रेल्वे मंत्रालय
उत्तम पायाभूत सुविधा, उत्तम तंत्रज्ञान, उत्तम गाड्या – मुंबई उपनगरीय क्षेत्रात चांगल्या सेवांना चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज
Posted On:
11 APR 2025 6:18PM by PIB Mumbai
"उत्तम पायाभूत सुविधा, उत्तम तंत्रज्ञान, उत्तम गाड्या" या संकल्पनेवर आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संयुक्तपणे पत्रकारांना संबोधित करताना महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांमधील परिवर्तनात्मक प्रगती अधोरेखित केली. मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर विशेष भर देत आधुनिकीकरण, प्रवाशांना उत्तम अनुभव आणि वाढीव प्रादेशिक कनेक्टिव्हिटी प्रति भारतीय रेल्वे वचनबद्ध आहे.

उत्तम पायाभूत सुविधा:
उपनगरीय सेवा वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्वपूर्ण आहे यावर केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी भर दिला. 300 किलोमीटरहून अधिक नवीन मार्गांचा समावेश असलेले सुमारे 17,000 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या उपक्रमांचे उद्दिष्ट विद्यमान मार्गांवरील कोंडी कमी करणे, सेवा वारंवारता सुधारणे आणि मुंबईच्या उपनगरीय प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करणे हे आहे.
उत्तम तंत्रज्ञान:
उपनगरीय विभागासाठी तयार केलेली अत्याधुनिक सुरक्षा आणि सिग्नलिंग प्रणाली, कवच 5.0 लवकरच सुरु होणार असल्याची घोषणा वैष्णव यांनी केली. कवच 5.0 मुळे रेल्वे अपघातात लक्षणीय घट होईल, ज्यामुळे गाड्या अधिक सुरक्षित आणि कार्यक्षमतेने धावतील अशी अपेक्षा आहे.
उत्तम गाड्या:
प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी लवकरच 238 नवीन वातानुकूलित उपनगरीय गाड्या सुरु केल्या जातील अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. मुंबईतील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन या गाड्यांची रचना केली आहे ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाचा अनुभव मिळेल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की मुंबई वन कार्ड लवकरच सुरू केले जाईल. उपनगरीय गाड्या, मेट्रो रेल, मोनो-रेल, बेस्ट बस इत्यादींमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एमएमआर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी हे एकल आणि सर्वसमावेशक कार्ड आहे. या पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक डबे एकत्रितपणे उपनगरीय सेवांची संख्या वाढवतील, परिणामी लाखो मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास सुधारेल अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रातील धोरणात्मक रेल्वे प्रकल्प:
गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केले जाणार असून 4,819 कोटी रुपये गुंतवणुकीसह 240 किमीचा हा धोरणात्मक कॉरिडॉर असेल अशी घोषणा या परिषदेत करण्यात आली. हा महत्त्वाचा प्रकल्प विदर्भ आणि मराठवाडा यांना जोडतो, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासी आणि मालवाहतूक जलद होईल. यामुळे महाराष्ट्राची आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडशी रेल्वे संपर्क व्यवस्था देखील मजबूत होतील, परिणामी प्रादेशिक व्यापार आणि एकात्मता वाढेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 7 एप्रिल 2025 रोजी रेल्वे मंत्रालयाच्या एकूण 18,658 कोटी रुपये (अंदाजे) खर्चाच्या चार प्रकल्पांना मंजुरी दिली तेव्हा पायाभूत सुविधांच्या या प्रमुख प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती.
वैष्णव यांनी आज सांगितले की हा परिवर्तनकारी प्रकल्प उत्तर आणि दक्षिण भारत दरम्यान प्रवासी आणि मालवाहतूक कनेक्टिव्हिटी वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मंजूर प्रकल्पात 240 किमी लांबीच्या विद्यमान ट्रॅकवरील व्यापक सुधारणांचा समावेश आहे, ज्यामध्ये 29 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, 36 मोठे पूल, 338 लहान पूल आणि 67 रोड अंडर-ब्रिज (RUB) बांधणे समाविष्ट आहे . यामुळे परिचालन सुलभ होईल आणि सुरक्षितता वाढेल.
“या दुपदरीकरणामुळे उत्तर आणि दक्षिण भारतातील वाहतूक संपर्क व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. या प्रदेशातील आकांक्षी जिल्ह्यांचा वेगाने विकास होईल”, असे अश्विनी वैष्णव म्हणाले. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, प्रवासी आणि रेल्वे वाहतुकीवर अवलंबून असलेल्या उद्योगांना या प्रकल्पामुळे खूपच मोठा लाभ होणार आहे. त्यांनी असेही सांगितले की, या अद्यतनामुळे प्रादेशिक अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.
इतर रेल्वे प्रकल्पांमध्ये समाविष्ट असलेल्या उल्लेखनीय बाबी :
या व्यतिरिक्त, अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 132 स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील 1,300 स्थानकांपैकी अनेक स्थानकांचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. तसेच अनेक स्थानकांमध्ये लक्षणीय प्रगती झाल्याचे वृत्त आहे.
भविष्यातील योजनांवर एक दृष्टीकोन:
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, समर्पित मालवाहतूक मार्गिका आणि मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे, हे महत्त्वाकांक्षी उपक्रम महाराष्ट्रातील वाहतुकीत क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहेत.
भारतीय रेल्वे राज्यात 1,73,804 कोटी रूपये गुंतवणूक करण्यासाठी वचनबध्द आहे. या गुंतवणूक करताना राष्ट्रीय रेल्वे जाळ्यामध्ये महाराष्ट्राचे धोरणात्मक महत्त्व आणि भविष्यातील विकासाच्या मार्गावर भर दिला जाणार आहे.
या वर्षी मे महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणा-या ‘वेव्हज’ (जागतिक ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटच्या पार्श्वभूमीवर तयारीचे महत्त्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले.
सर्जनशील क्षेत्रात राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असलेली पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबईत स्थापन होणार असून भारतीय सर्जनशील उद्योगाला जागतिक दर्जाचे पायाभूत सुविधा केंद्र बनवण्यासाठी हे परिवर्तनात्मक पाऊल ठरेल असे त्यांनी सांगितले.
भारतीय रेल्वेने महाराष्ट्रासाठी विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे, त्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. गोंदिया-बल्लारशाह स्थानकांमधील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण केल्याने या प्रदेशाला होणारा फायदा यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भर दिला. त्यांनी लवकरच आयआरसीटीसीकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही केली. भारत गौरव पर्यटन गाडीने 10 दिवसांच्या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि भव्य वारसा तसेच महाराष्ट्रातील इतर सांस्कृतिक आणि तीर्थस्थाने दाखविण्यासाठी एक विशेष तयार केलेला पर्यटन मार्ग असणार आहे, असेही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
***
JPS/S.Kane/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121073)
Visitor Counter : 42