संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुबईचे युवराज तसेच संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्याबरोबर नवी दिल्ली येथे घेतली बैठक
संरक्षण सहकार्य, सह-उत्पादन आणि सह-विकास प्रकल्प, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात एकत्र काम करण्यास उत्सुक - राजनाथ सिंह
Posted On:
08 APR 2025 8:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 8 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्लीतील साउथ ब्लॉक येथे दुबईचे युवराज आणि संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्याबरोबर बैठक घेतली. दोन्ही नेत्यांनी संस्थात्मक यंत्रणा, लष्करी सराव, प्रशिक्षण कार्यक्रमांची देवाणघेवाण इत्यादींद्वारे दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या संरक्षण सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान या नेत्यांच्या दृष्टिकोन आणि दृढनिश्चयानुसार व्यापार आणि व्यवसाय यासारख्या इतर क्षेत्रात झालेल्या प्रगतीची बरोबरी साधण्यासाठी संरक्षण सहकार्य वाढवणे आवश्यक आहे, हे या बैठकीत दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले. प्रशिक्षण देवाणघेवाण हे संरक्षण सहकार्याचे एक प्रमुख क्षेत्र असल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगीतले. या देवाणघेवाणीमुळे एकमेकांच्या संरक्षण परिसंस्थांची समज वाढेल आणि द्विपक्षीय संरक्षण संबंधांना बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दोन्ही नेत्यांनी तटरक्षक दलांमधल्या सक्रिय सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सामंजस्य कराराद्वारे या सहकार्याला औपचारिक रुप देत ते आणखी दृढ करण्याचे वचन दिले. संरक्षण उद्योगांमधील निकट सहकार्य द्विपक्षीय सहकार्याचा अविभाज्य भाग असावे यावर त्यांनी सहमती दर्शवली. दोन्ही मंत्र्यांनी संरक्षण उद्योग सहकार्य वाढवण्यावर भर दिला आणि संरक्षण उत्पादनात भागीदारी वाढवण्याच्या संधींवर चर्चा केली.

एकमेकांनी आयोजित केलेल्या इतर प्रदर्शनांमध्ये आणि सोबतच संरक्षण प्रदर्शनांमध्ये दोन्ही बाजूंच्या सक्रिय सहभागाचे मंत्र्यांनी आश्वासन दिले आणि भारत- संयुक्त अरब अमिरात संरक्षण भागीदारी मंचाचे स्वागत केले. दोन्ही देशांना लाभ होईल अशा धोरणात्मक संयुक्त उपक्रमांना आणि सह-उत्पादन प्रकल्पांना चालना देण्याची क्षमता या मंचात आहे. मेक-इन-इंडिया आणि मेक-इन-एमिरेट्स उपक्रमांमध्ये दोन्ही देशांच्या पूरकतेवर लक्ष केंद्रित करण्यासही त्यांनी सहमती दर्शविली.
बैठकीनंतर X या समाज माध्यमावरील एका संदेशात संरक्षण मंत्री म्हणाले की, संयुक्त अरब अमिराती सोबतच्या व्यापक धोरणात्मक भागीदारीला भारताने नेहमीच प्राधान्य दिले आहे. "येत्या काही वर्षांत, आम्ही संरक्षण सहकार्य, सह-उत्पादन आणि सह-विकास प्रकल्प, तसेच नवोन्मेष आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात एकत्रित काम करण्यास उत्सुक आहोत. भारत आणि संयुक्त अरब अमिरात हे दोन्ही देश या क्षेत्रात शांतता आणि समृद्धीसाठी काम करण्यास वचनबद्ध आहेत," असेही ते म्हणाले.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2120200)