संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कारवार येथून आयओएस सागर’च्या रुपात आयएनएस सुनयना हे जहाज केले रवाना, या जहाजावर हिंद महासागर क्षेत्रातील 9 मित्र राष्ट्रातील 44 कर्मचारी तैनात
आयओएस सागर हे सागरी क्षेत्रात शांतता, समृद्धी आणि सामूहिक सुरक्षेसाठी भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब- राजनाथ सिंह
Posted On:
05 APR 2025 4:07PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 5 एप्रिल 2025 रोजी कर्नाटकातील कारवार येथून आयएनएस सुनयना हे भारतीय नौदलाचे अपतटीय गस्त जहाज, हिंद महासागर जहाज (आयओएस) सागर ( सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन) म्हणून रवाना केले. संरक्षणमंत्र्यांनी 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सीबर्ड प्रकल्पा अंतर्गत बांधलेल्या आधुनिक कार्यान्वयन, दुरुस्ती आणि लॉजिस्टिक सुविधांचे उद्घाटन देखील केले. यावेळी त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आयओएस सागर
नऊ मैत्रीपूर्ण देशांमधील (कोमोरोस, केनिया, मादागास्कर, मालदीव, मॉरिशस, मोझांबिक, सेशेल्स, श्रीलंका आणि टांझानिया) 44 नौदल कर्मचारी तैनात असलेले हे जहाज, प्रादेशिक सागरी सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
आयओएस सागरची रवानगी म्हणजे सागरी क्षेत्रात शांतता, समृद्धी आणि सामूहिक सुरक्षेसाठी भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंद महासागर क्षेत्र (आयओआर) भागीदार राष्ट्रांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना सांगितले. संरक्षण मंत्र्यांनी हिंद महासागर क्षेत्रात भारताच्या वाढत्या उपस्थितीवर प्रकाश टाकला. “हे केवळ आपल्या सुरक्षेशी आणि राष्ट्रीय हितांशी संबंधित नाही तर या प्रदेशातील आपल्या मित्र राष्ट्रांचे हक्क आणि कर्तव्यांच्या समानतेकडे देखील निर्देश करते” असेही ते म्हणाले.
या क्षेत्रात जहाजांचे अपहरण आणि समुद्री चाच्यांच्या उपद्रव यासारख्या घटनांमध्ये मदतीसाठी प्रथम प्रतिसाद देणारे दल म्हणून उदयास आल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले.
सागर उपक्रमाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आयओएस सागर हे जहाज हिंद महासागर क्षेत्राचे भविष्य घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. या मोहिमेद्वारे, भारत आपल्या सागरी शेजाऱ्यांसोबत मजबूत संबंध निर्माण करण्याच्या तसेच या क्षेत्रात सुरक्षित, अधिक समावेशक आणि सुरक्षित सागरी वातावरण तयार करण्यासाठी काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा पुष्टी करतो.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119314)
Visitor Counter : 40