्यवसायाला स्थिरता प्रदान करण्यासाठी लवचिक मूल्य साखळी तयार करण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या समग्र अर्थपूर्ण व्यवस्था बनविण्याविषयी चर्चा केली.
औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, उद्योग 4.0 आणि तांत्रिक सहकार्य, रत्ने आणि आभूषणे , जहाज बांधणी, ऊर्जा संक्रमण, कृषी-तंत्रज्ञान आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने सहकार्य होवू शकते, असे अधोरेखित करण्यात आले. इटलीने भारताशी व्यापार संबंधांमध्ये विविधता आणण्यासाठी एक धोरणात्मक भागीदार म्हणून काम करण्याची आवश्यकता ओळखली. निर्यातदार आणि गुंतवणूकदारांना भेडसावणाऱ्या व्यापारातील अडथळ्यांवरही चर्चा करण्यात आली. उभय नेत्यांनी नियमित संवादाद्वारे अशा समस्या सोडवण्यासाठी सहमती दर्शविली. दोन्ही मंत्र्यांनी यापूर्वी भारत-इटली व्यवसाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंचाच्या पूर्ण सत्राला हजेरी लावली आणि भारतीय आणि इटालियन व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधला.
आर्थिक सहकार्यासाठी संयुक्त आयोगाची पुढील बैठक परस्परांच्या सुविधेप्रमाणे इटलीमध्ये आयोजित करण्यावर सहमती झाली. पुढच्या बैठकीमध्ये द्विपक्षीय व्यापार वाढविण्यासाठी, बाजारपेठेत प्रवेश वाढविण्यासाठी आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठी उच्चस्तरीय व्यावसायिक शिष्टमंडळामध्ये चर्चा करण्यात येणार आहे.
***
N.Chitale/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121108)