गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शाहा यांनी आज जम्मू आणि काश्मीर दौऱ्यादरम्यान कठुआ इथल्या विनय या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला दिली भेट, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसोबतही साधला संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सुरक्षा दल आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी वचनबद्ध

येत्या काही वर्षांत, भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेशाच्या सीमेवर तैनात असलेली सुरक्षा दले पूर्णतः आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सज्ज असतील

Posted On: 07 APR 2025 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 एप्रिल 2025

 

केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा यांनी आज जम्मू आणि काश्मीर दौऱ्यादरम्यान कठुआ इथल्या विनय या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट दिली आणि तिथे तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधला.

आपल्या या भेटीदरम्यान, अमित शहा यांनी 2019 मध्ये कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर कर्तव्यावर असताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या सीमा सुरक्षा दलाचे शहीद जवान, सहाय्यक कमांडंट विनय प्रसाद यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आपल्या या भेटीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 8 महिला बॅरेक्स, उंच मास्ट दिवे, जी+1 टॉवर आणि एकात्मिक सीमा चौकी या नव्याने बांधलेल्या पायाभूत सुविधांचे लोकार्पण  केले. या सीमावर्ती भागात बांधलेल्या या पायाभूत सुविधांसाठी 47.22 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमांमुळे सीमा सुरक्षा दल जवानांच्या कर्तव्यावर असतानाच्या सुरक्षा विषयक व्यवस्थेला बळकटी मिळाली आहे आणि या सोबतच या जवानांच्या राहण्याच्या व्यवस्थेतही सुधारणा झाली आहे.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा यांनी जम्मू प्रदेशातील आंतरराष्ट्रीय सीमेची देखरेख करण्याकरता सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि अधिकारी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी या जवानांशी संवादही साधला. सीमा सुरक्षा दलाचे जवान किती कठीण परिस्थितीत देशाच्या सीमांची सुरक्षा सुनिश्चित करतात याची जाणीव या ठिकाणी भेट दिल्यावर होते असे  अमित शहा म्हणाले.  कडाक्याची थंडी, मुसळधार पाऊस किंवा 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले तापमान तसेच भौगोलिक आणि हवामानाशी संबंधित आव्हाने अशी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही, आपले जवान अगदी सज्जता आणि सतर्कतेने सीमांचे रक्षण करण्यासाठी कायमच दक्ष असतात आणि समर्पण भावनेने आपले कर्तव्य बजावतात ही बाबही अमित शहा यांनी नमूद केली.

सीमेवर पाळत करण्याच्या उद्देशाने तैनात करण्यासाठी टेहळणी    करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक प्रणालींचे दोन प्रारुपे विकसित केली असल्याची माहिती त्यांनी दिली. ही प्रारुपे संपूर्ण सीमेवर स्थापित केली जातील त्यानंतर, सैनिकांना माहिती मिळवणे आणि शत्रूच्या कोणत्याही कृतीला तंत्रज्ञानाच्या आधारे तातडीने प्रतिसाद देणे खूपच सुलभ होईल असे त्यांनी सांगितले.

येत्या  काही वर्षांत, भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेशाच्या संपूर्ण सीमेवर तैनात असलेली सुरक्षा दले पूर्णतः आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सज्ज असतील अशी ग्वाही देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातले केंद्र सरकार सैनिकांना त्यांचे कर्तव्य बजावताना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी सातत्यपूर्णतेने काम करत असून, हे सरकार कायमच अशा रितीने काम करत राहील अशी ग्वाही देखील केंद्रीय गृहमंत्री तसेच सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सुरक्षा दल आणि त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी पूर्णतः वचनबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

 

* * *

N.Chitale/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2119891) Visitor Counter : 13