लोकसभा सचिवालय
सर्व नागरिकांना समान मानणे, त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे तसेच समाजातील दुर्बल आणि मागासलेल्या घटकांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणे हाच भारताच्या राज्यघटनेचा उद्देश आहे : लोकसभा अध्यक्ष, ओम बिर्ला
Posted On:
06 APR 2025 8:20PM by PIB Mumbai
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथे झालेल्या आंतर - संसदीय संघाच्या (Inter-Parliamentary Union - IPU) ऐतिहासिक 150 व्या आमसभेत सामाजिक विकास आणि न्यायासाठी संसदीय कृती या विषयावर बीजभाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी भारतीय राज्य घटनेचे सर्वसमावेशक आणि कल्याणकारी स्वरूप अधोरेखित केले. सर्व नागरिकांना समान मानणे, त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे तसेच समाजातील दुर्बल आणि मागासलेल्या घटकांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेणे हाच भारताच्या राज्यघटनेचा उद्देश असल्याचे त्यांनी आपल्या बीज भाषणातून सांगितले.
अलिकडच्या काळात भारताच्या संसदेने सामाजिक न्याय आणि सुरक्षिततेला चालना देणारे आणि समाजातील सर्व घटकांच्या समावेशाला प्रोत्साहन देणारे अनेक कायदे पारित केले असल्याचे निरीक्षणही ओम बिर्ला यांनी आपल्या बीज भाषणातून मांडले. यावेळी ओम बिर्ला यांनी आंतर - संसदीय संघाच्या 150 व्या आमसभेला उपस्थितांना राम नवमीच्या शुभेच्छाही दिल्या.
मानवी विकासाच्या निर्देशकांअंतर्गत निश्चित केलेली उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या ध्येयानेच भारताचे सरकार काम करत असल्याचेही बिर्ला यांनी सांगितले.
आंतर - संसदीय संघाच्या आमसभेत होणारी चर्चा, या आमसभेसाठी आलेल्या सर्व शिष्टमंडळांना नवा दृष्टीकोन देईल आणि जगभरातील संसदांना न्याय्य, सर्वसमावेशक आणि समृद्ध समाज निर्माण करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात सहाय्यकारी ठरेल अशी आशाही ओम बिर्ला यांनी यावेळी व्यक्त केली.
***
S.Kane/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119624)
Visitor Counter : 35