संरक्षण मंत्रालय
टायगर ट्रायम्फ - 25 युद्धसराव : एक झलक
Posted On:
31 MAR 2025 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मार्च 2025
भारत आणि अमेरिकेच्या लष्कराच्या तिन्ही दलांसाठी होणाऱ्या टायगर ट्रायम्फ या द्विपक्षीय सरावाचे चौथे पर्व यंदा 1 एप्रिल ते 13 एप्रिल 2025 या कालावधीत भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आयोजित करण्यात आले आहे. हा द्विपक्षीय सराव भारत - अमेरिकेतील मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (Humanitarian Assistance and Disaster Relief - HADR) विषयक सराव आहे. सरावांदरम्यान तसेच संकट अथवा आपत्कालीन परिस्थितींच्या काळात भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त कार्यदलांच्या सुलभ कार्यवाहींसाठी जलद आणि समन्वयपूर्णतेची जोड मिळावी यादृष्टीने, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहिमांसाठी परस्पर आंतरकार्यक्षमता विकसित करणे तसेच संयुक्त समन्वय केंद्र (Combined Coordination Center - CCC) स्थापन करण्यासाठी मानक कार्यपद्धती तयार करणे हा या सरावाचा उद्देश आहे.
या सरावात सहभागी होत असलेल्या भारताच्या पथकात आयएनएस जलाश्व, आयएनएस घडियाल, आयएनएस मुंबई आणि आयएनएस शक्ति या भारतीय नौदलाची युद्धनौका तसेच त्यांच्यासोबत असलेली हेलिकॉप्टर्स आणि लँडिंग क्राफ्ट्स समावेश आहे. याशिवाय दीर्घ पल्ल्याचे सागरी गस्त विमान P8I, 91 इंफंट्री ब्रिगेड आणि 12 मेकॅनाइज्ड इन्फंट्री बटालियनचे लष्करी जवान, भारतीय हवाई दलाचे C-130 हे मालवाहू विमान आणि MI-17 हेलिकॉप्टर्स, तसेच जलद वैद्यकीय कृती पथक देखील या सरावात भाग घेणार आहेत. अमेरिकच्या पथकात अमेरिकेच्या नौदलाची युद्धनौका कॉमस्टॉक आणि राल्फ जॉन्सन तसेच अमेरिकेच्या नौदल विभागातले सैनिक सहभागी होणार आहेत.
या सरावाअंतर्गतचा नौदल तळावरील प्रारंभिक टप्पा (Harbour Phase) 1 एप्रिल ते 7 एप्रिल 2025 या कालावधीत विशाखापट्टणम इथे होणार आहे. 1 एप्रिल 2025 रोजी आयएनएस जलाश्व या युद्धनौकेवर संयुक्त ध्वज संचलनाने या सरावाचे औपचारिक उद्घाटन होईल, त्यानंतर माध्यम प्रतिनिधींसोबत संवादाचे सत्र असेल. याशिवाय, दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये प्रशिक्षण भेटी, विषयज्ञांसोबत संवाद, क्रीडा उपक्रम आणि सामाजिक संवाद अशा उपक्रमांचेही आयोजन केले गेले आहे. नौदल तळावरील प्रारंभिक टप्पा पूर्ण झाल्यानंतर, सैन्यासह जहाजे समुद्रातील सरावाच्या टप्प्यासाठी रवाना होतील. यावेळी काकीनाडाच्या सागरी किनाऱ्यावर सागरी, समुद्र आणि जमिनीवरील (सैन्य समुद्रातून जमिनीवर उतरणं आणि कार्यवाहीसाठी सज्ज होणं) तसेच मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण मोहीमांचा सराव केला जाईल.
सरावादरम्यान, भारतीय लष्कर आणि अमेरिकेच्या नौदलाच्या वतीने काकीनाडा नौदल परिसरात एक संयुक्त निर्देश आणि नियंत्रण केंद्र (Joint Command and Control Center) स्थापन केले जाईल. यासोबतच, भारतीय हवाई दलाचे जलद वैद्यकीय कृती पथक (Rapid Action Medical Team - RAMT) आणि अमेरिकी वैद्यकीय पथकाद्वारे वैद्यकीय मदत पुरवण्यासाठीची एक संयुक्त वैद्यकीय छावणी उभारली जाईल. यानंतर 13 एप्रिल 2025 रोजी विशाखापट्टणम इथे अमेरिकी नौदलाच्या कॉमस्टॉक या जहाजावर या सरावाचा समारंभपूर्वक समारोप होईल.
* * *
S.Patil/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2117077)
Visitor Counter : 36