नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताने नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढीमध्ये गाठला ऐतिहासिक टप्पा
प्रविष्टि तिथि:
01 APR 2025 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 एप्रिल 2025
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 2024-25 या आर्थिक वर्षात नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने अभूतपूर्व अशी 25 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेची भर घातली आहे, जी मागील वर्षीच्या 18.57 गिगावॅटच्या वाढीपेक्षा जवळपास 35% जास्त आहे.
नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात वाढ
भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्राने नवीकरणीय ऊर्जा वाढीचे नेतृत्व केले, आर्थिक वर्ष 24 मध्ये 15 गिगावॅट असणारी क्षमता वाढ आर्थिक वर्ष 25 मध्ये जवळजवळ 21 गिगावॅट म्हणजे उल्लेखनीय अशी 38 % वाढ आहे. देशाने या वर्षी 100 गिगावॅट स्थापित सौर क्षमता ओलांडण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा देखील गाठला.
देशांतर्गत सौर उत्पादनाने नवीन उंची गाठली
आत्मनिर्भरतेच्या दिशेने जोरदार वाटचाल करताना भारताची सौर मॉड्यूल उत्पादन क्षमता मार्च 2024 मध्ये 38 गिगावॅटवरून जवळजवळ दुप्पट होऊन मार्च 2025 मध्ये 74 गिगावॅट झाली, तर सौर पीव्ही सेल उत्पादन क्षमता 9 गिगावॅटवरून 25गिगावॅट झाली. याव्यतिरिक्त, देशातील पहिल्या इनगॉट-वेफर उत्पादन सुविधेने (2 गिगावॅट) आर्थिक वर्ष 25 मध्ये उत्पादन सुरू केले.
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेचा व्यापक परिणाम
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेची प्रभावी प्रगती दिसून आली, 31 मार्च 202 पर्यंत 11.01 लाखांहून अधिक कुटुंबांना याचा फायदा झाला. या योजनेअंतर्गत, 6.98 लाख लाभार्थ्यांना केंद्रीय आर्थिक सहाय्य म्हणून 5,437.20 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, ज्यामुळे रूफटॉप सोलरचा अवलंब करण्यास लक्षणीय प्रोत्साहन मिळाले आहे.
हरित हायड्रोजन क्षेत्राला गती
भारताच्या हरित हायड्रोजन क्षेत्रातही लक्षणीय विकास झाला. इलेक्ट्रोलायझरच्या वार्षिक 1,500 मेगावॅट उत्पादनासाठी 2,220 कोटी रुपयांचे प्रोत्साहन देण्यात आले, तर 4,50,000 टन-प्रति-वर्ष (TPA) हरित हायड्रोजन उत्पादनासाठी अतिरिक्त 2,239 कोटी रुपये देण्यात आले. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत, पोलाद क्षेत्र कार्बन-मुक्त करण्यासाठी सात प्रायोगिक प्रकल्पांना 454 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. याव्यतिरिक्त, 208 कोटी रुपये निधी प्रदान करण्यात आलेल्या वाहतूक क्षेत्रातील पाच प्रायोगिक प्रकल्पात, 37 हायड्रोजन-इंधनयुक्त वाहने आणि नऊ हायड्रोजन रिफ्युएलिंग स्टेशन सुरू केले जातील.
पीएम-कुसुम योजनेअंतर्गत विक्रमी प्रगती
प्रधानमंत्री कुसुम योजनेत विक्रमी प्रगती दिसून आली. घटक ब अंतर्गत, आर्थिक वर्ष 25 मध्ये 4.4 लाख पंप बसवण्यात आले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 4.2 पट अधिक आहेत. घटक क अंतर्गत, 2.6 लाख पंप सौरऊर्जेवर चालविण्यात आले, जे आर्थिक वर्ष 24 पेक्षा 25 पट अधिक आहेत. या योजनेअंतर्गत बसवलेल्या/सौरऊर्जेवर चालणाऱ्या एकूण सौर पंपांची संख्या आता 10 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. पीएम-कुसुम योजनेचा खर्च 2,680 कोटींवर पोहोचला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 268% ने वाढलेला आहे.
"भारत बहुधा जगातील तिसरा सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा क्षमता धारक बनला आहे किंवा लवकरच बनेल, अशी माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. ही उपलब्धी पंतप्रधान मोदी यांच्या शाश्वत आणि स्वयंपूर्ण ऊर्जा भविष्याच्या दृष्टिकोनाचा दाखला आहे, असेही ते म्हणाले.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारताचे स्वच्छ ऊर्जा संक्रमण आणि जागतिक नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील नेतृत्वाची वचनबद्धता पुन्हा एकदा स्पष्ट होते.
* * *
S.Kane/Nandini/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2117561)
आगंतुक पटल : 68