संरक्षण मंत्रालय
आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनाला बळ देत, अँटी-टँक वेपन प्लॅटफॉर्मची एनएएमआयएस ट्रॅक्ड आवृत्ती आणि 5,000 हलक्या वाहनांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने केली 2,500 कोटी रुपयांच्या करारांवर स्वाक्षरी
Posted On:
27 MAR 2025 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मार्च 2025
संरक्षण मंत्रालयाने रणगाडाविरोधी शस्त्रप्रणालीचा प्रक्षेपकमंच असलेल्या नाग क्षेपणास्त्र प्रणाली (एनएएमआयएस) ट्रॅक्ड आवृत्तीच्या खरेदीसाठी आर्मर्ड व्हेइकल निगम लिमिटेड बरोबर, तसेच सशस्त्र दलांसाठी सुमारे 5,000 हलक्या वाहनांची खरेदी करण्यासाठी फोर्स मोटर्स लिमिटेड आणि महिंद्रा अँड महिंद्रा बरोबर करार केला असून, यासाठी जवळजवळ 2,500 कोटी रुपये खर्च होतील. या करारांवर Buy (Indian-Indigenously Designed Developed and Manufactured), म्हणजेच, खरेदी (भारतीय-स्वदेशी डिझाइन केलेले विकसित आणि निर्मित) श्रेणीअंतर्गत 27 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
एनएएमआयएस (टीआर) शस्त्र प्रणाली
डीआरडीओच्या संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने विकसित केलेल्या एनएएमआयएस (टीआर) शस्त्रप्रणालीच्या खरेदी कराराची एकूण किंमत 1,801.34 कोटी रुपये इतकी आहे.
मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या (यांत्रिक पायदळ) रणगाडाविरोधी क्षमतेच्या आधुनिकीकरणातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, यामुळे विविध प्रकारच्या कारवायांमधील भारतीय लष्कराच्या ऑपरेशनल (परिचालन) क्षमतेला बळ मिळणार आहे.
एनएएमआयएस (टीआर) ही शत्रूचे क्षेपणास्त्र कवच भेदणारी सर्वात अत्याधुनिक फायर अँड फरगेट रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली असून, त्यामध्ये अधिक घातक आणि मारक क्षमता आहे. ही शस्त्रास्त्र प्रणाली लष्कराच्या यांत्रिक कारवायांच्या संचालनात बदल घडवून आणण्यासाठी आणि शत्रू विरोधातील कारवाया अधिक प्रभावी करण्यासाठी सज्ज आहे.
हलकी वाहने
अत्याधुनिक वाहन तंत्रज्ञानावर आधारित आणि अधिक क्षमतेचे इंजिन असलेली ही वाहने 800 किलो वजन वाहून नेण्याच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आली आहेत. ही वाहने सशस्त्र दलांना सर्व प्रकारचा भूप्रदेश आणि ऑपरेशनल परिस्थितीत गतिशीलता मिळवून देतील.
या दोन्ही खरेदी करारांमुळे स्वदेशीकरण आणि राष्ट्रीय संरक्षण उपकरण निर्मिती क्षमतेला चालना मिळेल. या प्रकल्पांमध्ये एमएसएमई (सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग) क्षेत्राला प्रोत्साहन देऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याची अफाट क्षमता आहे. ही खरेदी म्हणजे, ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाला अनुसरून, देशाच्या संरक्षण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि स्वदेशी उद्योगांचे सक्षमीकरण करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2115981)
Visitor Counter : 51